आयटी समभागांमुळे शेअर बाजारात दबाव
सेन्सेक्स 572 अंकांनी नुकसानीत : सर्व क्षेत्राचे निर्देशांक घसरणीत
वृत्तसंस्था/ मुंबई
विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्याने तसेच आयटी समभागांच्या कमकुवत कामगिरीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअरबाजार सोमवारी नकारात्मक बंद झाला. सेन्सेक्स 572 अंकांनी घसरुन बंद झाला. कोटक बँक सर्वाधिक घसरणीत राहिली होती. सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 572 अंकांनी घसरुन 80891 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 156 अंकांनी घसरत 24680 अंकांवर बंद झाला. या आठवड्याच्या शेवटी अमेरिकेकडून व्यापारी शुल्काची टक्केवारी जाहीर केली जाण्याच्या पार्श्वभूमीवर आयटी समभागांमध्ये दबाव पहायला मिळाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 19 समभाग हे घसरणीसोबत तर उर्वरीत 11 समभाग तेजीसोबत बंद झाले. कोटक बँकेचा समभाग सर्वाधिक 7.10 टक्के इतका घसरला होता. टीसीएस व इन्फोसिस यांचे समभाग 1.5 टक्के नुकसानीत होते. टाटा मोटर्स व बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग दुसरीकडे तेजीत पाहायला मिळाले.
श्रीराम फायनान्स, सिप्ला, हिरो मोटोकॉर्प, एचयुएल, एशियन पेंटस यांचे समभाग तेजीत तर विप्रो, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, टायटन यांचे समभाग घसरणीत होते. निफ्टीत पाहता 50 पैकी 32 समभाग नुकसानीसह बंद झाले तर उर्वरीत 18 समभाग मात्र तेजीत होते. एनएसईवर सर्व क्षेत्रांचे निर्देशांक घसरणीत राहिले. रियल्टी 3.50 टक्के इतका घसरला होता. प्रायव्हेट बँक, आयटी आणि मीडिया यांच्या निर्देशांकात 2 टक्क्यांएवढी घसरण दिसली. निफ्टी बँक निर्देशांकही 444 अंकांनी घसरत 56084 अंकांवर बंद झाला होता. आशियाई बाजारात मिळताजुळता कल होता. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 150 अंकांनी घसरत 81,299 च्या स्तरावर खुला झाला होता. तर निफ्टीही घसरणीसोबत 24,782 अंकांवर खुला झाला होता. जपानचा निक्केई 0.43 टक्के घसरणीत तर दक्षिण कोरीयाचा कोस्पी 0.31 टक्के घसरणीत व्यवहार करत होता. अमेरिकेतील एस अँड पी-500 फ्युचर्स 0.39 टक्के, नॅस्डॅक 100 फ्युचर्स 0.53 टक्के आणि डाऊ जोन्स फ्युचर्स 156 अंकांनी तेजीत होता. शुक्रवारी अमेरिकेतील तीनही प्रमुख निर्देशांक तेजीसोबत बंद झाले होते.