किरकोळ आणि निरर्थक गोष्टींच्यामागे धावणे हा मनुष्य स्वभाव आहे
अध्याय नववा
माणसाच्या स्वभावातला रजोगुण नेहमीच प्रभावी असल्याने त्याला चैनीची, छानछोकीची उपजतच आवड असते आणि त्यातंच खरे सुख आहे असे तो मानतो त्यामुळे इतके महत्त्वाचे असलेले आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न तो करत नाही. त्यामुळे तो मृत्यूची वाट धरतो ह्या अर्थाचा लोक नास्तिक हा धर्म अश्रद्धेने न सेविती । मृत्यूची धरिती वाट संसारी मज सोडुनी ।।3 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार, आत्मज्ञानाकडे दुर्लक्ष करून विषयसुखाला श्रेष्ठ मानणाऱ्या लोकांची धर्मावर श्रद्धा नसते. हे नास्तिक लोक हलक्या विचारसरणीचे असून मूर्ख आणि दुराचारी असतात. मी त्यांच्या हृदयात वास करून आहे हे ते लक्षातच घेत नाहीत. त्यामुळे ते सर्वश्रेष्ठ अशा आत्मज्ञानापासून मिळणाऱ्या सुखाला म्हणजे आत्मसुखाला मुकतात. ज्याप्रमाणे दूध हे पवित्र असून गोड असते. ते गाईच्या कासेला चिकटलेल्या गोचीडीच्या जवळच असते पण ते लक्षात न आल्याने ती रक्तच पीत असते. कमळ आणि बेडूक यांची वस्ती एकाच जागी असली तरी कमळाचा सुवास दूरचे भुंगे येऊन सेवन करून जातात पण जवळच असलेल्या बेडकांच्या ते लक्षात न आल्याने बेडूक केवळ चिखलाचाच आनंद घेत राहतात. अथवा घरात हजारो मोहरा पुरलेल्या आहेत परंतु ते माहित नसल्याने मनुष्य तेथे राहून दारिद्र्यात जगत असतो, त्याप्रमाणे सर्व सुखाचा बगीचा असलेला मी सर्वांच्या हृदयात आहे हे न जाणणारे मूर्ख लोक सुख मिळवण्यासाठी विषयांचीच इच्छा करतात.
भगवंत पुढे सांगतात, किरकोळ आणि निरर्थक असलेल्या गोष्टींच्या मागे धावणे हा मनुष्य स्वभाव आहे. ज्याप्रमाणे मृगजळ बघून जर एखाद्याने प्रत्यक्षात गिळलेला अमृताचा घोट थुंकून टाकला किंवा गळ्यात बांधलेला परीस आत काय आहे ह्या कुतुहलापोटी फोडला तर त्याचे जसे नुकसान होते त्याप्रमाणे भगवंतांची प्राप्ती करून घ्यावी अशी सदिच्छा झाली तरी अचानक ते अन्य गोष्टीच्या मागे धावू लागतात आणि स्वत:चे नुकसान करून घेतात. मी व माझे ह्या भावनेच्या प्रभावाने दीन झालेले लोक मला येऊन मिळण्याचे विसरतात आणि जन्म व मरण नावाचे या दोन काठ असलेल्या मायानदीतून संसारातील धक्के खात जात राहतात. हा त्यांचा प्रवास अनेक जन्म चालू राहतो. एखादी गोष्ट मनात पक्की बसली की तशी भावना होत जाते. उदाहरणार्थ एखाद्याला उत्तम मार्क्स मिळाले की, बिलकुल विचार न करता आपण म्हणतो अरे वा, हे खूप छान झाले. अथवा एखाद्याचे निधन झाले की, आपण लगेच हळहळ व्यक्त करतो. ह्या दोन्ही प्रतिक्रिया देताना आपल्याला बिलकुल विचार करावा लागत नाही कारण एकात आनंदाची व दुसऱ्यात दु:खाची भावना प्रबळ झालेली असते. त्याप्रमाणे ज्याला संसारात रुची आहे त्याला मी कर्ता आहे आणि समोर दिसणाऱ्या गोष्टी माझ्या आहेत ही भावना पक्की झालेली असते. ती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ईश्वरप्राप्ती करून घेणे हे जीवनातील सर्वोच्च ध्येय आहे ही भावना त्यांच्या मनात पक्की होत नाही.
