For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झाले बहु, होतील बहु, परि या सम हाच!

06:26 AM Jan 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
झाले बहु  होतील बहु  परि या सम हाच
Advertisement

“भाऊसाहेब बांदोडकर हे खरे गोमंतकीय होते. त्यांच्यासारखा दुसरा गोमंतकीय निर्माण होण्यास किमान पाचशे वर्षे लागतील”. भाऊंच्या चरित्रावर कुणीही कितीही थुंकण्याचा प्रयत्न केला, तरी ती थुंकी त्यांच्यावरच पडेल. झाले बहु, होतील बहु, परि या सम हाच!

Advertisement

माणसाने चांगले कार्य केल्यास त्याची प्रशंसा व्हायलाच हवी, अगदी मुक्तकंठाने व्हायला हवी. प्रशंसा करण्यातून, शाबासकी देण्यातून ती देणाऱ्या माणसाच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. अशी माणसे हातचे न राखता खुलेपणाने प्रशंसा करतात. कोत्या मनाची माणसे मात्र चांगले कार्य करणाऱ्यालाही दुषणे देतात, त्याची बदनामी करतात. अलीकडेच गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक गोव्याचे शिल्पकार स्व. भाऊसाहेब उर्फ दयानंद बाळकृष्ण बांदोडकर या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे नाव घेतल्यामुळे काहीजणांच्या मनाचा मोठेपणा दिसून आला, तर काहींच्या मनाचा कोतेपणाही दिसून आला. प्रशंसा करणे ही चांगली गोष्ट आहे, मात्र एखाद्या व्यक्तीच्या कार्यावरुन त्याची दुसऱ्या व्यक्तीच्या कार्याशी तुलना करताना तारतम्य बाळगायला नको काय? काही उत्तुंग माणसांची तुलना इतरांशी करताच येत नाही, अशांमधीलच भाऊसाहेब बांदोडकर! त्यांच्याशी कुणाची तुलना करताच येत नाही, कारण ‘झाले बहु, होतील बहु, परि या सम हाच! भाऊसाहेब म्हणजे भाऊसाहेबच!

बाणावली मतदारसंघाचे आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगस यांच्या मतदारसंघात गोवा सरकारतर्फे जी विकासकामे राबविण्यात आली, त्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे त्यांनी आभार मानले. विरोधी पक्षाच्या आमदाराच्या मतदारसंघात विकासकामे राबवून मुख्यमंत्र्यांनी लोकशाही पाळली किंवा मुख्यमंत्र्यांच्या मनाचा तो मोठेपणा. आमदार व मुख्यमंत्री या दोघांनीही लोकशाहीतील आपापल्या जबाबदाऱ्या पाळल्या आणि मनाचा मोठेपणाही जपला. काहीजण मात्र आपल्या मतदारसंघातील विकासकामे मुख्यमंत्र्यांकडून करुन घेण्याची आपली जबाबदारी न पाळता उठसूठ टीका करत सुटलेले असतात. अशावेळी कॅप्टन वेन्झी यांनी स्वत:चे वेगळेपण दाखविले, त्याबद्दल अभिनंदन! व्हिएगस यांनी मुख्यमंत्र्यांची प्रशंसा केली, इथपर्यंत ठीक, पण त्यांनी केलेल्या विकासकामांची भाऊसाहेब बांदोडकर यांनी केलेल्या विकासकामांशी तुलना करणे आणि मुख्यमंत्र्यांची तुलना भाऊसाहेबांशी करणे, हे योग्य म्हणता येत नाही. कोणीही कितीही कार्य केले तरी, त्यांच्या कार्याची तुलना करताना तारतम्य बाळगायलाच हवे. याची जाणीव मुख्यमंत्र्यांनाही आहे, म्हणूनच ते म्हणाले की वेन्झीनी भावनेच्या भरात आपली फारच स्तुती केली.

Advertisement

भाऊसाहेब बांदोडकर यांचे कुणीतरी नाव काढले, हे कळल्याबरोबर दुसऱ्या एकाच्या पोटात दुखले, नव्हे ढवळून आले आणि त्यांनी ती गरळ ओकून टाकली. भाऊसाहेबांनी गोव्याची अस्मिता जपण्यासाठी उभे आयुष्य खर्ची घातले. पोर्तुगीजांविरुद्धच्या समरांगणात उडी घेऊन गोमंतभूमीला पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करुन या भूमिची अस्मिता टिकवून ठेण्यासाठी स्वत:चे जीवन पणाला लावले, अशा भाऊसाहेबांना गोव्याची अस्मिता माहीत नव्हती, अशी गरळ त्याने ओकली. राजकारणी झाले म्हणजे काहीही बरळण्यास आपण मोकळे आहोत, अशा मानसिकतेत वावरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रोज एकमेकांची उणीदुणी काढण्यातच धन्यता मानून आपण आपल्या मतदारसंघासाठीच नव्हे, तर गोव्यासाठी फार मोठे योगदान देत आहोत, असेही काहींना वाटत असते.

