आयटी समभागांची १८ वर्षानंतर सर्वाधिक साप्ताहिक वाढ
आयटी समभाग वेगावर स्वार : आठवड्यात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.75 लाख कोटींची वाढ
वृत्तसंस्था, मुंबई
जागतिक एआय समभागांमध्ये घसरण आणि मजबूत तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर भारतातील आयटी समभागांनी 18 वर्षांनंतर मागच्या आठवड्यामध्ये शेअरबाजारात सर्वाधिक साप्ताहिक तेजी नोंदवल्याचे पहायला मिळाले. या दरम्यानच्या आठवड्यामध्ये संबंधित गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 2.75 लाख कोटी रुपयांची वाढ झालेली दिसून आली.
जेपी मॉर्गन यांनी यापूर्वी आयटी समभागांबाबत तेजीचा अंदाज वर्तवला होता. जो अखेर मागच्या आठवड्यात खरा ठरला आहे. बाजारामध्ये तरलता बऱ्याप्रमाणामध्ये असून स्थानिक संस्थात्मक गुंतवणुकदारही आयटी समभाग खरेदी करण्यासाठी अग्रक्रम घेत आहेत. भारतीय सॉफ्टवेअर समभागांसाठी मागचा आठवडा हा खास राहिला आहे. जवळपास 18 वर्षांनंतर सदरचा आठवडा दमदार तेजी दर्शवत आयटी निर्देशांक बंद झालेला दिसून आला. गुंतवणूकदारांना सर्वोत्तम परतावा मिळवून देण्याचे काम केले आहे.
जागतिक बाजारामध्ये याउलट आर्टिफिशीयल इंटेलिजन्स समभागांची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसून आली होती. त्यामुळे तेथील बाजारांचा मूढ खराब पहायला मिळाला होता. याउलट भारतीय शेअर बाजार मात्र मागच्या आठवड्यात अखेरच्या सत्रामध्ये चांगल्या तेजीसमवेत बंद होताना पहायला मिळाला. निफ्टी मागच्या आठवड्यात जवळपास 2.78 टक्के इतका वाढला होता. तर सेन्सेक्स आठवड्यामध्ये 3.18 टक्के इतका वाढला. दोन्ही निर्देशांक सलग दुसऱ्या आठवड्यात तेजीत राहिले होते. 10 एप्रिल नंतरची ही सर्वाधिक मोठी साप्ताहिक वाढ होती.
15 सप्टेंबरला जे. पी. मॉर्गन यांनी आपले मत मांडताना, भारत हा पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विकसित होत आहे आणि शेअर बाजारामध्ये चांगली तरलता दिसून येणार असल्याचे म्हटले होते. त्याप्रमाणे आयटी समभागांनी मागच्या आठवड्यामध्ये चांगली कामगिरी केलेली दिसून आली. शुक्रवारी निफ्टीत 149 अंकांची वाढ दिसली ज्यात 94 अंक वाढीचे योगदान हे आयटी समभागांनी दिल्याचे दिसून आले.
समभाग चमकले
आयटी कंपन्यांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. टेक महिंद्राचा महसूल 15 टक्के वाढला आहे. यामुळे शुक्रवारी समभाग 8 टक्के वाढला होता तर संपूर्ण आठवड्यात समबाग 18 टक्के इतका वाढला. पण कंपनीचा नफा अंदाजापेक्षा तसा कमीच होता. विप्रोच्या नफ्यात मात्र कमी आली आहे. पण मार्जिनमध्ये सुधारणा झाल्याने समभाग शुक्रवारी 5.95 टक्के व संपूर्ण आठवड्यात 13 टक्के इतका वाढला होता. दुसरीकडे टीसीएसचा महसुल एआयमुळे 10 टक्के अधिक राहिला आहे. कंपनीचा समभाग 14 टक्के इतका वाढला आहे.स्पेशालिटी स्टीलच्या देशांतर्गत
अमेरिका, आशियाई बाजारात दबाव
अमेरिकेतील महागाई वाढल्याची आकडेवारी जारी झाल्याने अमेरिकेतील बाजारात घसरण होती. नॅसडॅक कम्पोझीट मंगळवारी व पुन्हा पुढील दोन दिवस घसरणीत होता. दक्षिण कोरीयाचा कोस्पीही 7.57 टक्के इतका घसरला होता. जपानचा निक्केई बाजारातही 4.9 टक्क्यांची घसरण होती. सोबत तैवान निर्देशांकही 3.4 टक्के इतका दबावात होता.