वीरशैव लिंगायत समाजाला पुढे नेणे आवश्यक
मंत्री ईश्वर खंड्रे ; वीरशैव लिंगायत विद्यार्थिनींच्या मोफत वसतिगृहाचे उद्घाटन : मुलींसाठी वसतिगृहाची इच्छा सफल
बेळगाव : राज्यात वीरशैव लिंगायत समाज मोठा असूनही समाजाची वाटचाल धिम्यागतीने सुरू आहे. यासाठी संघटित होऊन कार्य झाले पाहिजे. शिक्षण क्षेत्र, समाजाच्या वाढीसाठी मठ, संघ-संस्थांचे भरीव योगदान आहे. संघटनेतून समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असे मत वनमंत्री व वीरशैव लिंगायत महासभेचे महासचिव ईश्वर खंड्रे यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय वीरशैव महासभेतर्फे सुभाषनगर,बेळगाव येथे उभारण्यात आलेल्या वीरशैव लिंगायत विद्यार्थिनींच्या मोफत वसतिगृहाचे उद्घाटन व दानशूर स्व. अन्नपूर्णा बसलिंगप्पा बेल्लद, कब्बूर नामकरण असा संयुक्त कार्यक्रम गुऊवारी (दि. 11) झाला. याप्रसंगी मंत्री खंड्रे बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सभापती बसवराज होरट्टी म्हणाले, केएलई, बीव्हीबी, बीएलडी यासारख्या अनेक संस्था समाजासाठी भरीव योगदान देत असून समाजाने एकजुट दाखविल्यास राजकीय सामर्थ्यही मिळविणे शक्य आहे. वीरशैव लिंगायत ही एक शक्ती बनविण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले. मंत्री एम. बी. पाटील यांनी आपल्या भाषणात, डॉ. प्रभाकर कोरे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य मोलाचे असून त्यांच्या सेवेला आमचे नेहमी सहकार्य असेल, असे सांगितले.
आपल्या समाजातील मुली शिक्षणात पुढे याव्यात असा संकल्प करून डॉ. कोरे यांनी केलेले कार्य मोठे आहे, असे मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ. कोरे यांनी, वसतिगृह उभारण्याचा उद्देश स्पष्ट केला. पदवी, उच्चशिक्षण घेण्यासाठी बेळगावात येणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलींसाठी वसतिगृह उभारण्याची इच्छा अनेक दिवसांपासूनची होती, असे ते म्हणाले. त्यानंतर, कारंजीमठाचे गुऊसिद्ध महास्वामी यांचे आशीर्वादपर भाषण झाले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, महासभेचे राज्य अध्यक्ष शंकर बिदरी, उद्योजक व दानशूर महेश बेल्लद, आमदार राजू कागे, महांतेश कौजलगी, गणेश हुक्केरी, चन्नराज हट्टीहोळी आदी उपस्थित होते.