केंद्रात काँग्रेसचे सरकार येणे गरजेचे
काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांचे प्रतिपादन
कारवार : गेल्या दहा वर्षापासून आमचा देश संकटात सापडला आहे. देशाला संकटमुक्त करायचे झाल्यास केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार येणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले. त्या गुरूवारी नंदनगद्दा कारवार येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या प्रचारसभेत बोलताना पुढे म्हणाल्या, भाववाढीमुळे देशवासीय भरडले जात आहेत. तथापी गरिबांची काळजी भाजप सरकारला नाही. गरिबाकडून गोळा केलेली रक्कम वापरून अदानी, अंबानी यांना श्रीमंत करण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून केले जात आहेत. देशातील युवा पिढीला भाजपवाले व्हॉट्सअॅप, फेसबुक, युनिवर सिटीच्या माध्यमातून चुकीच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात गरिबासाठी एक तरी कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी केली आहे का? असा प्रश्न उपस्थित करून निंबाळकर पुढे म्हणाल्या, मोदी यांनी रेडिओच्या माध्यमातून ‘मन की बात’ कार्यक्रम करण्याऐवजी जनतेमध्ये जाऊन त्यांचे सुख दु:ख जाणण्याचा एकदा तरी प्रयत्न केला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. कर्नाटक भीषण दुष्काळाच्या विळख्यात सापडले आहे. तथापी मोदी यांनी दुष्काळावर भाष्य केलेले नाही. भाजपवाल्याना प्रचाराची फार मोठी हौस आहे. जनतेच्या समस्या आणि समस्यांच्या निवारणाशी त्यांचे काही एक देणेघेणे नाही. कारवार मतदार संघातील भाजपचे उमेदवार आपणाला नव्हे तर वर (दिल्ली) पाहून भाजपला मतदान करा असे आवाहन सातत्याने करीत आहेत. सहावेळा आमदार एकवेळ मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष अशी सेवा बजावलेल्या विश्वेश्वर हेगडे यांच्या तुलनेत आपण लहान आहे. तथापी विकासाच्या अभिवृद्धीच्या बाबतीत आपण हेगडे यांच्या तुलनेत एक पाऊल पुढे असल्याचा दावापुढे निंबाळकर यांनी केला.
भाजपवाल्यांच्या तोंडात केवळ जात अन् धर्म
याप्रसंगी कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल म्हणाले, भाजपवाल्यांच्या तोंडात जात अन् धर्माच्या पलीकडे अन्य काही एक नाही. भाजपच्या दहा वर्षाच्या राजवटीत गरिबांचे शोषण, शेतकऱ्यांवर दडपण, महिलावर सातत्याने अत्याचार प्रकरणे सातत्याने सुरू आहेत. तथापी गरिबांबद्दल विचार करायला यांच्याकडे वेळ नाही. अदानी, अंबानी यांची कर्जे माफ करून भाजप सरकारने आपण केवळ धनीक आणि श्रीमंतासाठी आहोत हे सिद्ध केले आहे. भाजपच्या आश्वासनावर विश्वास ठेऊन मतदान केलेल्या देशवासियांची निराशा झाली.म्हणूनच यावेळी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन सैल यांनी केले. यावेळी समीर नाईक, शंभू शेट्टी, हरीश सांगेकर, लिलाबाई ठाणेकर, विनायक सांगेकर, सलीम शेख आदी उपस्थित होते. प्रचारसभेत सहभागी होण्यापूर्वी डॉ. निंबाळकर यांनी नंदनगद्दा येथील ग्रामदैवत नागनाथ देवाचे दर्शन घेऊन पूजा केली.