For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युनुस सरकार उखडणे आवश्यक

06:43 AM Jan 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
युनुस सरकार उखडणे आवश्यक
Advertisement

बांगलादेश नेत्या शेख हसीना यांचे आवाहन

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

बांगलादेशात सध्या हिंसाचाराने थैमान घातले आहे. निरपराध्यांचे रक्त सांडले जात आहे. देशातील शांतता आणि विश्वासार्हता नष्ट झाली आहे. या साऱ्या नष्टचर्याला मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील अकार्यक्षम अंतरिम प्रशासन उत्तरदायी आहे. त्यामुळे हे सरकार उखडून फेकले जावे, असे आवाहन बांगलादेशच्या पदच्युत नेत्या शेख हसीना यांनी केले आहे. हसीना या सध्या भारताला वास्तव्य करीत आहेत. आपली स्थिती परागंदा लोकशाहीप्रमाणे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले असून आपल्या मातृभूमीची स्थिती पहावत नाही, असे प्रतिपादन केले.

Advertisement

ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशात तेथील सरकारविरोधात युवकांचे आंदोलन झाले होते. या आंदोलनामुळे त्यावेळच्या नेत्या शेख हसीना यांना आपली सत्ता सोडून देशत्याग करावा लागला होता. तेव्हापासून हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. शुक्रवारी त्यांनी बांगलादेशातील घडामोडींच्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया दूरध्वनीवर व्यक्त केली. मात्र, सुरक्षेच्या करणास्तव त्यांनी व्हिडीओग्राफीचा उपयोग केला नाही. बांगलादेशातील सध्याचे अंतरिम सरकार ‘फासिस्ट’ प्रवृत्तीचे असून त्याच्यामुळे देशाची अपरिमित हानी होत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

देशवासियांना कळकळीचे आव्हान

बांगलादेशच्या नागरिकांनी युनुस सरकारला संपविणे आवश्यक आहे. युनुस यांचे स्वत:च्या जनतेकडे लक्ष नाही. त्यांना केवळ सत्तेत स्वारस्य आहे. देशातील जनतेने आता लोकशाही वाचविण्यासाठी हा संघर्ष आपल्या हातात घेतला पाहिजे आणि या भ्रष्ट आणि अकार्यक्षम सरकारला उखडले पाहिजे. हे सरकार जाईपर्यंत जनतेने आंदोलन थांबविता कामा नये. हे देशविघातक सरकार आता गेलेच पाहिजे. जनतेने हे उत्तरदायित्व स्वीकारावे, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

फेब्रुवारीत निवडणूक

बांगलादेशात 12 फेब्रुवारी 2026 या दिवशी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षावर निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याचा निर्णय तेथील प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या पक्षाचे कार्यकर्ते या निवडणुकीत अपक्ष म्हणून, किंवा तर पक्षांच्यामधून निवडणुकीच्या संग्रामात आहेत. बांगलादेश नॅशनल पक्ष आणि जमाते इस्लामी हे पक्ष एकमेकांशी प्रमुख स्पर्धा करीत आहेत. जमाते इस्लामी हा अत्यंत धर्मांध पक्ष असून तो सत्तेवर आल्यास भारतासाठीही ती स्थिती सुखावह असणार नाही, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.

भारतासाठी असमतोल स्थिती

भारताने शेख हसीना यांना आश्रय दिला आहे. तथापि, बांगलादेशसमवेत सौहार्दपूर्ण संबंध राखण्याचा प्रयत्न चालविला आहे. बांगलादेशात धर्मांधांचे सरकार प्रस्थापित झाल्यास भारतालाही आपल्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलणे भाग पडेल. सध्या भारत तणाव वाढू नये, म्हणून प्रयत्नशील आहे. तथापि, मोहम्मद युनुस यांनी बांगलादेशला कट्टर इस्लामी देश बनविण्याचा चंग बांधल्याचे दिसून येते. भारताचा ईशान्य भाग भारतासून तोडण्याची भाषा मध्यंतरीच्या काळात त्यांनी चालविली होती. तसेच चीनशीही या संदर्भात संधान बांधण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भारत युनुस यांच्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष ठेवून आहे.

बीएनपीला आशा

बांगलादेशातील या स्थितीला लाभ उठविण्याचा प्रयत्न तेथील बांगलादेश नॅशनल पक्ष करीत आहे. या पक्षाच्या नेत्या बांगलादेशच्या तीन वेळा नेत्या राहिलेल्या खलिदा झिया यांचे नुकतेच निधन झाले आहे. तथापि, त्यांचे पुत्र रहमान हे ब्रिटनमधून बांगला देशात परतले असून त्यांनी आपला पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरविला आहे. त्यांच्या पक्षाला विजयाची आशा आहे.

Advertisement
Tags :

.