नेहरूंच्या चुका मान्य करणे आवश्यक : थरूर
मोदी सरकार लोकशाहीविरोधी नाही
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
काँग्रेस खासदार शशी थरू यांनी पुन्हा एकदा असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडणार आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मी भारतीय लोकशाहीचा संस्थापक मानतो, परंतु त्यांचे कौतुक टीकारहित नाही. नेहरूंच्या चुका स्वीकार करणे आवश्यक आहे, परंतु भारताच्या सर्व समस्यांसाठी त्यांना दोषी ठरविणे योग्य नसल्याचे थरूर यांनी म्हटले आहे.
मी जवाहरलाल नेहरूंचा प्रशंसक आहे, परंतु अंध प्रशंसक नाही. मी त्यांचे विचार आणि दृष्टीकोनाचा आदर करतो, परंतु मी त्यांच्या सर्व धोरणांशी 100 टक्के सहमत होऊ शकत नाही. नेहरू यांची अनेक कामे अत्यंत कौतुकास्पद आहे. नेहरूंनीच भारतात लोकशाहीला मजबुतीने स्थापित केले होते. तर मोदी सरकार लोकशाहीविरोधी आहे असे म्हणणर नाही, परंतु मोदी सरकार हे निश्चितपणे नेहरूविरोधी आहे. नेहरूंना एक सुविधाजनक बळीचा बकरा करण्यात आले असल्याचे थरूर म्हणाले.1962 च्या भारत-चीन युद्धावरून नेहरूंवर होणाऱ्या टीकेत काही सत्य असू शकते. 1962 च्या चीनविरोधातील पराभवासाठी नेहरूंच्या निर्णयांना जबाबदार ठरविले जाऊ शकते. परंतु वर्तमान सरकार कुठल्याही मुद्द्यावर नेहरूंना दोषी ठरवत असल्याचा दावा थरूर यांनी केला. थरूर हे केरळ विधानसभा आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सवाच्या चौथ्या आयोजनात सामील झाले.
लिखाण-वाचनाची सवय
बालपणी अस्थमाच्या आजारामुळे माझा ओढा पुस्तकांकडे निर्माण झाला, त्यावेळी टीव्ही अन् मोबाइल नव्हता. याचमुळे पुस्तकेच माझे जवळचे साथीदार ठरले. मी पहिली कादंबरी अत्यंत कमी वयात लिहिली होती. परंतु त्यावर शाई सांडल्याने ती नष्ट झाली. जगातील अनेक हिस्स्यांमध्ये वाचनाची सवय कमी होत आहे. परंतु केरळ आजही वाचनाच्या संस्कृतीत अग्रणी आहे. 1989 मध्ये मी द ग्रेट इंडियन नॉव्हेल लिहिले कारण त्यावेळी भारतात तशाप्रकारचे साहित्य जवळपास नव्हते. सद्यकाळात कमी पानांची छोटी पुस्तके अधिक प्रभावी ठरू शकतात, कारण लोकांकडे वाचनासाठीचा वेळ कमी होत चालला आहे असे थरूर यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटले आहे.