वर्ल्ड टी-20 स्पर्धेसाठी रिंकू सिंगची निवड न होणं दुर्दैवी
रोहित-आगरकर यांचे प्रतिपादन : समतोल संघ साधण्यासाठी केएलसह रिंकू संघाबाहेर : विराट, शिवम दुबेवरही चर्चा
वृत्तसंस्था /मुंबई
वेस्ट इंडिज व अमेरिकेत होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी नुकताच भारताचा 15 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला. या संघात फिनिशर रिंकू सिंग व माजी उपकर्णधार केएल राहुल यांचा समावेश नसल्याने सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, गुरुवारी कर्णधार रोहित शर्मा व निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत रिंकू व केएल राहुल यांना का वगळले याचे स्पष्टीकरण दिले आहे. रिंकूला संधी दिली नाही, याबाबत निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर म्हणाले की, भारतीय संघाची निवड करत असताना हा सर्वात कठीण निर्णय आमच्यासाठी होता. रिंकूने काहीच चुकीचे केलेले नाही किंवा त्याच्याकडून कोणतीही चूक घडलेली नाही. खरं सांगायचं तर शुभमन गिलला रिंकूसारखी कामगिरी करता आलेली नाही. पण जेव्हा तुम्ही संपूर्ण संघाचा विचार करता तेव्हा फक्त एका खेळाडूचा एवढा जास्त विचार करून चालत नाही. वर्ल्ड कपचा संघ निवडताना फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक या सर्वांचा विचार करावा लागतो. वर्ल्ड कपच्या संघात रोहितला फिरकी गोलंदाजांचा जास्त पर्याय असावा असे वाटत होते आणि आम्ही एक अतिरीक्त फिरकीपटू संघात आणला. मी रिंकूबाबत फक्त दुर्दैव असेच म्हणू शकतो. रिंकूची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे तो संघाबरोबरच असेल. पण सरतेशेवटी तुम्हाला संघात 15 खेळाडूच निवडता येतात, असेही ते यावेळी म्हणाले.
केएलचाही पत्ता कट, याचेही थेट उत्तर
केएल राहुल हा उत्कृष्ट फलंदाज आहे, परंतु आम्हाला मधल्या षटकांमध्ये वेगाने फलंदाजी करु शकेल अशा फलंदाजाची गरज होती. राहुल सध्या आयपीएलमध्ये आपल्या संघासाठी सलामीला खेळत आहे. संघात सध्या कोणत्या जाग रिक्त आहेत, यावरुन हा निर्णय घेण्यात आला आहे आणि आम्हाला असे वाटले की ऋषभ पंत आणि संजू सॅमसन मधल्या फळीत वेगाने फलंदाजी करुन जबाबदारी सांभाळू शकतात, असे उत्तर आगरकर यांनी दिले.
हार्दिक अष्टपैलू खेळाडू, शिवमची आयपीएलमध्ये दमदार कामगिरी
हार्दिकबाबत रोहित म्हणाला की, प्रत्येक संघात अष्टपैलू खेळाडूंची एक महत्वाची भूमिका असते. हार्दिक हा एक असा खेळाडू आहे की, तो कोणत्याही क्षणी संघासाठी गोलंदाजी करू शकतो आणि त्याने ते करूनही दाखवले आहे. त्यामुळेच अष्टपैलू खेळाडूची भूमिका तो योग्यपणे बजावताना दिसतो. मिडल ऑर्डरमध्ये विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंची गरज होती. त्यामुळे आम्ही शिवम दुबे याला संधी दिली. शिवमला आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर संघात स्थान दिले आहे. त्याआधीही त्याने अनेक सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. सध्याच्या घडीला प्लेईंग 11 बद्दल सांगू शकत नाही. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर खेळपट्टी आणि कंडिशन पाहून प्लेईंग 11 चा निर्णय घेण्यात येणार असल्याचे रोहितने यावेळी सांगितले.
विराटचा स्ट्राईक रेट
विराट कोहलीचा स्ट्राइक रेट हा सध्याच्या घडीला चिंतेचा विषय ठरला आहे. कारण कोहली मोठी खेळी साकारतो, पण जास्त चेंडू त्यासाठी वापरतो. यामुळे कोहलीवर आयपीएल सुरु असताना जोरदार टीका केली जात आहे. पण तरीही त्याला टी-20 संघात स्थान देण्यात आले आहे. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर व रोहित शर्मा यांनी अखेर मौन सोडले आहे. विराट हा एक अनुभवी क्रिकेटपटू आहे. सध्या आयपीएलमध्ये तो भन्नाट फॉर्ममध्ये आहे. विराटकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव एवढा जास्त आहे की, त्याच्या स्ट्राइक रेटची चर्चा त्याला टी-20 संघात स्थान देताना झाली नसल्याचे आगरकर यांनी स्पष्ट केले.