For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महायुतीसाठी वर्चस्वाची, महाविकाससाठी अस्तित्वाची लढाई

06:13 AM Jan 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
महायुतीसाठी वर्चस्वाची  महाविकाससाठी अस्तित्वाची लढाई
Advertisement

नगरपालिका व महानगरपालिका या शहरी भागाच्या निवडणुका पार पडल्यानंतर खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये कोकणात महायुतीने वर्चस्व निर्माण केले आहे. नगरपालिकांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे महायुती सध्या सुसाट सुटली असून जि. प. व पं. स.च्या निवडणुकीसाठी पुरेपूर ताकद लावून मोर्चेबांधणीला लागली आहे. नगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या महायुतीने आता मात्र महायुतीतर्फे लढण्याचे जाहीर केले असून महायुती वर्चस्वाच्या लढाईच्या तयारीला लागली आहे. दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीत आलबेल असल्याचे चित्र असून महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

Advertisement

जि. प., पं. स.साठी येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होऊन 7 फेब्रुवारीला मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. जि. प. व पं. स.च्या निवडणुकांचे बिगूल वाजल्यानंतर शहरी भागात झालेल्या निवडणुकांनंतर आता कोकणच्या ग्रामीण भागात राजकीय आखाड्यात खऱ्या अर्थाने रणकंदन सुरु झाले आहे. अनेकांचे पारंपरिक मतदारसंघ असले, तरी आरक्षण सोडतीत अनेकांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे किंवा नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीने निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यातही महायुती होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, महाविकास आघाडी होणार की नाही, याबाबत अजूनही ताळमेळ जमलेला नाही. महायुतीने मात्र एक पाऊल पुढे टाकत जागा वाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केला आहे.

महायुती एकत्र लढत असल्याने त्यांच्या एकत्रित ताकदीमुळे विजयाच्या आशा अधिक पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यात महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात अनेक इच्छुकांचे मतदारसंघ हातून गेले आहेत. निवडणुकीची केलेली तयारी वाया गेली आहे. त्यामुळे नाराजांची संख्या वाढत आहे. काही पदाधिकाऱ्यांनी पदाच्या दिलेल्या राजीनाम्याने नाराजी नाट्या सुरु झाले आहे. नाराज झालेल्या इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करुन निवडणूक लढविल्यास महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा बंडखोरांना थंड करण्याचे कसब कसे वापरले जाते, यावर बरीच राजकीय गणिते ठरणार आहेत.

Advertisement

लोकसभा व विधानसभा निवडणुकांपासून महायुतीचे वर्चस्व कोकणात वाढले आहे. नगरपालिका निवडणुकीतही ते दिसून आले. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद फार कमी झालेली आहे. मात्र, हे वर्चस्व मिळविण्याची खरी संधी जि. प. व पं. स. निवडणुकीतून मिळत असते. त्यामुळे नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढल्याने महायुतीला फटका बसला होता. त्यातून धडा घेत, महाविकास आघाडी एकत्र लढल्यास महायुतीला फाईट करण्याची ताकद येऊ शकते. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस जवळ आला, तरी महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे महायुतीच्या वर्चस्वाच्या लढाईसमोर अस्तित्वाच्या लढाईसाठी तरी महाविकास आघाडीला लढावे लागणार आहे.

मुंबई महानगरपालिकेवर 25 वर्षांचे वर्चस्व ठाकरे बंधूंच्या हातून गेले. भाजप व शिंदेसेनेने युतीचा भगवा फडकविला आहे. असे असले, तरी एकसंघ असलेली शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांना अनेक नेते सोडून गेले. 90 टक्के शिवसेना खाली झाली, असे असतानाही ठाकरे बंधूंना मुंबई महानगरपालिकेत 71 जागांवर मिळालेले यश हे फार मोठे यश म्हटले जात आहे. या यशाचा फायदा कोकणात होऊ शकतो. कारण ठाकरेंचे निवडून आलेले बरेचसे नगरसेवक हे कोकणातील आहेत. त्यामुळे कोकणात त्याचा फायदा मिळू शकतो. परंतु कसा फायदा करुन घ्यायचा, यावरही यशापयश अवलंबून आहे. त्यामुळे मुंबईतील फायदा कोकणात होईलच असेही सांगता येत नाही. निवडणूक निकालानंतर किती फायदा झाला हे समजू शकेल.

