मृत्यूनंतर चांगली गती प्राप्त करून घेणे हे माणसाच्या हातात असते
अध्याय सातवा
ईश्वराची उपासना करून त्याला प्रसन्न करून घेतले की, मोक्ष मिळतो व मृत्यूनंतर ब्रह्मप्राप्ती होते. यासाठी उपासना कशी करायची याबाबतीत सविस्तर मार्गदर्शन या अध्यायात बाप्पा आपल्याला करणार आहेत. अध्यायाच्या सुरवातीला वरेण्य राजाने बाप्पांची प्रार्थना करून विनंती केली की, मृत्यूनंतर माणसाला कोणती गती केव्हा प्राप्त होते ते मला समजाऊन सांगा. तसेच मृत्यूसमयी ईश्वराचे चिंतन कशाप्रकारे करावे ह्याचेही मार्गदर्शन करा. त्यानुसार बाप्पा म्हणाले, उत्तरायणाच्या दिवसकाळी जे ब्रह्मज्ञानी देह सोडतात ते ब्रह्माला जाऊन मिळतात तर दक्षिणायनाच्या रात्र काळी जे देह सोडतात ते चंद्रलोकात जाऊन परत फिरतात व त्यांचा पुनर्जन्म होतो. ह्या
अर्थाचे अग्निर्ज्योतिरहऽ शुक्ला कर्मार्हमयनं गतिऽ ।
चान्द्रं ज्योतिस्तथा धूमो रात्रिश्च दक्षिणायनम् ।। 2 ।।
कृष्णैते ब्रह्मसंसृत्योरवाप्तेऽ कारणं गती ।
दृश्यादृश्यमिदं सर्वं ब्रह्मैवेत्यवधारय ।। 3 ।।
हे दोन श्लोक आपण अभ्यासत आहोत.
या मार्गांचा अधिक विचार केला तर लक्षात येईल की, ज्याप्रमाणे आपण दिवसा प्रवास केला तर सगळीकडे स्वच्छ उजेड पडलेला असल्याने आपला प्रवास सुखाचा होतो आणि रात्री प्रवास केला तर सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरले असल्याने प्रवासात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्याप्रमाणे मृत्युनंतर सूर्यमार्गाने केलेला प्रवास इष्ट ठिकाणी घेऊन जातो व चंद्र मार्गाने म्हणजे काळोखाच्यावेळी केलेला प्रवास इष्ट ठिकाणी नेत नसल्याने मनुष्य अडखळून मूळ ठिकाणी परत येतो. त्याप्रमाणे दक्षिणायनाच्या रात्रकाळी जो मृत्यूनंतरचा प्रवास करतो त्याचा यथाकाली पृथ्वीवर पुनर्जन्म होतो.
ब्रह्मधामी जाण्याच्या मार्गात मुख्य प्रकाश देणारे अग्निसमान तेजाचे केंद्र सद्गुरुच असतात. त्यांची ज्ञानरुपी ज्योती साधकाला मार्ग दाखवते. जोपर्यंत शिष्य सद्गुरूंच्या ज्ञानरुपी प्रकाशात राहतो तोपर्यंत त्याला वाट स्पष्ट दिसत असते. शुद्ध पक्ष म्हणजे कधीही चुकीच्या मार्गाने न जाणे. असे करणारा उच्च अवस्था प्राप्त करतो. परिणामी ब्रह्म प्राप्त करून घेतो. याउलट सद्गुरूंची शिकवण न मानता जे पुढे जातात त्यांना अंधाऱ्या रात्रीचा सामना करावा लागून धुसर प्रकाशामुळे भ्रांत होतात. म्हणजे चुकीच्या मार्गाला लागतात. त्यांची भोगलालसा प्रबळ असल्याने भोगाने रोगी होऊन जातात. कुणीही मार्गदर्शक नसल्याने चोहीकडून कष्ट भोगत, ठेचकाळत दक्षिणगतीला प्राप्त होतात. ही गती पितरांची, मृत्यूची व वारंवार दु:ख भोगणाऱ्यांची आहे. ही कृष्ण गती होय. मृत्यूनंतर मनुष्य या दोन्हीपैकी कोणत्या तरी एका गतीला प्राप्त होतो. एकापासून पुनर्जन्म व दुसऱ्यापासून मोक्ष मिळून ब्रह्मलोक प्राप्त होतो.
यापैकी कोणती गती प्राप्त करून घ्यायची हे माणसाच्या हातात असते. वास्तविक पाहता वरील वर्णन वाचल्यावर माणसाला आपण चांगले वागून, देवभक्ती करून मृत्यूनंतर सूर्यमार्गाने जाऊन ब्रह्मपदी विराजमान व्हावे असे वाटणे साहजिक आहे परंतु माणसाच्या विचार आणि आचारामध्ये कितीतरी अंतर असते. हे अंतर पडण्याला त्यांची देहबुद्धी कारणीभूत ठरते. जन्माला येत असताना आपण आत्मस्वरूप आहोत हे त्याच्या लक्षात असतं परंतु जन्म झाल्याबरोबर त्याला त्याच्या आत्मस्वरूपाचा विसर पडून मी म्हणजे हा देह असा विचार तो करू लागतो. त्यामुळे त्याची स्वार्थी वृत्ती समाजात वावरताना उफाळून येते आणि तिचे पोषण करण्यासाठी तो त्याच्या कळत, नकळत अनेक गैरकृत्ये करू लागतो.
क्रमश: