मुलांच्या वैचारिक जाणीवा प्रगल्भ होणे आवश्यक
शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांची ‘तरुण भारत’ला मुलाखत
मनीषा सुभेदार/बेळगाव
नामवंत लेखक, कवी, विचारवंत, मुक्त पत्रकार व शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी हे नुकतेच बेळगाव दौऱ्यावर आले होते. वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या संमेलनाच्या निमित्ताने बेळगावला आल्यावेळी ‘तरुण भारत’ कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट देऊन मुलाखत दिली. आजचे समाजवास्तव, शिक्षण पद्धत, एकल महिलांचे प्रश्न, आपला लढा तसेच साहित्यिक आणि त्यांची भूमिका अशा विविध विषयांवरील प्रश्नांना त्यांनी खुलेपणाने उत्तरे दिली.
►आज समाजाचे एकूणच वातावरण संभ्रमाचे आहे. तरुणाईला नेमकी दिशा सापडत नाही. तसेच हिंसाही वाढत आहे, याचे कारण काय?
मुलांच्या वैचारिक जाणीवा प्रगल्भ होणे आवश्यक असून ही जबाबदारी शिक्षक आणि पालकांवर आहे. जाणीवा प्रगल्भ झालेली मुले हिंसेकडे वळणार नाहीत. आचार्य रजनीश यांचे एक वाक्य आहे, ‘जे हात गुलाबाला हात लावतात, त्या हातात बंदुका येणार नाहीत’. म्हणूनच कला आणि विचार यांचे जागरण ज्या प्रमाणात समाजामध्ये होईल, त्या प्रमाणात आर्थिक प्रश्न सुटतील, आर्थिक प्रश्न सुटले तशी हिंसा कमी होईल.
►एकल महिलांच्या प्रश्नांबाबत काय सांगाल?
एकल महिलांचे प्रश्न हे अत्यंत गंभीर प्रश्न आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या 7 टक्के महिला एकल महिला आहेत. एकल म्हणजे एकटी राहणारी स्त्राr. ती विवाहित, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित कोणीही असेल. या महिलांच्या एकूण जगण्याचे प्रश्न हे जटील असून त्यांचे एकटेपण दाहक आहे. म्हणूनच या महिलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. कारण कोविड काळामध्ये पतीचा मृत्यू झाल्याने अनेक एकल महिलांचे प्रश्न पुढे आले. अनेक पातळ्यांवर त्यासाठी काम करण्याची गरज आहे. आम्ही स्वत: 70 तालुक्यांमध्ये एकल महिलांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प हाती घेतला. 40 महिलांचे पुनर्विवाह लावून दिले. विधवा महिलांना हळदीकुंकू करण्यास प्राधान्य देणे, त्यांना ध्वजवंदनाचा मान देणे, त्यांचा सन्मान करणे असे विविध उपक्रम राबविले.
एकल महिलांच्या प्रश्नांमध्ये बालविवाह हासुद्धा घटक दडला आहे. भारतात बालविवाहाचे प्रमाण 23 टक्के आहे तर महाराष्ट्रात हे प्रमाण 22 टक्के आहे. चार लग्नांपैकी एक लग्न बालविवाहामधून झालेले असते. यामध्ये केवळ गरिबी हाच घटक कारणीभूत नाही तर परंपरेचा, शिक्षणाचा भागही आहे. अशिक्षित मुलींचे विवाह लवकर करून देण्यात येतात. अनेक महिला अशा आहेत की त्यांचे बालविवाह झाले आहेत आणि वयाच्या 25 व्या वर्षी त्यांना वैधव्यही येते. आपल्या देशात 1855 मध्ये पुनर्विवाहाचा कायदा आला. परंतु, त्याबाबत फारशी जागरुकता झाली नाही. यादृष्टीने आता आमचे काम सुरू आहे.
►आपण या महिलांची आकडेवारी कशी संकलित केली? सरकार याबाबत सहकार्य करते का?