खरं तर कोकण म्हटलं तर, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटले जाते. परंतु 2022 मध्ये शिवसेना फुटल्यानंतर कोकणातील शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला. विशेषत: शिंदेंची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या दोघांच्या सत्तासंघर्षात शिंदे शिवसेना कोकणात अजूनही तग धरुन आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची मात्र वाताहत निर्माण झाली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला पक्षसंघटना बांधणीपासून मोठे काम करावे लागणार आहे. तरच पुढील काळात ठाकरे शिवसेनेला थोडेफार चांगले दिवस येतील. अन्यथा पक्षाची ताकदच संपून जाईल. त्यासाठीच आताच्या जि. प. व पं. स. निवडणुकांत फार मेहनत घ्यावी लागणार आहे. तरच पक्ष टिकून राहू शकतो. महायुतीतील पक्ष मात्र वर्चस्वाची लढाई लढणार असून महायुतीतील पक्ष हे महाविकास आघाडीपेक्षा आपापसातच मोठा भाऊ होण्यासाठी लढाई लढण्याची शक्यता दिसत आहे.

जि. प. व पं. स. निवडणुका होत असताना लोकसभा निवडणुकांपासूनचे राजकारण पाहिल्यास लोकसभा निवडणुकीत कोकणात कधी नव्हे, ते भाजपचा खासदार नारायण राणे यांच्या रुपाने निवडून आला आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला इथेच मोठा सुरुंग लागला. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ जागांपैकी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदार संघाची एकमेव जागा ठाकरेसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यामुळे महाविकास आघाडीला मिळाली. उर्वरित सातही जागा महायुतीला मिळाल्या, त्यानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नगरपालिका काँग्रेसकडे गेली आणि सिंधुदुर्गातील कणकवली नगरपंचायत शहर विकास आघाडीकडे गेली. उर्वरित दोन्ही जिल्ह्यांतील 9 नगरपालिका महायुतीकडे गेलेल्या आहेत. यावरुन कोकणात महायुतीचेच वर्चस्व निर्माण झालेले दिसत आहे.

शहरी आणि ग्रामीण भागातील निवडणुकांच्या निकालांचा एकमेकांशी काही संबंध नसतो, असे म्हटले जाते. शहरी भागांचे प्रश्न वेगळे आणि ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे असे म्हटले जाते, तरी गेल्या दिड वर्षात लागोपाठ लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचा परिणाम ग्रामीण भागांच्या निवडणुकांवर निश्चितच होऊ शकतो हे नाकारता येत नाही. सर्वच निवडणुकांमध्ये महायुतीला यश मिळालेले आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. तसेच केंद्रापासून नगरपालिकांपर्यंत महायुतीचीच सत्ता असल्याने त्याचा परिणाम होऊन, दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकाचीच सत्ता असली, तर विकास कामे करणे सोपे होते. हा मुद्दा सत्ताधारी पुढे आणू शकतात. त्यामुळे नगरपालिकांप्रमाणे जि. प. व पं. स.च्या निवडणुकीत महायुतीचेच वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. मात्र, वर्चस्व कशा पद्धतीने मोडीत काढले जाईल, यासाठी महाविकास आघाडी कोणती रणनीती आखेल, याकडे लक्ष लागले आहेत.

जि. प. व पं. स. निवडणुकीसाठी एकीकडे महायुतीच्या माध्यमातून जवळपास उमेदवार निश्चित झालेले असताना महाविकास आघाडीला मात्र उमेदवारांची शोधाशोध करावी लागत आहे. मात्र, महायुती झाल्याने त्यांच्यातील भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने नाराज झालेल्या उमेदवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी महाविकास आघाडीला संधी निर्माण होऊ शकते. मात्र, महाविकास आघाडीतील नेते अॅक्टिव्ह मूडमध्ये असल्याचे अजून तरी दिसत नाही. त्यामुळे या निवडणुकीत सध्या तरी महाविकास आघाडीला अस्तित्वाच्या लढाईसाठीच धडपडावे लागणार आहे. असे राजकीय चित्र दिसत आहे. महायुती मात्र असलेले वर्चस्व अधिक भक्कम करुन वर्चस्वाची लढाई लढताना दिसत आहे.

संदीप गावडे

Advertisement
Tags :

.