माणसाच्या सर्जनशीलतेवर एआयची मात अशक्य
चित्रकला प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी चित्रकार शिरीष देशपांडे यांचे मत : प्रदर्शन उद्यापर्यंत चालणार
त. भा. प्रतिनिधी / बेळगाव
कृत्रिम बौद्धिक संपदा म्हणजेच एआयचे प्रस्थ वाढत असले तरी माणसाच्या सर्जनशीलतेवर एआय मात करू शकणार नाही. चित्रकला, नाट्या, नृत्य, गायन या माध्यमांतून कलाकार आपला मार्ग शोधून व्यक्त होत राहतील, असा आशावाद बेळगावचे चित्रकार शिरीष देशपांडे यांनी व्यक्त केला.
द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड कल्चर (आयआयडब्ल्यूसी) आर्ट क्लासेस अँड स्टुडिओ बेंगळूर यांच्यावतीने आयोजित चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. 2 ते 4 ऑक्टोबर दरम्यान, वरेरकर नाट्यासंघाच्या कलामहर्षि के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
शुक्रवारी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर फोटोग्राफर अमृत चरंतीमठ, रंगकर्मी डॉ. अरविंद कुलकर्णी व प्रदर्शनाचे आयोजक व संस्थेचे संचालक संजय चापोलकर उपस्थित होते. प्रारंभी दिव्या व उषा यांनी स्वागतगीत सादर केले. दीपप्रज्वलनाने प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
बेंगळूरहून बेळगावमध्ये प्रदर्शन भरविणे स्वागतार्ह बाब
याप्रसंगी शिरीष देशपांडे म्हणाले, बेंगळूरहून आपल्या चित्रकार शिष्यवृंदाना घेऊन बेळगावमध्ये प्रदर्शन भरविणे ही स्वागतार्ह बाब आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये कलाकारांचे येणे आवश्यक आहे. कलाकार जितका आपल्या पोटासाठी आपल्या कलेतून व्यक्त होतो, तितकाच तो समाजाला आनंदी जगात घेऊन जातो. त्यामुळे कलाकारांच्या कलेची कदर करणे व त्याची जाणीव ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. एआय कलाकारांच्या सर्जनशीलतेवर मात करू शकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
प्रदर्शन प्रत्येकाने पाहण्याजोगेच
अमृत चरंतीमठ म्हणाले, रंग आणि रेखा यांच्या माध्यमातून भरलेले हे प्रदर्शन प्रत्येकाने पाहावे असेच आहे. आधुनिक जगातही कलेचे स्थान अबाधित आहे. त्यातही दृश्य काव्य कला ही चिरंतर टिकणारी आहे.
आयोजकांना रसिकांचा विचार करावा लागतो
अरविंद कुलकर्णी यांनी कोणताही कार्यक्रम आखताना आयोजकांना रसिकांचा विचार करावा लागतो. कलाकारांना मानधन, पुरस्कार याबरोबरच रसिकांच्या टाळ्या आणि प्रशंसा यांची नितांत गरज असते. चंद्रकांत कुसनूर म्हणतात त्याप्रमाणे वेदना जाते आणि कला निरंतर राहते. त्यामुळे कलेचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे. आज अभ्यास नसताना लोक व समीक्षा टीका करतात हे दुर्दैव असल्याचे त्यांनी नमूद केले.
संजय कापोलकर म्हणाले, बेळगाव चित्रकारांचे, कलाकारांचे गाव आहे. माझ्या विद्यार्थ्यांना हे गाव आणि येथील चित्रकलेची ओळख करून देण्याची अनेक वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली आहे. माझे गुरु एस. बी. सुतार आणि आर. आय. सावंत यांच्याकडून आपण शिक्षण घेतले. आज बेळगावमध्ये हे प्रदर्शन भरवताना मला विशेष आनंद होत आहे. यावेळी प्रदर्शनात प्रात्यक्षिक सादर करणारे महेश होनुले व चंद्रशेखर रांगणेकर, चापोलकर यांच्यासह गुरू निलगंगा चरंतीमठ यांचाही सत्कार करण्यात आला. अरुण निरगट्टी यांनी त्यांचा परिचय करून दिला. विणा नायक यांनी सूत्रसंचालन केले.