एका अर्थाने हे सरकारच्या हिताचेच काम असल्याने सरकारचे सहकार्य लाभते. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची मदत यासाठी मिळते. अंगणवाडी कार्यकर्त्या व आशा कार्यकर्त्या यांच्यातर्फे सर्वेक्षण केले आणि जी आकडेवारी पुढे आली, त्यावरून अधिक काम कोठे करण्याची गरज आहे, हे लक्षात घेऊन कामाला प्रारंभ केला.
►समाजाच्याच अनेक प्रश्नांवर काम करत असताना आपल्यावर हल्ला झाला. या आव्हानाला कसे सामोरे जाता?
माझ्या डोक्यावर रॉडने हल्ला होऊन गंभीर जखम झाली. हा हल्ला होण्याचे कारण म्हणजे शाळेच्या परिसरात शंभर फूट अंतरावर पानाची टपरी असू नये, हा कायदा आहे. मी माझ्या शाळेच्या जवळील ही टपरी हटविण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे ज्याचे नुकसान झाले त्याने हल्ल्याची सुपारी दिली. परंतु हल्ला झाला तरी मी डगमगलो नाही. मी पुन्हा शाळेत रुजू होऊन ‘मला मारणारे मेले, मी मेलो नाही’ या भूमिकेतून काम करत राहिलो. समाजमाध्यमांमध्ये याची खूप चर्चा झाली आणि ही टपरी हटवली गेली. मला काय झाले तर? असा विचार प्रत्येक जण करू लागला तर समाजात कधीच बदल होणार नाही. जे अवैध काम आहे, त्यावर बोलले पाहिजे, ही माझी भूमिका आहे. मला या हल्ल्यानंतरसुद्धा कधीच पुन्हा भीती वाटली नाही. कारण निर्भयता हीच माझ्या जगण्याची कसोटी आहे, असे मी मानतो.
►शिक्षणाचे प्रश्न बिकट होत चालले असून शिक्षण कोणासाठी? हा प्रश्न निर्माण झाला आहे, त्याबद्दल काय सांगाल?
शिक्षणाने समाजामध्ये विषमता निर्माण झाली आहे. आपण कृष्ण आणि सुदामाचे उदाहरण घेऊ. हे दोघेही एकत्र शिकले. परंतु, आज कृष्ण कॉन्व्हेंटमध्ये व सुदामा नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेत आहे. या विषमतेमुळे समाजाचेच दोन तुकडे होणार आहेत. त्यासाठी मराठी शाळांचा, सरकारी शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता वाढवायला हवी. कळीचा मुद्दा म्हणजे उच्चशिक्षण स्वस्त व्हायला हवे. मुली उच्चशिक्षणामध्ये येत नाहीत तोवर विषमतेची कोंडी सुटणार नाही. त्यामुळे दररोज एक नवीन कोंडी आपल्यासमोर उभी राहत आहे.
गुणवत्ता हल्ली शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु दुर्दैवाने ग्रामीण आणि शहरी भागातील बहुतांश शाळांना उत्तम तऱ्हेने लेखन आणि वाचनही येत नाही. अशी मुले शाळेतून बाहेर पडतात व तेथूनच एक विषमता निर्माण होते. दहावी-बारावीनंतर गरीब घरातील मुले उच्चशिक्षणाकडे वळत नाहीत. अनेक अभ्यासक्रम त्यांच्या आवाक्यात नाहीत. मुलींच्या राहण्याची योग्य अशी सोय होत नाही. परिणामी दहावीनंतर मुलीचे लग्न करून दिले जाते आणि मुलाला अत्यल्प पगारावर नोकरीला लावले जाते. एका अर्थाने शिक्षणाची संधीच त्यांना नाकारली जात आहे.
►बेरोजगार तरुणांची संख्या वाढत आहे. त्यांची वाटचाल चुकीच्या दिशेने जात आहे, असे वाटते का?
