For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नाजूकही आहे आणि गंभीरही!

06:45 AM Jul 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
नाजूकही आहे आणि गंभीरही
Advertisement

कर्नाटक हे जरी प्रगत राज्य असले तरी सांस्कृतिक आणि परंपरेच्या दृष्टिकोनातून देशातील एक फार चांगले राज्य आहे. ज्यांनी आपल्या संस्कृती आणि परंपरेला कधीही बाजूला केले नाही, अशा या राज्यामध्ये ‘एड्स’सारखा दुर्धर आजार फैलावणे, ही खरोखरच चिंताजनक बाब होय. ‘एड्स’चा फैलाव कशामुळे होतो, याची सर्वांना कल्पना आहे. सर्वांत गंभीर बाब म्हणजे गेल्या दोन वर्षात ‘एड्स’चा फैलाव अधिक तीव्र गतीने वाढला आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीप्रमाणे, 2023-24 मध्ये कर्नाटकात सुमारे 44 हजार 500 ‘एड्स’ग्रस्त मंडळी होती. 2025-26 मध्ये यात वाढ झाली आणि ती 66 हजार 600 पर्यंत पोहोचली. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे, नव्याने जी तपासणी झाली, त्यामध्ये 18 ते 25 वयोगटातील 7000 कॉलेज विद्यार्थी अलीकडेच ‘एड्स’ग्रस्त सापडले. साहजिकच अनेकांच्या चिंता यामुळे वाढल्या. घरातील पालक तर अडचणीत आलेले असणारच, शिवाय संबंधित महाविद्यालय, आरोग्य खाते आणि कर्नाटक सरकार चिंतेत सापडले आहे. त्यामुळेच आता यावर उपाय कोणता? असा जेव्हा प्रश्न उपस्थित झाला, त्यावेळी त्या विद्यार्थ्यांवर उपचाराबरोबरच इतर विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी कर्नाटक सरकारने राज्यातील महाविद्यालयांमध्ये समुपदेशन सुरू करण्याचे ठरविले आहे. तसेच महाविद्यालयांमध्ये ‘एड्स’ची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे सक्तीने करता येत नाही. तसा कायदाच आहे. त्यामुळे तपासणी ऐच्छिक ठेवली आहे आणि तपासणी केल्यानंतरचा अहवाल हा फार गुप्त पद्धतीने ठेवला जात आहे. युवा वर्गामध्ये फैलावणारा हा ‘एड्स’ एक अत्यंत गंभीर व जीवघेणा प्रकार असून त्यावर वेळीच आवर घातला पाहिजे. यासाठीच समुपदेशन व जनजागृती एवढेच काय ते, सरकारच्या हातात आहे. अलीकडच्या काळात देशात ‘एड्स’चे प्रमाण नियंत्रणात होते. मात्र कर्नाटकात हे प्रकरण वाढले आणि महाविद्यालयांमधून जो काही अहवाल आला, तो निश्चितच धक्कादायक आहे. विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठाने आपल्याशी संबंधित असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे ठरविले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची तपासणी, समुपदेशन इत्यादी उपक्रम राबविण्याचे ठरविलेय. ‘एड्स’बाबत केवढी गुप्त माहिती ठेवली तरीदेखील कुठून ना कुठून तरी ही माहिती संबंधितांना पुरवली जाते आणि मग त्यातून वाद निर्माण होतात. युवकांना देशाचे भवितव्य असे आपण समजतो मात्र ‘एड्स’सारख्या भयंकर संसर्गाने जर विळखा घातला तर त्यांचे भविष्य धोक्यात येणार हे नक्की. कदाचित हे आपल्या शत्रुंचे षड्यंत्र असू शकते. देशातील युवकांना बाधित करून त्यांचे व देशाचे भवितव्य बिघडविण्याच्या दृष्टिकोनातून हे टोकाचे पाऊल असू शकते. तथापि दुसरी शक्यता अशी की, आजचा विद्यार्थी वर्ग असो किंवा युवा वर्ग कोणत्यातरी व्यसनाकडे अधीन होतो काय आणि त्यामुळेच तो असा भयानक संसर्गाला आमंत्रण देतो काय. कारण काहीही असो परंतु जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला आता सामोरे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ‘एचआयव्ही’ चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यावर फारसे उपाय नाहीत. एकदा ‘एचआयव्ही’ शरीरात घुसला की, तो बाहेर पडणेच कठीण. या युवकांच्या भवितव्याची चिंता आहे. आता मागाहून समुपदेशन आणि वेळेवर चाचणी करा, अशा सूचना कर्नाटक सरकारकडून दिल्या जात आहेत. ही समस्या केवळ कर्नाटकपुरती राहिलेली नाही. ही समस्या संपूर्ण देशामध्ये फैलावण्यास वेळ लागणार नाही. युवा वर्गाकडून भवितव्याची आशा आहे. या देशाला उद्या युवा नेतृत्व लाभले पाहिजे, नवजवानांची आवश्यकता आहे,  नव्या दमाच्या अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. कोणताही देश जर पुढे जाणार असेल तर त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात युवाशक्तीची आवश्यक असते. त्या तुलनेत भारत हा एक भाग्यवान देश आहे. जगातील सर्वाधिक युवा वर्ग, युवाशक्ती भारताकडे आहे. असे असताना आता हळूहळू युवाशक्ती जर वेगळ्या मार्गाने जाऊ लागली तर त्यासाठी गंभीरपणे उपाययोजना आखावी लागेल. कर्नाटक सरकारने जी पाऊले उचलली आणि प्रत्येक महाविद्यालयांमध्ये ‘एड्स’ तपासणी करण्याचा जो निर्णय घेतला, त्याला कदाचित मोठ्या प्रमाणात विरोधही होऊ शकतो परंतु युवकांच्या भवितव्याचा विचार लक्षात घेता, कुठेतरी त्यावर नियंत्रण आणणे व आळा बसणे आवश्यक आहे. त्यामुळेच तपासणी जर होत असेल तर अवश्य होऊ द्या. सुमारे 54 हजार जणांना अजूनही आपल्याला याची बाधा झालेली आहे, याची कल्पना नाही मात्र कर्नाटक सरकारकडे तसा अहवाल आहे. कर्नाटक हे एक उदाहरण आहे. असा अनेक राज्यांमध्ये ‘एचआयव्ही’ने केवढा धुमाकूळ घातलेला असेल, याचा अहवाल बाहेर आलेला नाही मात्र आता हे प्रकरण सर्वच राज्यांनी गांभीर्याने हाताळणे आवश्यक आहे.

Advertisement

Advertisement

Advertisement
Tags :

.