रेल्वेमार्ग नंदगडमार्गे केल्यास अधिक सोयीचे
शेतकऱ्यांची जमीन वाचणार : संगोळ्ळी रायण्णा स्मारकास उजाळा मिळणार : खर्चात बचत होण्याची दाट शक्यता
खानापूर : बेळगाव-धारवाड नवा रेल्वेमार्ग सुरू करण्यासाठी सुपीक जमीन भू-संपादन करण्यात येत आहे. याला शेतकऱ्यांनी गेल्या पाच वर्षापासून सातत्याने विरोध केला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता सरकार हा प्रकल्प रेटण्याच्या परिस्थितीत आहे. शेतकऱ्यांनी न्यायालयातही दाद मागितली होती. आता शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. वादग्रस्त रेल्वेमार्ग करण्याऐवजी खानापूर, नंदगड, कित्तूरमार्गे धारवाड हा नवा रेल्वेमार्ग केल्यास शेतकऱ्यांची जमीनही वाचणार आहे. बेळगाव-धारवाड नियोजित रेल्वेमार्गाचा खर्चही कमी येणार आहे. यासाठी कर्नाटक व केंद्र सरकारने या रस्त्याचा विचार करावा, अशी मागणी नंदगड-खानापूर परिसरातून होत आहे. बेळगाव ते धारवाड नियोजित रेल्वेमार्गासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. हा रस्ता देसूर, गर्लगुंजी, नंदिहळळी, के. के. कोप्प, कित्तूरमार्गे धारवाडला जाणार आहे. ा अंदाजे 74 कि. मी. लांबीचा रस्ता आहे. यात 140 पूल उभारण्याची गरज आहे. तसेच 335 हेक्टर सुपीक जमीन जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च मोठ्या प्रमाणात आहे.
सुपीक जमिनीचीही होणार बचत
सध्या देसूरपासून हा रस्ता करण्यात येणार आहे. खानापूरपासून नवा धारवाड रेल्वेमार्ग केल्यास प्रकल्पाचा खर्च अत्यंत कमी येणार आहे. नायकोल ते कित्तूर हा इतिहासकालीन 60 फुटी रस्ता नकाशात नमूद आहे. या रस्त्यावरुन अलीकडच्या काळापर्यंत वाहतूक होत होती. कित्तूर चन्नम्मांच्या कार्यकाळात या रस्त्याला अतिशय महत्त्व होते. त्यामुळे या रस्त्याला संगोळ्ळी रायण्णा रस्ता असेही संबोधिले जाते. खानापूर रेल्वेस्थानकाच्या पुढील 3 कि. मी. अंतरावर शेडेगाळी येथून नंदगड ते कित्तूर रेल्वेमार्ग होऊ शकतो. यासाठी भू-संपादण्याची गरज नाही.
बेळगाव-धारवाड रस्त्यासंदर्भात गांभीर्याने विचार करावा
पूर्वी नायकोल, हेब्बाळ, नंदगड, खैरवाड, झुंजवाड, बेकवाड, बिडीमार्गे कित्तूर हा रस्ता 60 फुटाचा असून नकाशात नमूद आहे. याच मार्गावरुन थोडीफार जमीन भू संपादन करून या मार्गावरुन नवा रेल्वेमार्ग केल्यास अत्यंत कमी खर्चात हा रेल्वेमार्ग तयार होऊ शकतो. तसेच संगोळ्ळी रायण्णा यांच्या फाशी स्थळाजवळूनच हा रस्ता जात असल्याने या ऐतिहासिक स्थळालाही महत्त्व प्राप्त होईल. रायण्णा फाशी स्थळाचा 300 कोटी रुपये खर्चून विकास करण्यात येत आहे. जर हा रस्ता झाल्यास नंदगडलाही ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होईल. यासाठी सरकारने नव्या बेळगाव, धारवाड रेल्वेमार्गाचा विचार करताना या मार्गाचा अभ्यास करून आराखडा तयार केल्यास शेतकऱ्यांची सुपीक जमीन वाचणार आहे. आणि सरकारच्या नमूद असलेल्या रस्त्याचाही वापर होणार आहे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने या रस्त्याचा विचार करावा व नवा बेळगाव-धारवाड रस्त्यासंदर्भात गांभीर्याने विचार करून याबाबत क्रम घ्यावा, अशी मागणी खानापूर, नंदगड परिसरातील नागरिकांतून होत आहे.
कित्तूर या ऐतिहासिक स्थळांनाही महत्त्व प्राप्त होणार
बेळगाव-धारवाड नव्या रेल्वेमार्गासाठी बेळगाव तालुक्यातील सुपीक जमीन मोठ्या प्रमाणात जाणार आहे. यासाठी सरकारने खानापूरपासून नंदगड-कित्तूरमार्गे धारवाड हा रेल्वेमार्ग करण्यात यावा, यामुळे संगोळ्ळी रायण्णा यांच्या बलिदानाला योग्य न्याय दिल्यासारखे होईल, ऐतिहासिक रस्ता म्हणून नोंद असलेला नायकोल, कित्तूर या मार्गाचा वापर केल्यास या प्रकल्पाचा खर्चही फारच कमी येणार आहे. तसेच नंदगड, कित्तूर या ऐतिहासिक स्थळांनाही महत्त्व प्राप्त होणार आहे.
- पुंडलिक कारलगेकर-नंदगड
...तर खानापूरलाही जंक्शन होऊन महत्त्व वाढेल
सध्या खानापूरपासून कित्तूरला जोडणारा 60 फुटाचा रस्ता नकाशात नमूद आहे. याच रस्त्याचा विचार करून थोडाफार मार्गात बदल करून रेल्वे प्रशासनाने खानापूर, नंदगड, कित्तूरमार्गे धारवाड हा नवा रेल्वेमार्ग केल्यास खानापूरलाही जंक्शन तयार होऊन खानापूरचे महत्त्व वाढेल. तसेच नंदगड आणि कित्तूर या मार्गावर नव्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण होतील. नंदगड येथे संगोळ्ळी रायण्णा यांचे समाधीस्थळ असल्याने रेल्वे प्रशासनाने नंदगडवरुन नवा रेल्वेमार्ग केल्यास कित्तूर, नंदगड यांचा ऐतिहासिक वारसा जपल्यासारखे होईल.
- प्रकाश चव्हाण-खानापूर