तरुणांना रोजगार नाही, शेतीमध्येही त्यांना रस नाही. यामुळे या तरुणांमध्ये एक अस्वस्थता, तीव्र नाराजी निर्माण होते. याचा नेमका फायदा राजकारणासाठी करून घेतला जातो. त्यांना स्वप्ने दाखवली जातात. परंतु, कालांतराने आपल्या जीवनाचे आणि जगण्याचे ध्येय का? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. अशा वेळी शेती बळकट करणे, रोजगार निर्माण करणे, कौशल्याचे शिक्षण देणे आणि मुख्य म्हणजे तरुणाईला विचार करण्यासाठी प्रवृत्त करणे इतपत तरी आपण करू शकतो.
►महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीमुळे आपण अस्वस्थ होत नाही का?
अस्वस्थ तर होतोच. वैचारिक असहिष्णुता कमालीची वाढली आहे. त्यातून कडवेपणा वाढत चालला आहे. व्यावसायिक राजकारणाचा प्रभाव आणि दबाव वाढतो आहे. दोन टक्क्याचे राजकारण सुरू झाले तेव्हापासून राजकारणाचा परिघच बदलला आहे.
►आपण पत्रकार आहात, माध्यमांबद्दल काय सांगाल?
माध्यमांची मालकी, त्यांच्या महत्त्वाकांक्षा बदलल्या आहेत. माध्यमांवर बंधने आली आहेत. परंतु, किती घाबरायचे आणि किती लपायचे? हे आपल्याला ठरवता येते. जेवढे स्वातंत्र्य आहे, त्याचा तरी उपयोग करून घ्यायला हवा. बंधने आहेत म्हणून एक फूटही न चालणारे पत्रकार हे या पेशासाठी पूरक नाहीत. आपली क्षमता वाढवायला हवी. आपण नीतिमत्तेने आणि अंत:प्रेरणेने काम केले तर अशा प्रामाणिक माणसांच्या मागे समाज निश्चित उभा राहतो.
►आपला भवताल बदलला असताना सामान्य जनांप्रमाणेच साहित्यिकसुद्धा कोणतीही भूमिका घेत नाहीत, याबद्दल काय सांगाल?
भूमिका न घेणे हीच त्यांची भूमिका आहे. अर्थात यामागे भित्रेपणा आहे की हितसंबंध जोपासणे आहे, हे लक्षात येत नाही. लोक काय म्हणतील किंवा आपले लागेबांधे धोक्यात येतील, असा विचार कदाचित केला जात असेल. परंतु, त्यांनी ठोस भूमिका न घेतल्याने समाजाचे नुकसान होत आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या काही काळामध्ये माझ्या विचारविश्वाचा भाग म्हणून साहित्यिकांनी साहित्यनिर्मिती केली. विचारांच्या बांधिलकीमधून तेव्हा साहित्य लेखनाकडे वळलो. आज आत्मकेंद्रित प्रेरणेने किंवा महत्त्वाकांक्षेने जर साहित्याकडे वळणारी मंडळी ही हिशेबीच असणार. महाराष्ट्रात अनेक चळवळी झाल्या. लेखक हा वेगवेगळ्या चळवळींना बांधिल असेल तर तो घाबरणार नाही. परंतु, जे केवळ पुरस्काराच्या किंवा नाव होण्याच्या प्रेरणेने आले आहेत, ते हिशेबीच असणार. ते जर भूमिका घेत असतील तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे.
‘तरुण भारत’ची भूमिका अन् लढाई प्रेरणादायी
मी ‘तरुण भारत’चा लेखक आहे. त्यामुळे आज ‘तरुण भारत’ला भेट दिल्याने मला अतीव समाधान लाभले आहे. दुर्दैवाने सीमाभाग महाराष्ट्राशी जोडू शकलो नाही, याची मनापासून खंत वाटते. अशा कालखंडात जे जे मराठीसाठी काम करतात, ते सर्व आपले वाटतात. ‘तरुण भारत’ची भूमिका आणि लढाई प्रेरणादायी आहे. हे केवळ प्रचारपत्र नाही तर या वृत्तपत्राने कलात्मक उंची सांभाळली आहे. वैचारिक भूमिका जोपासली आहे. त्यामुळे हे वृत्तपत्र जवळचे वाटते, अशा शब्दात हेरंब कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.