For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आत्मसुखाच्या वैशिष्ट्यांचे आकलन होणे इंद्रियांच्या कुवतीच्या बाहेरचे आहे

06:31 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
आत्मसुखाच्या वैशिष्ट्यांचे आकलन होणे इंद्रियांच्या कुवतीच्या बाहेरचे आहे
Advertisement

भगवंत अर्जुनाला म्हणाले, योगाभ्यास करण्याची पात्रता येण्यासाठी समोर दिसणाऱ्या नाशवंत वस्तूंची ओढ आवरून धरावी लागते. देहाच्या गरजा कमी केल्या की ते साधते. ज्याचे खाणे व हिंडणे नियमित आहे, जो सर्व कार्यामध्ये मर्यादा सांभाळतो, ज्याची निद्रा व जागर मर्यादित आहे, त्यालाच संसाररूपी दु:खाचा नाश करणारा योग साध्य होतो. त्यासाठी देहरक्षण होण्यापुरते अन्न खावे, मोजके शब्द बोलावेत, नियमित पावलांनी चालावे, योग्य वेळेला झोपेलाही मान द्यावा.

Advertisement

एखाद्या दिवशी जागणे जरी झाले तरी तेही परिमितच असावे. असे करत गेल्याने अनायासे कफवातादि सर्व धातूंची समता राहते. अशा स्थितीत अभ्यासाचे कष्ट न पडता योगाभ्यास होतो. ह्याप्रमाणे नियमाने वागणारा पुरुष ईश्वरी कृपेने योगाभ्यासाकडे वळला की, त्याला आत्मप्राप्ती होते. त्याला मोक्षाचे राज्य मिळते. त्याला योगयुक्त म्हणता येईल. त्या पुरुषाच्या मनाच्या स्थितीला कोनाड्यात शांतपणे तेवणाऱ्या दीपाची उपमा देणे योग्यहोईल.

तू आत्मप्राप्तीची इच्छा बाळगतोस, परंतु अभ्यास करण्याविषयी तत्पर नाहीस. तसेच यात कष्ट आहेत, असा तुझ्या मनाचा ग्रह झाला असेल, तर ते चुकीचे आहे हे लक्षात घे. माणसाची दुष्ट ज्ञानेंद्रिये त्याला त्याच्या मनात येणाऱ्या विचारांनुसार निरनिराळी आकर्षणे दाखवून मायेच्या जाळ्यात ओढत असतात आणि त्यांना आवरणे माणसाला कठीण होऊन बसते म्हणून माणसाला मनाला आवर घालून योगाभ्यास करणे कष्टाचे वाटते. आपल्याला आजारातून बरे करणारे औषध जिभेला कडू वाटते. त्याप्रमाणे ज्या गोष्टी आपल्या हिताच्या असतात त्या इंद्रियांना सदोदित दु:खकारक वाटतात. येर्हवी योगासारखे सोपे काही आहे काय? मी योगाभ्यास सोपा आहे असं म्हणतोय कारण मी सांगितल्याप्रमाणे तो केला तर इंद्रियांना आपोआपच आळाबसतो.

Advertisement

पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, योगाच्या अभ्यासाने नियमन पावलेले चित्त विषयांपासून परावृत्त होते, त्यामुळे योग्याला त्याच्यातील आत्म्याची भेट घडून तो संतोष पावतो.

निरोधे जेथ चित्ताचा सर्व संचार संपला। जेथ भेटूनि आत्म्याते अंतरी तोषला स्वये।।20 ।।

श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, इंद्रियांचा निग्रह साध्य झाल्याने, मनात येणारे विचार थोपवण्यात साधक यशस्वी होतो. परिणामी त्याच्या चित्तातील विषयांचे चिंतन थांबते. मग त्याची ज्ञानेंद्रिये निक्रिय होतात. चित्त, विषयांच्या चिंतनातून मुक्त होऊन आत्मस्वरूपाचे चिंतन करू लागते. ज्यावेळी त्यास स्वस्वरूपाची ओळख पटते त्यावेळी ते तत्व मी आहे अशी जाणीव त्याला होऊ लागते.

पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, हे सुख सर्वोत्कृष्ट असून ते केवळ बुद्धीने प्राप्त होते. हे सुख भोगत असतांना योगी आपल्या स्वरूपापासून ढळतनाही.

भोगूनि इंद्रियातीत बुद्धि-गम्य महा-सुख । न ढळे चि कधी जेथ तत्त्वापासूनि लेश हि ।। 21 ।।

मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे योग्याचे चित्त विषयांच्या चिंतनातून मुक्त होऊन आत्मस्वरूपाचे चिंतन करू लागते. चिंतन करता करता त्याला ते सुख मी आहे अशी जाणीव त्याला होऊ लागते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.