इटलीचे पंतप्रधान द्राघी यांचा राजीनामा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
इटलीमध्ये गुरुवारी पंतप्रधान मारियो द्राघी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळले. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानावर त्यांच्याच आघाडीतील प्रमुख मित्रपक्षांनी बहिष्कार टाकला होता. अल्पमतात आल्याने पंतप्रधान द्राघी यांना राजीनामा देणे भाग पडले. त्यांच्या राजीनाम्यामुळे देशात लवकर निवडणूक होण्याची शक्मयता निर्माण झाली आहे आणि निर्णायकवेळी इटली आणि युरोपसाठी अनिश्चिततेचा नवा काळ सुरू झाला आहे. गेल्या तीन वर्षांत इटलीमध्ये पडणारे हे तिसरे सरकार आहे. द्राघी हे युरोपियन सेंट्रल बँकेचे माजी प्रमुख आहेत. त्यांनी गेल्यावषी फेब्रुवारीमध्ये प्रमुख राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. अलीकडेच त्यांनी आपल्या मित्रपक्षांना सरकार वाचवण्यासाठी नवा करार करण्याची विनंती केली होती. येथे सकाळच्या बैठकीत द्राघी यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांच्याकडे सुपूर्द केला. राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारत द्रागी सरकारला काळजीवाहू सरकार म्हणून काम करण्यास सांगितले आहे.