प्रकल्पांचे फायदे त्वरित लोकांना मिळणे महत्त्वाचे
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : प्रकल्पांच्या प्रगतीचा घेतला आढावा
पणजी : राज्याच्या आर्थिक विकासाकरिता सरकार कटिबद्ध असून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक विकासप्रकल्प राबविण्यात येत आहेत. हे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. या पायाभूत प्रकल्पांचे फायदे लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहचायला हवेत, असे ते पुढे म्हणाले. केंद्र सरकारकडून भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष साहाय्याद्वारे राज्याला प्राप्त झालेल्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या प्रगतीचा काल शुक्रवारी सचिवालयात आयोजित खास बैठकीत आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
एकूण 513 कोटींच्या प्रकल्पांचा आढावा
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू यांच्यासह संबंधित खातेप्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. केंद्र सरकारच्या या विशेष साहाय्यातून राज्यात सुमारे 512.91 कोटी गुंतवणुकीचे विविध पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यापैकी अनेक प्रकल्पांची पायाभरणीही करण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या कामांच्या प्रगतीचा आढावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी निधीचा वापर तसेच इतर गोष्टींसंबंधी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सर्व संबंधित खात्यांनी एकमेकांशी समन्वय ठेऊन कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश दिले.