For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेपत्ता मच्छीमाराचा खून झाल्याचे उघडकीस

06:03 AM Jan 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेपत्ता मच्छीमाराचा खून झाल्याचे उघडकीस
Advertisement

मृतदेह समुद्रात फेकून दिला, सहकाऱ्यांवर संशय

Advertisement

प्रतिनिधी/ वास्को

वास्कोतील किनाऱ्यांपासून काही अंतरावरील खोल समुद्रात काही दिवसांपूर्वी आढळून आलेल्या मच्छीमाराचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. या खून प्रकरणी हार्बरच्या सागरी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. मयत मच्छीमाराचे नाव पद्मलोचन सलीमा (वय 20) असे असून तो मूळ ओरिसा राज्यातील आहे. दि. 8 पासून मयत मच्छीमार बेपत्ता होता. सहकारी मच्छीमारांनी त्याचा खून केला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

हार्बरच्या सागरी पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मयत पद्मलोचन सलीमा हा मच्छीमार 8 जानेवारीच्या रात्री एकूण 32 मच्छीमारांसोबत मालीम जेटीवरून खोल समुद्रात मासेमारीसाठी बाहेर पडला होता. मात्र, तिसऱ्या दिवशी सकाळी परत धक्क्यावर येताच पद्मलोचन हा मच्छीमार गायब झाल्याचे दिसून आले. इतर मच्छीमारांनी त्याच्या ठावठिकाण्याबाबत कानावर हात ठेवले. त्यामुळे मच्छीमारी ट्रॉलरचा मालक कोंडीत सापडला होता. त्यांनी आपला मच्छीमार बेपत्ता असल्याची तक्रार पर्वरीच्या पोलीस स्थानकात केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास केला. मात्र, त्याचा ठिकाणा लागू शकला नाही. दि. 12 रोजी बेपत्ता मच्छीमाराचा मृतदेह खोल समुद्रात कुजलेल्या अवस्थेत नौदलाच्या हाती लागला. त्यांनी हा मृतदेह हार्बरच्या सागरी पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलीस तपासात हा मृतदेह बेपत्ता मच्छीमाराचा असल्याचे जवळपास उघडकीस आले. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून हे प्रकरण नोंद केले. त्यानंतर त्या मच्छीमाराच्या पालकांना आणून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. सदर मृतदेह पद्मलोचन या मच्छीमाराचाच असल्याची खात्री पटल्यानंतर शवचिकित्सा करण्यात आली. या शवचिकित्सा अहवालात मात्र, धक्कादायक माहिती उघड झाली. मयत मच्छीमार पद्मलोचन याच्या बरगड्यांना गंभीर इजा झाल्याचे आढळून आले. त्याच्या छातीवर वजनदार वस्तूने प्रहार करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याला मासेमारी दरम्यान कुणी तरी मारहाण करून समुद्रात फेकले असण्याचा संशय बळावला आहे.

सागरी पोलिसांनी या मृत्यूप्रकरणी अज्ञाताविऊद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. एखाद्या मच्छीमाराचे व मयत पद्मलोचन याचे भांडण झाले असावे व त्यातूनच हा खून झाला असावा असा संशय आहे. त्याला बुडून मृत्यू आला असे भासवण्यासाठी समुद्रात फेकण्यात आले आहे. हार्बर सागरी पोलीस निरीक्षक प्रदीप वेळीप या खून प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.