For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्माचा त्याग करणे कुणालाच शक्य नाही

06:37 AM Dec 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
कर्माचा त्याग करणे कुणालाच शक्य नाही
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

भगवंत म्हणले, काहीही कर्म न करता ज्ञानमार्गाने जाऊन मोक्षप्राप्ती करून घ्यावी असं जरी वाटलं तरी हे शक्य नाही कारण वाट्याला आलेले कर्म न करण्याने माणसाला निष्कर्मता प्राप्त होत नाही, तसेच साक्षात्काररूप सिद्धीही मिळत नाही. ईश्वर ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार त्याने कोणते कर्म करायचे ते ठरवत असतो.

त्यामुळे वाट्याला आलेले कर्म टाकून द्यावे आणि निष्कर्म व्हावे, असे बोलणे व्यर्थ व मूर्खपणाचे आहे. आधी कर्म करून मगच संन्यासी होता येते. जोपर्यंत निरिच्छ अवस्था प्राप्त होत नाही, तोपर्यंत कर्म केले पाहिजे. एखादे नावडीचे कर्म मी करणार नाही असे मनुष्य ठरवूच शकत नाही. त्याने जरी असे मनात आणले तरी तो कर्म न करता क्षणभरदेखील राहू शकत नाही कारण प्रत्येकजण सत्व, रज आणि तम ह्या प्रकृतीजन्य गुणांच्या अधीन असल्यामुळे ते गुण प्रत्येकाकडून कर्म करून घेतच असतात. ह्या अर्थाचा

Advertisement

कर्माविण कधी कोणी न राहे क्षण-मात्र हि । प्रकृतीच्या गुणी सारे बांधिले करितात चि ।। 5 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी कर्म करतो किंवा त्याचा त्याग करतो असे म्हणणे चुकीचे आहे कारण, जेवढे म्हणून कर्म घडत असते, तेवढे गुणांच्या अधीन असते. अमुक एक कर्म मी करणार नाही असे म्हणून माणसाने ते करायचे टाळले तरी इंद्रिये त्यांचे काम करतच असतात. कानांनी ऐकणे बंद केले आहे काय? अथवा, डोळ्यातील पाहण्याचे सामर्थ्य गेले आहे काय? नाकपुड्या बुजून वास येईनासा झाला आहे काय? प्राण व अपान, या दोन्ही वायूच्या क्रिया थांबल्या आहेत काय? बुद्धीचा कल्पनाविलास थांबला आहे काय? भूक-तहान लागणे इत्यादी पीडा थांबल्या आहेत का? स्वप्न व जागृत अवस्था बंद पडल्या आहेत का? अथवा पाय चालणे विसरले आहेत काय? हे सर्व असु दे. जन्म आणि मरण संपले आहेत काय? ही नैसर्गिक कर्मे जर देहाकडून चालूच राहणार असतील तर मी कर्मत्याग करतो ह्या म्हणण्याला काहीच अर्थ रहात नाही. म्हणून प्रकृतीच्या अधीन असलेल्या पुरुषाला कर्म त्याग करता येत नाही.

तो प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे सत्व, रज, तम हे शरीरातील गुण त्याच्याकडून कर्म घडवीतच असतात म्हणून एखाद्याने स्वत:ला कर्ता समजून मी हे कर्म करतो अथवा या कर्माचा त्याग करतो, असा अभिमान बाळगणे व्यर्थ आहे. एखादा मनुष्य रथावर स्वस्थ बसला असला तरी रथाबरोबर त्याचाही प्रवास चालूच असतो. त्याप्रमाणे प्रकृतीच्या अधीन असलेला मनुष्य तिच्या इच्छेनुसार कर्मे करतच असतो.

माणसाच्या इच्छेला काडीचीही किंमत नाही हे स्पष्ट करण्यासाठी माउली वाळलेल्या पानाचा दृष्टांत देतात. ते म्हणतात, एखादे वाळलेले झाडाचे पान कांही न करता पडलेले असते परंतु जोरात वारा सुटला, की ते स्वत: कोणतीही हालचाल न करता इकडे तिकडे फिरत असते. त्याप्रमाणे मनुष्य त्याची इच्छा असो वा नसो प्रकृतीच्या गुणांच्या अधीन असल्याने, इच्छा, द्वेष, सुखदु:ख ह्या विकारांना बळी पडून कर्म करत राहतो. अगदी कर्मे करून ज्याने निष्कामता साधलेली आहे असा मनुष्यही जोपर्यंत त्याचा शरीराशी संबंध असतो तोपर्यंत कर्मे करत असतो.

थोडक्यात कुणालाच कर्माचा त्याग करणे शक्य नाही, असे असूनही जे कर्माचा त्याग करू म्हणतात त्यांच्या बोलण्याला काहीही अर्थ नसतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.