भक्तियुक्त भावनेने माझ्यामध्ये लीन होणे शक्य आहे
अध्याय आठवा
यज्ञ, दान, तप करणाऱ्यांना तसेच शास्त्राभ्यास करणाऱ्यांना विश्वरूप दिसत नाही कारण त्यांचा अहंभाव, मी कर्ता आहे हा दृढसमज गेलेला नसतो. जोपर्यंत अहंभाव, कर्तेपणाची भावना समूळ नष्ट होत नाही तोपर्यंत समोर दिसणाऱ्या जगाचे आकर्षण नष्ट होत नाही. त्यामुळे त्यांना विश्वरूपाचे दर्शन होत नाही. केवळ ईश्वराप्रति असलेला भक्तिभाव व त्यातून निर्माण होणारी मी नाही आणि तू आहेस ही दृढभावनाच भक्ताला विश्वरूप बघण्यास लायक बनवते. सर्व विषयांची गोडी नाहीशी होऊन ती बाप्पांच्या ठिकाणी अखंड लागून राहिली की, बाप्पांचे स्वरूप भक्ताला दिसते. ईश्वराच्या दर्शनासाठी तो तळमळत असतो. त्या व्याकुळतेत आत्मज्ञान प्रकट होऊन त्या अग्नीत त्याची अनंत जन्मांची, अनंत पापे भस्म होऊन जातात. आयुष्याच्या शेवटी बाप्पा त्याला त्यांच्यात सामावून घेतात.
अशा भक्ताला ईश्वराचे दर्शन होऊ शकते. ज्ञानमार्गाने जाणारा साधक अहंकारी असू शकतो पण भक्तिमार्गाने जाणारा भक्त त्याचं सर्वस्व ईश्वराला अर्पण करतो. त्यामुळे त्याला अहंकाराचा वारा सुद्धा लागत नाही. भक्ताला केवळ बाप्पांचा आधार वाटत असतो. त्याची सर्व आशा त्यांच्यावर केंद्रित झालेली असते. बाप्पांच्यावर त्याचा पूर्ण विश्वास असतो. ते करतील ते त्याच्या भल्याचंच आहे अशी त्याची संपूर्ण खात्री त्याला असते. ही श्रद्धा, बाप्पांच्याबद्दल मनात असलेल्या आदर भावातून त्याच्या मनात रुजलेली असते. परमात्म्याच्या सगुण रूपाचे त्याला वेड लागलेले असल्याने त्याची आजूबाजूच्या मायेच्या पाशातून त्याच्याही नकळत त्याची अलगद सुटका होते. वरेण्यराजाही बाप्पांचा अनन्य भक्त होता. त्याच्या विनंतीवरून बाप्पांनी त्याला विश्वरूप दाखवले. त्याला बाप्पांनी दिव्यदृष्टी दिलेली असल्याने तो बाप्पांचे विश्वरूप पाहू शकला पण त्याला बाप्पांच्या स्वरूपसुंदर, मनमोहक अशा सगुण रूपाचे वेड लागलेले होते. त्यामुळे विश्वरूपाची भव्यता, दाहकता, अक्राळविक्राळपणा त्याला झेपला नाही.
म्हणून तो बाप्पांकडे नेहमीचे मनमोहक सौम्यरूप दाखवा म्हणून हट्ट करू लागला. बाप्पांनी त्याची अडचण जाणली. त्यांनी वरेण्याला दिलेली दिव्यदृष्टी काढून घेतली. त्यामुळे त्याला पुन्हा मायेचं जग दिसू लागलं. बाप्पा म्हणाले, भक्तियुक्त भावनेच्या योगाने पाहणे, जाणणे व मजमध्ये लीन होणे शक्य आहे. भीती व मोह टाक आणि सौम्यरूपधारी मला पहा. ह्या अर्थाचा शक्योऽहं वीक्षितुं ज्ञातुं प्रवेष्टुं भक्तिभावतऽ । त्यज भीतिं च मोहं च पश्य मां सौम्यरूपिणम् ।। 25 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार बाप्पा पुन्हा सौम्य रूपात प्रकटले. त्यामुळे वरेण्याला अतिशय संतोष वाटला. भक्ताचं महात्म्य सांगताना बाप्पा कधी थकत नाहीत. कारण प्रिय व्यक्तीबद्दल किती बोलावं तेव्हढं थोडंच असं प्रत्येकालाच वाटत असतं. बाप्पाही त्याला अपवाद नाहीत म्हणून पुढील श्लोकात ते सांगतात,
मद्भक्तो मत्परऽ सर्वसंगहीनो मदर्थकृत् ।
निक्रोधऽ सर्वभूतेषु समो मामेति भूभुज ।। 26।।
अर्थ- हे भूपा, मत्पर, सर्वसंगरहित, माझ्याकरितां सर्व कर्मे करणारा, क्रोधरहित, सर्वांना समान वागणूक देणारा भक्त मजप्रत येतो.
विवरण- बाप्पा सांगतायत, माझा भक्त मत्पर असतो म्हणजे मी सांगतो त्याप्रमाणे आणि तेव्हढेच करणारा असतो. त्यामुळे तो स्वत:चा स्वभाव मागे टाकून माझेच रूप घेऊन वावरत असतो. हे समजलं तरी करणं फार कठीण असतं. कारण माणसाचा मूळ स्वभाव बदलणं जवळजवळ अशक्य असतं. एकवेळ दोरी जळेल पण त्याचा पीळ जळत नाही. त्याप्रमाणे आयुष्य संपत आलं तरी माणसाचा स्वभाव बदलत नाही.
क्रमश: