सहा महिन्यांतून एकदा अधिवेशन होणे आवश्यक : सभापती
मडगाव : सहा महिन्यांतून विधानसभेचे अधिवेशन होणे आवश्यक असल्याचा नियम आहे. या नियमाचे उल्लंघन होऊ नये यासाठीच मंत्रिमंडळाने दोन दिवसांचे अधिवेशन बोलावले असल्याची माहिती सभापती रमेश तवडकर यांनी काल मडगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. दोन दिवसांचे अधिवेशन बोलावण्यात आल्याने विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात सभापती रमेश तवडकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, सभापती तवडकर म्हणाले की, सहा महिन्यांतून एकदा तरी विधानसभेचे अधिवेशन होणे आवश्यक आहे. तसा नियम आहे. त्यामुळे हे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. विरोधक टीका करतात, त्याला काहीच अर्थ नाही. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च महिन्यात होण्याची शक्यता असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे तवडकर यांनी यावेळी सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधीही जास्त असेल, असे ते म्हणाले.