‘ती’ बैठक रद्द झाल्याचे पूर्व रात्रीच कळविले होते
महापौरांचे स्पष्टीकरण : वाल्मिकी नाईक यांनी ज्येष्ठांची केली फसवणूक
पणजी : कॅसिनो विरोधकांशी दि. 12 रोजी बैठक निश्चित करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव ती रद्द करावी लागली व त्याबद्दल दि. 11 रोजी रात्रीच आपण स्वत: संदेश पाठवून दोघा सदस्यांना कळविले होते. त्याचे पुरावे आपण सादर करू शकतो. तरीही सर्व विरोधक जाणीवपूर्वक दुसऱ्या दिवशी मनपात आले. आप नेते वाल्मिकी नाईक यांनी त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली होती, असा दावा महापौर रोहित मोन्सेरात यांनी केला.
शनिवारी एका कार्यक्रमानिमित्त भाजप कार्यालयात आले असता विचारलेल्या प्रश्नावर मोन्सेरात यांनी वरील माहिती दिली. मला स्वत:ला कॅसिनो आवडत नाही. त्यामुळे कॅसिनोला आपला विरोधच आहे. परंतु त्यांना परवाने देणे वगैरे प्रक्रिया एकट्या मनपाच्याच कक्षेत येत नाहीत. त्यामुळे विरोधकांनी मनपात येऊन गोंधळ घालणे उचित नव्हते, असे ते म्हणाले. विरोधकांनी केवळ विरोध करण्यापेक्षा या कॅसिनोंमुळे शेकडो स्थानिकांना रोजगार आणि व्यवसाय मिळत आहे, याचा विचार केला पाहिजे. तरीही त्यांना कॅसिनो नको असतील तर रोजगाराचे पर्यायी मार्ग सुचवावे, असे मोन्सेरात यांनी सांगितले.
संभाव्य उमेदवारांची यादी तयार : मोन्सेरात
दरम्यान, यंदा आम्ही नवीन उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी प्रोत्साहित केले असून संभाव्य उमेदवारांची यादीही तयार आहे. त्यात बहुतेक नवीन चेहरे असतील. त्यांची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील व आचारसंहिता लागू झाल्यानंतर अधिकृत प्रचार सुरू होईल, असे मोन्सेरात यांनी सांगितले. लवकरच मनपाची व त्यानंतर पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असल्याने आता त्यांना जाग आली आहे. तरीही विरोध करण्यासाठी कोणतेही मुद्देच नसल्यामुळे कॅसिनोंसारखे मुद्दे निर्माण करून ते लोकांना भावनिक बनवत आहेत, असे मोन्सेरात म्हणाले.
यापूर्वीच्या कोणत्याही मंडळापेक्षा आमच्या कार्यकाळात अधिक कामे झाली आहेत. गेल्या तीन वर्षांपासून राजधानीत पावसाळ्यात उद्भवणारी पूरस्थिती यशस्वीपणे नियंत्रणात आणली आहे. आमच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रपतींच्या हस्ते पालिकेचा गौरवही करण्यात आला. अशावेळी विरोधकांना निवडणुकीसाठी कोणतेही ठोस मुद्दे सापडत नसल्यामुळे ते शेवटच्या क्षणी सक्रिय होऊन केवळ वैयक्तिक टीकेचे राजकारण करत आहेत, असा दावा त्यांनी केला.