महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चोरावर मोर नव्हे चोरच ठरताहेत शिरजोर

11:10 AM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चोऱ्या-घरफोड्यांच्या सत्रांमुळे बेळगावकर हैराण : काळानुरूप चोरी पद्धतीत बदल, चोरही घेताहेत खबरदारी

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. संपूर्ण पोलीस यंत्रणा कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तात गुंतलेली असताना गेल्या आठवड्यात तर गुन्हेगारांनी अक्षरश: उच्छाद मांडला. केवळ बंद घरेच नव्हे तर घरातील मंडळी असतानाही चोऱ्या करण्याचे प्रकार सुरू आहेत. या घटनांनी बेळगावकर हैराण झाले आहेत.  4 ते 15 डिसेंबरपर्यंत कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात झाले. या काळात बंदोबस्तासाठी संपूर्ण राज्यातून तब्बल 5 हजार पोलीसबळ मागविण्यात आले होते. बेळगाव पोलिसांवरही अधिवेशन बंदोबस्ताबरोबरच शहरातील इतर घडामोडींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती. मात्र, चोरट्यांनी याच काळात अधिकाधिक घरफोड्या केल्या आहेत. गेल्या आठवड्यात आनंदनगर वडगाव, केशवनगर, अनगोळ येथील कनकदास कॉलनी, देसूरसह विविध ठिकाणी दहाहून अधिक चोरीच्या घटना घडल्या आहेत. शहापूर, टिळकवाडीसह वेगवेगळ्या पोलीस स्थानकात या चोरी प्रकरणांची नोंद झाली आहे. अधिवेशन बंदोबस्तात गुंतलेली पोलीस यंत्रणा अधिवेशनानंतर मोकळी झाली आहे. या यंत्रणेसमोर चोरी प्रकरणांच्या तपासाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. यापूर्वी चोऱ्या, घरफोड्यांसह मोटारसायकली चोरणाऱ्या अनेक गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली आहे. यापैकी बरेच जण कारागृहात आहेत. तरीही बेळगावात चोऱ्या-घरफोड्यांचे सत्र थांबता थांबेना. स्थानिक गुन्हेगारांबरोबरच परप्रांतीय गुन्हेगारांच्या टोळ्या बेळगावात सक्रिय असल्याचा संशय आहे. त्यामुळेच चोऱ्या-घरफोड्यांचे सत्र थांबेना.

Advertisement

गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे तपास यंत्रणेला अवघड

पोलीस दलात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी जशी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते, तशी गुन्हेगारी रोखण्यासाठी, घडलेल्या प्रकरणांच्या तपासासाठी गुन्हे तपास विभागही असतो. घटनास्थळावरून मिळणारे धागेदोरे, ठशांचे नमुने तपासून गुन्हेगारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक गुन्हेगाराची गुन्हे करण्याची कार्यपद्धत वेगळी असते. यावरून तपास करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, सध्या गुन्हेगारही तपास अधिकाऱ्यांपेक्षा एक पाऊल पुढे पोहोचू लागले आहेत. त्यामुळेच गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे तपास यंत्रणेला अवघड जात आहे.

वेगवेगळ्या क्लृप्त्यांचा वापर

पोलिसांना घटनास्थळावर ठशांचे नमुने मिळू नयेत, यासाठी गुन्हेगार पुरेपूर खबरदारी घेतात. हँडग्लोव्हजचा वापर करून चोऱ्या केल्या जातात. श्वानपथकाची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जातात. त्यामुळेच तपास यंत्रणांना गुन्हेगारी टोळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकची धडपड करावी लागते आहे. आंतरराज्य गुन्हेगारांची माहिती मिळविण्यासाठी अधूनमधून महाराष्ट्र, गोवा पोलिसांबरोबर बॉर्डर क्राईम मिटिंगही घेतल्या जातात. वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करूनही गुन्हेगारी टोळ्यांपर्यंत पोहोचणे यंत्रणेला जेव्हा अवघड बनते, त्यावेळी तपास अधिकारी खबऱ्यांचा वापर करतात. सध्या बेळगाव पोलीस दलातील परिस्थिती लक्षात घेता खबऱ्यांचे जाळे विणण्यात कोणत्याच अधिकाऱ्याला रस नसल्याचे दिसून येते. खबरी हे गुन्हेगारी टोळीतीलच असतात. त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली जाते. अधिकाऱ्यांवर खुश असणारे खबरीच त्यांना नियमितपणे माहिती पुरवत असतात. सध्या या प्रक्रियेत अधिकाऱ्यांना रस नसल्याचे जाणवते.

गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज

चोऱ्या घरफोड्यांपाठोपाठ चेन स्नॅचिंगच्या घटनाही वाढल्या आहेत. वडगाव, माळमारुती परिसरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. यापैकी कोणत्याच घटनेचा तपास लागलेला नाही. वडगाव परिसरातील चोरीच्या घटनेनंतर तर स्थानिक नागरिकांनीच रात्रीची गस्त घालण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही बेळगावात असे प्रयोग झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास उडण्याआधी गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्या आवळून नागरिकांना भयमुक्त करण्याची जबाबदारी पोलीस अधिकारी पार पाडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लवकरच मुसक्या आवळू

यासंबंधी गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्याशी संपर्क साधला असता शहर व उपनगरातील चोऱ्या, घरफोड्यांचा तपास सुरू आहे. काही गुन्हेगारी टोळ्या पोलिसांच्या टप्प्यात आहेत. लवकरच काही टोळ्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात येतील, असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article