चंचल मनाला आवरून धरणं कठीण आहे पण अशक्य नाही
अध्याय पाचवा
वरेण्य राजाने बाप्पांनी सांगितलेली योगाभ्यास पूर्ण झालेल्या जीवन्मुक्ताची लक्षणे एकाग्रतेने ऐकून घेतली. योगाभ्यासी होणे हे मनाच्या स्थिर होण्यावर अवलंबून आहे, हे समजल्यावर त्याला असे वाटले की, मन अतिशय चंचल असल्याने हा अपूर्व योग साधणं अशक्य आहे. म्हणून त्याने बाप्पांना विचारले की, मन स्थिर करण्याचा उपाय मला सांगा. ह्या अर्थाचा द्विविधोऽपि हि योगोऽ यमसंभाव्यो हि मे मतऽ । यतोऽन्तऽकरणं दुष्टं चञ्चलं दुर्ग्रहं विभो ।। 19।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. सर्वसामान्य लोकांना भेडसावणारे मनाचे दुष्टपण व चांचल्य यांचा येथे उल्लेख राजाने केलेला आहे. मनाला आवर घालताना माणसाची त्रेधातिरपीट उडते. मन हे अत्यंत दुष्ट आहे असं राजा म्हणतो कारण अमुक एक गोष्ट केल्याने आपले नुकसान होणार आहे हे माहीत असूनही मन ती गोष्ट माणसाला करायला प्रवृत्त करते. स्वत: नष्ट होऊन दुसऱ्याला बुडवावे असा मनाचा स्वभाव असतो. येथे मनाचा समावेश असलेल्या अंत:करणाबद्दल विचार करूयात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चौघांचे मिळून अंत:करण तयार होते. इंद्रिये बाह्य गोष्टींची माहिती देऊन मनाला भुरळ घालतात. बुद्धी अनेक कल्पना सुचवून मनाला चिथावणी देते. त्याप्रमाणे घडेल की नाही याची चिंता चित्त करत असतं आणि अहंकार असंच घडायला हवं कारण मी कर्ता आहे ह्या भावनेला गोंजारत असतो. या सगळ्या प्रक्रियेत मी कर्ता आहे हा भाव प्रबळ होतो. साहजिकच ईश्वरनिष्ठा, भक्ती, योग ह्या सर्व गोष्टी मानवी आयुष्यातून दूर निघून जातात. म्हणून राजा म्हणतोय, बाप्पा तुम्ही सांगताय तसं सर्वत्र ईश्वरस्वरूप पाहणे आणि त्या रूपात लोप पावून मी नाही तू आहेस असा विचार मनात दृढ करणे मला केवळ असंभव वाटतंय. यावर काही उपाय सांगा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. बाप्पांचं राजावर अतिशय प्रेम आहे. त्याने विचारलेली शंका रास्त आहे हे लक्षात घेऊन बाप्पा त्याला सविस्तर उत्तर देणार आहेत. ते म्हणतात.
यो निग्रहं दुर्ग्रहस्य मनसऽ संप्रकल्पयेत् ।
घटीयत्रसमादस्मान्मुक्तऽ संसृतिचक्रकात् ।।20।।
अर्थ- नियमन करण्यास कठिण अशा मनाचे जो नियमन करतो तोच घटिकायंत्रासारख्या, सतत चालू राहणाऱ्या संसारचक्रापासून मुक्त होतो.
विवरण- बाप्पा म्हणतात, चंचल ओढाळ मनाला आवरून धरणं कठीण आहे पण अशक्य नाही. मोठ्या निग्रहाने प्रयत्न केला तर ते शक्य होते. मनाच्या ठिकाणी अपूर्व गती, तेजस्विता आणि नियंत्रण शक्ती आहे. मनावाचून कर्म होऊ शकत नाही. मनुष्य ज्ञानप्राप्ती आणि मनन मनामुळेच करू शकतो. तसेच त्याला बिकट प्रसंगी परिस्थितीचा सामना करण्याचे धैर्यही मनामुळेच मिळते. मन ही अमर दैवी शक्ती आहे. हे मन शुभ संकल्पाने युक्त झाल्यास उन्नती आणि अशुभ संकल्पाने युक्त झाल्यास अवनती होते. मनाचे आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे त्याला आवडणाऱ्या गोष्टींकडे ते ओढ घेते. नावडत्या गोष्टींकडे ते जात नाही. हे सर्व लक्षात घेऊन मनावर ताबा मिळवण्यासाठी मी कर्ता आहे या भावनेतून मनात येणाऱ्या नाना कल्पनांना रोखून धरण्याची सवय लावायला हवी, म्हणजे ते इतरत्र भटकणार नाही. मनात येणाऱ्या विविध कल्पना या मायेचंच रूप आहेत. ही माया मनुष्याकडून निरनिराळ्या क्रिया करवून घेते. त्यामुळे त्याच्याकडून पाप पुण्याची निर्मिती होते. परिणामी तो कधीही न थांबणाऱ्या संसार चक्रात अडकतो. मी कर्ता नाही ही संकल्पना मनात जितकी दृढ होईल तितक्या प्रमाणात कठीण प्रसंगी निस्वार्थीपणाने नितीन्यायानुसार वागण्याची प्रेरणा होते. त्यानुसार कर्म करायची सवय मनाला लागेल व त्याचे भरकटणे हळूहळू कमी होईल. अर्थात हे साध्य करण्यासाठी बराच वेळ लागेल म्हणून त्यासाठी अत्यंत चिकाटीने प्रयत्न करावेत.
क्रमश: