माणसाची बुद्धी परमात्म्याचे स्वरूपी स्थिर होणे आवश्यक आहे
अध्याय दुसरा
भगवंत म्हणाले, बुद्धयोगाचा म्हणजे समत्व बुद्धीचा अवलंब करणारे ज्ञानी लोक कर्माच्या फलाचा त्याग करतात. म्हणून ते जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन अच्युतपदी विराजमान होतात. जेंव्हा तुझी बुद्धी मोहरूपी पातकांतून पूर्णपणे तरुन जाईल, तेव्हा आत्तापर्यंत कर्मफळाविषयी तू जे ऐकलेले आहेस आणि पुढे ऐकशील, त्याकडे दुर्लक्ष करून तू सहज विरक्त होशील. समत्व बुद्धीचा वापर करून योग्य निर्णय घेणारा होशील. तुझ्यात निर्दोष आणि गहन असे आत्मज्ञान उत्पन्न होईल, तुझे अंत:करण निरिच्छ होईल. मात्र त्यासाठी मोहातून बाहेर येणे आवश्यक आहे. ह्या मोहाची अनेक स्वरूपे असतात. कधी तो नातेवाईकांचा असेल कधी पैशांचा असेल तर कधी एखाद्या स्त्राrचा असेल.
कर्मकांडातून मिळणाऱ्या फलांचाही माणसाला मोह होत असतो. वेदात निरनिराळी कर्मकांडे सांगितली आहेत. ती माणसाने यथासांग पार पाडावीत म्हणून तसे केल्यावर अमुक अमुक फळ मिळेल असेही सांगितले आहे. त्यानिमित्ताने का होईना लोकांच्या जीवनाला शिस्त लागेल तसेच त्यांना सर्व भौतिक गोष्टी देणाऱ्या ईश्वराचे स्मरण राहील असा उद्देश आहे. अर्थात काही लोक त्यांचे महत्त्व वाढावे म्हणून कर्मकांडे कशी वाढीला लागतील हे पहात असतात आणि त्यासाठी ते लोकांना फळाचे गाजर दाखवतात. ती फळे आपल्याला मिळावीत अशी लोकांना साहजिकच अपेक्षा असते. त्यामुळे काहीवेळा मनुष्य मुक्तीचे मूळ उद्दिष्ट विसरतो आणि स्वार्थ साधण्यासाठी कर्मकांडांच्या मागे लागतो. त्यामुळे त्याची बुद्धी विचलित होते.
असे होऊ नये म्हणून भगवंत पुढील श्लोकात म्हणतात, कर्मफलाच्या श्रवणाने विचलित झालेली तुझी बुद्धी परमात्म्याचे स्वरूपी ज्या वेळी स्थिर होईल, त्या वेळी तुला समत्वरूप प्राप्त होईल.
श्रवणे भ्रमली बुद्धि तुझी लाभूनि निश्चय । स्थिरावेल समाधीत तेंव्हा भेटेल योग तो ।। 53 ।।
श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, कर्म केल्यावर प्रत्येकाला फळाची अपेक्षा असते किंबहुना केलेल्या कर्माच्या फळापेक्षा थोडे अधिकच फळ मिळावे असेही माणसाला वाटत असते. त्यात पुन्हा वेदात सांगितल्याप्रमाणे कर्मकांड केल्यावर आता आपला फळावर अधिकारच आहे असेही त्याला वाटत असल्याने, मनुष्य अगदीच वाट चुकल्यासारखा वागतो. त्यासाठी त्याची भ्रमलेली म्हणजे गैरसमजाने बाधित झालेली बुद्धी कारणीभूत असते.
माणसाचे मन मोठे स्वार्थी असते. ते आज, आत्ता, ताबडतोब आपल्याला सुख कसे मिळेल ह्याचा सतत विचार करत असते आणि त्यासाठी काय वाटेल ते करायची त्याची तयारी असते. इंद्रियांनी दाखवलेल्या विषयसुखाची त्याला मोठी आंस लागून राहिलेली असते. त्याचे प्रत्येक कर्म केवळ विषयसुखाची प्राप्ती होण्यासाठीच चालू असते. मात्र ज्याची बुद्धी स्थिर असते तो कर्मफळाकडे सहजी दुर्लक्ष करू शकतो. त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. स्थितप्रज्ञ होण्याचे महत्त्व लक्षात आल्यावर असा योगी वागतो कसा, बोलतो कसा इत्यादि गोष्टींबद्दल अर्जुनाला मोठीच उत्सुकता लागून राहिली होती. म्हणून तो त्याबद्दल सांगण्यासाठी भगवंताना प्रश्न विचारतो आणि त्याच्या प्रश्नाचे भगवंतानी दिलेले उत्तर स्थितप्रज्ञ लक्षणे म्हणून सुप्रसिद्ध आहे. तसेच ह्या स्थितप्रज्ञ लक्षणांच्या कल्पनेचा विस्तार भगवंतानी गीतेच्या पुढील अध्यायात ठिकठिकाणी केलेला आहे.
क्रमश: