For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिन्याभरानंतर पाऊस बरसला

07:33 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
महिन्याभरानंतर पाऊस बरसला
Advertisement

उद्यमबाग, येडियुरप्पा, वडगाव शहापूर रोडवर गुडघाभर पाणी; वाहतूक कोंडीने वाहनधारक त्रस्त

Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना बुधवारी झालेल्या दमदार पावसाने काहीसा दिलासा मिळाला. दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहर परिसररासह ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. जोरदार पावसामुळे उष्णतेतूनही नागरिकांची सुटका झाली.

Advertisement

बुधवारी झालेल्या दमदार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. उद्यमबाग परिसरात पावसाचा जोर वाढताच रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. येडियुरप्पा रोडवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला. परिणामी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागून काही काळ वाहतूक कोंडी झाली. तसेच वडगाव-शहापूर रस्त्यावर मोठ्याप्रमानात पाणी साचल्याने पाण्यातून वाहने चालवावी लागली.

पावसाने दडी मारल्याने उष्णतेमध्येही वाढ झाली होती. मंगळवारी थोडाफार पाऊस झाला होता. मात्र बुधवारी झालेल्या पावसामुळे नागरिकांना बऱ्याच प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अनेक ठिकाणी विजाही पडल्या. त्यामुळे झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. परिणामी वीजपुरवठा खंडित झाला होता.

शेतकऱ्याच्या आशा पल्लवित

गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने भातासह विविध पिके पाण्याअभावी करपू लागली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. बुधवारी झालेल्या पावसाने जमिनीला चांगला ओलावा मिळाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. परंतु अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने  बटाटा, रताळी, भुईमूग, सोयाबीन आदी पिके कोलमडली आहेत. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. आता पुढील काही दिवस पावसाची साथ मिळाल्यास भातासह अन्य पिकांना मोठा आधार मिळण्याची आशा बळीराजाला आहे.

येडियुरप्पा रोडवर गुडघाभर पाणी

शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शहराकडे येणाऱ्या येडियुरप्पा रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अनेक ठिकाणी गटारी तुडुंब भरल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आले. अनेक सखल भागातील रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहनांना मार्ग मिळाला नाही. त्यामुळे वाहनांना पाण्यातूनच मार्ग शोधत वाहने बाहेर काढावी लागली. कंग्राळी-नेहरुनगर आदी भागातही जोरदार पाऊस बरसला. वीज कोसळल्याने नेहरुनगर येथील रस्त्याच्या दुभाजकांवरील एका झाडाची फांदी कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

Advertisement
Tags :

.