एकाशी सोयरिक, दुसऱ्याशी लग्न आणि हनीमून तिसऱ्याबरोबर, हा ट्रेंडही आता अंगवळणी पडलेला आहे. राजकारण्यांचे सारे खेळ जनता मुकाट्याने पाहतेय म्हणून कोणी आपल्या आदर्शांची अवमानना केली तर कोणी गप्प बसणार नाही. कदाचित आज त्याचा प्रत्यय दिसणार नाही, पण येणाऱ्या काळात नक्कीच येऊ शकेल. भाऊसाहेबांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. कुणाला भाऊसाहेबांचे जीवनचरित्र व कार्य माहीत नसेल, त्याने भाऊंनी गोव्याची अस्मिता जपण्यासाठी काय केले आहे आणि काय केले नाही, याचा अभ्यास जरुर करावा. पोर्तुगीजांनी गोव्याची अस्मिता चिरडून टाकण्याची एकही संधी सोडली नव्हती. त्यांना या भूमिवरुन हाकलून लावण्यासाठी गोमंतकीयांनी जो संघर्ष केला, त्यात भाऊसाहेबही होते. त्यांनी जेवढ्या ताकदीने गोव्याच्या मुक्तिसंग्रामाला मदत केली तेवढी अन्य कोणत्याच राजकारण्याने, उद्योजकाने केलेली नव्हती. ज्याने तुरुंगावासही भोगला, अशा स्वातंत्र्यसैनिकाला म्हणे गोव्याची अस्मिता माहीत नव्हती. काजव्याने सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार. हिंदू व ख्रिश्चनांचा एकोपा म्हणजे गोव्याची अस्मिता, ती भाऊंसारखी कुणी जपली नाही. भाऊनी कोंकणीलाही बाहेरची म्हटली नाही आणि मराठीलाही. त्यांनी इंग्रजीला कवटाळले नाही आणि रोमीलाही कवटाळले नाही. हिंदीला त्यांनी भारतीयत्व मानले. गोव्याचे माड, खाजन शेती, कुळागरे, मीठागरे ही गोव्याची अस्मिता, तिच्यासाठी भाऊसाहेबांनी केलेले कार्य म्हणजे त्याच्या विकासासाठीचे भक्कम अधिष्ठान होते. गोव्याची अननसे, आंबे, फणस यांनीही गोव्याची अस्मिता जपण्याचे कार्य केले. पारंपरिक व्यवसाय, हस्तकला, कला, अध्यात्म, धर्म, संस्कृतीची पताका डौलाने फडकवत ठेवली. रेंदेर, पाडेली, शेतकरी अशा तळागळातील गोमंतकीय म्हणजे गोव्याची अस्मिता त्यांनी जपली. हे सारे करताना त्यांनी ‘गोंय, गोंयकार, गोंयकारपण’ चा पुकारा केला नाही, ‘टॅग लाईन’चा सोस त्यांनी बाळगला नाही, पण जे कार्य केले ते अतुलनीयच आहे. गोव्यातील जमिनी सुरक्षित राहाव्यात, त्यांचे मालक गोमंतकीयच राहावेत यासाठी कार्य केले. स्वत: कधी जमिनी विकल्या नाहीत, जे आज काहीजण सर्रासपणे करतात. गोव्याच्या निसर्गसंपदेला भुलून जर पर्यटक गोव्यात येत असतील तर त्यांचे ‘अतिथी देवो भव’ मानून जरुर स्वागत करुया. पण ते अतिथी आमच्या गोव्याचे मालक होणार नाहीत, याची दक्षता घेण्याची जी दूरदृष्टी त्यांच्याकडे होती तिचे अधिष्ठान त्यांच्यातील गोव्याच्या अस्मितेत होते. गोव्याची शेती तर गोवेकरांनीच कसायचीच, पण त्यासाठीची खतेही गोव्यानेच तयार करावीत, हा त्यांचा ध्यास होता. त्यांनी कारखाने सुरु केले ते आपल्या कमिशनसाठी नव्हे, तर  त्यांच्यातील गोमंतकीय अस्मितेसाठी होते. गोवेकरांना जे जे आवश्यक आहे, ते ते गोव्यातच पिकावे, उत्पादीत करावे हा त्यांचा ध्यास म्हणजे त्यांच्यातील गोमंतकीयत्वाची अस्मिता होती. गोव्याची अस्मिता जपण्यासाठी त्यांनी शिक्षणक्षेत्रात जे कार्य केले आहे ते सर्वश्रुत आहे.

गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे की कर्नाटकात? की गोवा स्वतंत्र रहावा? हे ठरविण्याचा निर्णय केंद्र सरकारचा होता. राष्ट्रीय निर्णय म्हणून तो भाऊंनी मान्य केला आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन जनमत कौलाला सामोरे गेले. जनमत कौल झाल्यानंतर लोकांनी भाऊसाहेबांना पुन्हा निवडून दिले, मुख्यमंत्री केले, याचे कारण त्यांच्यातील गोव्याच्या अस्मितेबद्दलची तळमळ उभ्या गोव्याने पाहिली होती. भाऊंच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांचे राजकीय कट्टर विरोधक, पण वैयक्तिक मित्र डॉ. जॅक सिक्वेरा यांनी म्हटले होते, “भाऊ हे खरे गोमंतकीय होते. त्यांच्यासारखा दुसरा गोमंतकीय निर्माण होण्यास किमान पाचशे वर्षे लागतील”. भाऊंच्या चरित्रावर कुणीही कितीही थुंकण्याचा प्रयत्न केला, तरी ती थुंकी त्यांच्यावरच पडेल. झाले बहु, होतील बहु, परि या सम हाच!

राजू भिकारो नाईक

Advertisement
Tags :

.