संत-महंतांचे उपदेश अंगीकारणे गरजेचे
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे प्रतिपादन : जिल्हा प्रशासनातर्फे शिवशरण अंबिगेर चौडय्या जयंती उत्साहात साजरी
बेळगाव : सामाजिक समतेसाठी संघर्ष करणाऱ्या जगद्ज्योती बसवेश्वरांचे नाव देशातच नव्हे तर जगभरात पोहचले आहे. बसवेश्वरांच्या तत्वांचे अनुसरण व समाजापर्यंत पोचविण्याचे कार्य निजशरण अंबिगेर चौडय्या यासारख्या संत-महंतांनी केले. समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येकाने संत-महंतांचे उपदेश अंगीकारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड व सांस्कृतिक विभाग व महापालिका बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिवशरण अंबिगेर चौडय्या जयंती कुमार गंधर्व रंगमंदिरात शनिवार दि. 1 रोजी साजरी झाली. जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन करून पालकमंत्री बोलत होते.
अध्यक्षस्थानी कोळी-बेस्त समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप कुऊंदवाडे होते. 12 व्या शतकात संत-महंतांनी समाजात बदल घडवून आणण्यासाठी, समता, बंधुभाव निर्माण करण्यासाठी संघर्ष केला. त्या काळात अज्ञान, अंधश्रद्धेने बरबटलेल्या समाजात सुधारणा घडवून आणण्याचे महत्कार्य संतांनी केले. त्यांचे कार्य जाणून घेण्यासाठी जयंती साजरी करण्यात येत असते. संतांच्या विचारांचे आचरण केल्यासच जयंती खऱ्या अर्थाने साजरी केल्यासारखे होईल. कोळी-बेस्त समाजाने सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शिक्षणासह सर्वच क्षेत्रात प्रगती साधावी, असे आवाहनही पालकमंत्री जारकीहोळी यांनी केले.
त्यानंतर, कोळी-बेस्त समाज जिल्हाध्यक्ष दिलीप कुऊंदवाडे व आरोग्य विभागाचे निवृत्त साहाय्यक अधिकारी के. होळेप्पा यांनी विचार मांडले. अज्ञान, जातीभेद, लिंगभेद, अंधश्रद्धेविरोधात अंबिगेर चौडय्यांनी कार्य केले. आपल्या काव्यमय उपदेशांतून (वचन) समाजात सुधारणा घडवून आणल्या. काहीजण अंबिगेर चौडय्यांबद्दल चुकीची माहिती देऊन समाजात गैरसमज निर्माण करीत आहेत. मात्र, त्यांनी मूळ इतिहास जाणून घेऊनच भाष्य करावे, असे के. होळेप्पा म्हणाले. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महापालिका आयुक्त शुभा बी., कन्नड-सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री, सिद्धू सुणगार, गंगाधर तळवार, आप्पासाहेब पुजारी, मधुश्री पुजारी, बेस्त समाजाचे नेते आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.
किल्ल्याजवळील अशोक सर्कलपासून चौडय्यांच्या प्रतिमेची मिरवणूक
तत्पूर्वी, किल्ल्याजवळील अशोक सर्कलपासून अंबिगेर चौडय्यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर मिरवणुकीला सुऊवात झाली. आरटीओ सर्कलमार्गे कुमार गंधर्व रंगमंदिर आवारात पोहचल्यानंतर मिरवणकीचे ऊपांतर मुख्य कार्यक्रमात झाले.