For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कलाकाराने प्रथम माध्यम समजून घेणे महत्त्वाचे

11:01 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
कलाकाराने प्रथम माध्यम समजून घेणे महत्त्वाचे
Advertisement

48 व्या वसंत व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी अभिनेते संदीप कुलकर्णी यांचे मत

Advertisement

बेळगाव : कलाकाराने प्रथम माध्यम समजून घेणे महत्त्वाचे आहे. माध्यमाचे आकलन झाले की, मोठा प्रवास करणे शक्य होते. त्याचवेळी प्रथम तीव्र इच्छा (पॅशन) संयम, सराव व रियाज या शिवाय तग धरून रहाणे कठीण आहे, असे मत अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सालाबादप्रमाणे 48 वी वसंत व्याख्यानमाला हेरवाडकर हायस्कूल येथे सुरू झाली. या व्याख्यानमालेचे उद्घाटन त्याच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रा. माधुरी शानभाग यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. खरे तर मला चित्रकार व्हायचे होते. परंतु चेतन दातार या मित्रामुळे सत्यदेव दुबे यांच्या कार्यशाळेत गेलो व 3 वर्षात इतके शिकायला मिळाले की, आपण अभिनय क्षेत्रात यायचे हा निर्णय पक्का झाला, असे संदीप कुलकर्णी म्हणाले. ‘सत्यशोधक’ महात्मा फुले यांची तर दुसऱ्या चित्रपटात ‘साने गुरूजी’ यांची भूमिका करण्याची संधी मिळणे हे भाग्यच होय. या भूमिकांना न्याय देणे हे आव्हान होते. ‘डोंबिवली फास्ट’मधील माधव आपटे हा सात्विक संताप असणारा माणूस आहे. तर साने गुरूजी विलक्षण हळवे होते. या दोन परस्पर विरोधी भूमिका प्रयत्नपूर्वक साकारल्या, असे त्यांनी सांगितले.

हिंदी-मराठी सृष्टीतील संस्कृतीत फक्त भाषेची लय वेगळी

Advertisement

हिंदी-मराठी सृष्टीतील संस्कृतीत फक्त भाषेची लय वेगळी आहे. पण जगणे तेच असतं, असे त्यांनी नमूद केले. चित्रपट हे माझे लाडके माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले. ‘श्वास’ चित्रपट करताना डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ते कसे वावरतात याचा अभ्यास केला. ज्याचा खूप उपयोग झाल्याचे त्यांनी नमूद केले. ओटीटी हे माध्यम महत्त्वाचे आहे. तेथे काम केले असले तरी मराठीतील कलाकार हिंदीमध्ये स्थिरावण्यास काही काळ जावा लागतो असे सांगून ‘श्वास’ने निर्माण केलेले अस्तित्व टिकविण्यासाठी ठरवून ‘डोंबिवली फास्ट’ हा चित्रपट केल्याची माहिती त्यांनी दिली. तर आगामी काळात बाबा आमटे यांच्यावरील बायोपीक करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार

प्रारंभी यावर्षात दिवंगत झालेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली. अर्चना संगीत विद्यालयाच्या महिलांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. वक्त्याच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्याख्यानमालेच्या अध्यक्षा सुनिता देशपांडे यांनी स्वागत केले. उपाध्यक्षा स्वरुपा इनामदार यांनी प्रास्ताविक केले. प्रिया कवठेकर यांनी परिचय करून दिल्यानंतर मावळत्या अध्यक्षा प्रा. मीना खानोलकर यांचा व नूतन कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रियांका केळकर यांनी केले. नमिता कुरुंदवाड यांनी आभार मानले. व्याख्यानासाठी धनश्री नाईक यांचे सहकार्य लाभले.

Advertisement
Tags :

.