अर्थव्यवस्थेत होणार तिसरा मोठा देश
एस अँड पी ग्लोबलचा अंदाज : 6.7 टक्के विकास दर राहणार : सार्वजनिक खर्चात कपात
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
2030-31 पर्यंत अर्थव्यवस्थेत भारत जगातील तिसरा सर्वात मोठा देश बनू शकतो, असा अंदाज रेटींग एजन्सी एस अॅण्ड पी ग्लोबल यांनी नुकताच वर्तविला आहे. गुरुवारी या अहवालातील माहिती देण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 6.7 टक्के दराने विकसित होण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 8.2 टक्के इतका विकास दर राखला असून लॉजिस्टीक क्षेत्रातील सुधारणा व सार्वजनिक खर्चात करण्यात आलेली कपात महत्वाची ठरली आहे. भारताचा शेअर बाजार सध्याला चांगली तेजी प्राप्त करत असून गुंतवणुकदारांचा विश्वास अधिक बळकट झाला आहे. भारत सरकारच्या बॉन्डमध्ये विदेशी गुंतवणूक वाढलेली आहे आणि आगामी काळात यामध्ये वाढीची शक्यताही एस अॅण्ड पी ग्लोबल यांनी आपल्या अहवालात वर्तविली आहे.
बंदरांचा विकास
समुद्रीमार्गे होणाऱ्या वाढत्या व्यापाराकडे पाहता देशातील बंदरांचा विकास गतीने होण्याची गरज आहे. याबाबतीमध्ये सरकार आग्रही असताना दिसते आहे. अलीकडेच वाढवण बंदराच्या विकासासाठी सरकारने घोषणा केलेली आहे. या योगे दक्षिण भारत, महाराष्ट्र तसेच उर्वरित भारतातील राज्यांमध्ये मालाची ने-आण करणे सोयीस्कर होणार आहे. देशात उर्जेची मागणी वाढत असून ही मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार सौरउर्जा, पवन उर्जा या सारख्या माध्यमातूनही प्रयत्न करत आहे.
समुद्रीमार्गे व्यापार
व्यापार आणि व्यवसाय वाढीसाठी भारताचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. भूराजकीय अस्थिर परिस्थितीच्या काळातही भारताची अर्थव्यवस्था योग्य त्या दिशेने वाटचाल करत आहे, हे विशेष. भारताचा 90 टक्के व्यापार हा समुद्री मार्गे होत असून निर्यात वाढीलाही संधी असणार आहे. पायाभूत सुविधांवर जास्तीतजास्त भर दिला जाणे गरजेचे असणार आहे.