महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ईश्वराच्या स्मरणात राहणं हितावह असतं

06:41 AM Dec 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय पाचवा

Advertisement

योगाभ्यास करणाऱ्याने आहार, विहार, निद्रा या सर्व गोष्टी संतुलित प्रमाणात घ्याव्यात. म्हणजे शरीर स्वस्थ राहून मन ताजेतवाने राहते आणि योगाभ्यास जोमाने होत राहतो. अति तेथे माती हे नेहमी लक्षात ठेवावे. मनात येणारे विचार माणसाच्या एकाग्रतेचा भंग करत असतात आणि मनात येणारे विचार थांबवणं हे माणसाच्या हातात नसतं पण निदान त्या विचारांना झटकून टाकून पुढं जाणं हे माणूस करू शकतो. त्यासाठी मनात विचार जरी आले तरी त्यांना तिथेच थांबवावेत. म्हणजे त्याअनुषंगाने पुढे जाऊन त्याबद्दल संकल्प करून ते पूर्णत्वास नेण्यासाठीचे बेत करणे आपोआपच थांबवले जाईल. कारण संकल्प केला की, मनुष्य त्यादृष्टीने पावले टाकू लागतो. कधी ती बरोबर ठरतात तर कधी चुकीची ठरतात. त्यामुळे आशानिराशेवर मन हिंदकळत राहते व आपली एकाग्रता भंग पावते. म्हणून कर्ताकरवीता असलेल्या ईश्वरावर आपण सर्व सोपवून स्वस्थ रहावं. प्रवासाला निघाल्यावर ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण झोपी जातो इतकं हे सोपं आहे. फक्त त्यासाठी आपण कर्ता नाही ही खूणगाठ मनाशी पक्की असायला हवी पण आपण कर्ता नाही हे मनात ठसवणं एव्हढं सोपं नसतं. कारण आपला अहंकार व अभिमान आडवा येतो. एखादी गोष्ट मी करू शकतो असा माणसाला अभिमान असतो व अहंकार झाला की, तो इतरांना तुच्छ लेखू लागतो. त्यावेळेस त्याला स्वत:शिवाय इतर काहीच दिसत नसतं. अगदी ईश्वर समोर येऊन उभा राहिला तर त्यालाही तो बाजूला सारायला कमी करत नाही. यासाठी हिरण्यकश्यपूचे उदाहरण लक्षात घ्यावे. समोर देव दिसत असून सुद्धा हा त्याला नमस्कार करायचा सोडून तलवार उपसून मारायला धावला होता. मनुष्य जसजसा ईश्वराच्या जास्तीतजास्त अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करेल तितक्या प्रमाणात त्याचा अभिमान आणि अहंकार दूर होईल. परिणामी ईश्वराचं कर्तेपण त्याला अधिकाधिक पटत जाईल. असं होत गेलं तर मनात इच्छा जरी उमटल्या तरी त्याच्या पूर्णतेबद्दल संकल्प करून तो त्यासाठी धडपड करून वेळ वाया घालवणार नाही. मग कुणी विचारतील की, आयुष्यात काही ध्येय धोरणं बाळगायचीच नाहीत का? याचं उत्तर असं की, उद्दिष्ट अवश्य असावीत पण मी ती पूर्ण करिनंच असा अट्टहास नसावा. ते काम तुमच्या हातून जेव्हढं पूर्ण व्हायचं आहे तेव्हढं ईश्वर तुमच्याकडून पूर्ण करून घेणार आहे. माणसाचं मन ही ईश्वराची विभूती आहे असं भगवद्गीतेत भगवंत सांगतात. एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात विचार पेरण्याचं काम ईश्वरच करत असतो व आपणही बोलताना कळत न कळत हे कबुलही करत असतो. म्हणून एखाद्या कठीण प्रसंगात अचानक मनुष्य अशी काही कृती करतो की, त्यामुळे तो प्रसंग निभावला जातो. मग मनुष्य म्हणतो की, मला त्यावेळी हे कसं सुचलं कुणास ठाऊक पण सुचलं एव्हढं खरं. तेव्हा ते सुचवणारा ईश्वरच असतो पण मनुष्य चटकन ते मान्य करत नाही किंवा एखादी गोष्ट करताना चुकली व नुकसान झालं की, मनुष्य म्हणतो कुठून दुर्बुद्धी झाली आणि या फंदात पडलो. ही दुर्बुद्धी होण्याचं कारण ईश्वराचं विस्मरण हे असतं. तेव्हा स्वत:ला संपूर्ण त्यांच्यावर सोपवा आणि त्यांच्या स्मरणात राहून जशी प्रेरणा होईल तसे कार्य करत गेल्यास त्यातून जे घडेल ते मनुष्याच्या हिताचंच असतं ही खात्री ठेवा आणि निर्धास्त रहा. हे असं निर्धास्त होण्यासाठी चित्ताला कसे वळण लावणं आवश्यक आहे. ते कसे लावावे हे बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

Advertisement

ततस्ततऽ कृषेदेतद्यत्र यत्रानुगच्छति ।

धृत्यात्मवशगं कुर्याच्चित्तं चञ्चलमादृत ।।14 ।।

अर्थ- हे चंचल चित्त जेथे जेथे जात असेल तेथून चिकाटीने आणि आदराने ओढून योगाचे ठिकाणी आणावे व धैर्याने ते आपल्या ताब्यात राहील असे करावे. सविस्तर पाहूयात पुढील भागात.

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article