For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाढता वाढता वाढे...

06:40 AM Jan 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
वाढता वाढता वाढे
Advertisement

सध्या सोने आणि चांदीच्या दराने उच्चांक गाठला आहे. दिवसेंदिवस यात वाढच होत आहे. सोने हा भारतीयांच्या खासकरून महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. दागिने, गुंतवणूक आणि नडी-कडीला सोन्याचा व्यवहार हा त्याचाच एक भाग. गेल्या काही वर्षात जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता यामुळे सोने आणि चांदीमधील गुंतवणूक वाढीस लागली आहे. दुसरीकडे, लग्न-सोहळ्यांमधील देवाण-घेवाणीमुळेही ती अत्यावश्यक गरज बनलेली आहे. सद्यस्थितीत गेल्या काही महिन्यांचा आढावा घेता सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंचे दर प्रचंड वेगाने वाढत आहेत. परिणामी सोन्याचे दर प्रतितोळा दीड लाखांच्या तर  चांदीदर प्रतिकिलो तीन लाखांच्या पुढे जात गगनाला भिडले आहेत. एकीकडे मागणी वाढल्यामुळे हे दर वाढत असल्याचा दावा केला जात असला तरी गरजेपोटी सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांची डोकेदुखी मात्र निश्चितच वाढलेली दिसत आहे. या सर्व गोष्टींचा घेतलेला हा आढावा.

Advertisement

सोन्याचा वापर हा प्रामुख्याने चार गोष्टींसाठी होतो.

Advertisement

  1. दागिने
  2. गुंतवणूक
  3. मध्यवर्ती बँकांची गुंतवणूक
  4. तंत्रज्ञान

दागिने

जागतिक बाजारपेठेत भारत व चीन हे सर्वाधिक सोन्याचे आकर्षण असणारे देश आहेत. त्यातील प्रमुख भाग हा दागिन्यांनी व्यापला आहे. श्रीमंतीचा भाग, सुबत्तेचे दर्शन आणि धार्मिक आणि परंपरेमध्ये सोन्याला अनन्यसाधारण महत्व असल्याने भारत हा सोन्याची खाणचा मानला जातो. जगभरातील सोन्यापैकी 50 टक्के सोने हे एकट्या भारत आणि चीनमध्ये केवळ दागिन्यासाठी वापरले जाते. त्यामुळे आशिया खंडातून सर्वाधिक सोन्याची मागणी दरवषी नोंदविली जाते.

जगभरात खनिकर्म तसेच रिसायकलींच्या माध्यमाद्वारे सोन्याचे उत्पादन होते. यातील 75 टक्के सोने कच्च्या स्वरूपात खाणीतून, उरलेले 25 टक्के सोने रिसायकल करून तयार होते. अमेरिका, दक्षिण आफ्रिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांत सोन्याच्या खाणी आहेत. भारतात कर्नाटक येथे सोन्याची खाण आहे. बरं या उत्पादित सोन्यापासून दागिने बनविण्याचा वाटा सर्वाधिक आहे. खरेतर सोन्याला सर्वच संस्कृतीत मोठे स्थान आहे. सूर्याचा अंश मानले गेलेल्या या धातूला दुसऱ्या महायुद्धानंतर खूप महत्व प्राप्त झाले. या काळात त्याची गुणवत्ता, मूल्यांकन आदी गोष्टी ठरविण्यात आल्या.

गुंतवणूक

जागतिक बाजापेठेतील चढ उतारांमुळे शेअर मार्केट नंतर सोने हा गुंतवणुकीसाठी दुसरा आणि सर्वोत्तम पर्याय मानला जातो. गोल्ड बाँड, ईटीएफ आदींचा यात समावेश होतो. जगभरात सध्या गोल्ड ईटीएफमध्ये 445 अब्ज डॉलर्सहून अधिकची गुंतवणूक झाली आहे. त्यातील निम्मी गुंतवणूक एकट्या अमेरिकेत म्हणजे अमेरिकेतील शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या फंड्समध्ये करण्यात आली आहे. सोन्याच्या दरामध्ये वाढ होण्यामागेही हे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. भारतामध्ये देखील गेल्या काही वर्षात गोल्ड बाँड, ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढली आहे. अस्थिर शेअरमार्केट आणि क्रिप्टोकरन्सी सारख्या आभासी चलनाच्या जोखीमेमुळे सोने खरेदीचा कल वाढला आहे. उद्योग क्षेत्रात देखील चांदीची मागणी वाढली आहे. शेअर मार्केटपेक्षा गेल्या वर्षभरातच सोने आणि चांदीने आकर्षक परतावा दिल्याने परंपरागत पर्यायाला नवी उंची प्राप्त झाली आहे.

मध्यवर्ती बॅकांची गुंतवणूक

जगातील  देशाची मध्यवर्ती बँक ही सोन्याची साठवणूक करीत असते. कठीण आर्थिक परिस्थती हाताळण्यासाठी सोन्याचा संचय केला जातो, त्यासाठी प्रत्येक देशातील मध्यवर्ती बँक सोन्याची खरेदी करून त्याचा संचय करीत असते. या बँकांचा मोठा वाटा सोन्याच्या मागणीत असतो. 2008 च्या जागतिक मंदीनंतर बँकांनी सोने खरेदीत वाढ केल्याचे दिसून आले आहे. 2008 सालच्या जागतिक मंदीने सर्व देशांचे कंबरडे मोडले. जगभरातील सर्व देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या. तेव्हापासून मात्र सोन्यातील गुंतवणूक सर्व देशांच्या मध्यवर्ती बँकांनी वाढवली आणि ती वाढतच गेली. सोने हा विश्वासार्ह, तसेच अस्थिर वातावरणातही फारसा परिणाम न करणारा घटक ठरला. त्यामुळे त्यामधील गुंतवणूक आतापर्यंत कमी जोखमीची ठरली आहे.

तंत्रज्ञान 

सोने आणि चांदीचा आधुनिक उद्योगांमध्ये, दागिन्यांव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात वापर होतो. कारण हे दोन्ही धातू उत्तम विद्युतवाहक, गंजरोधक आणि जैवसंगत असतात. अनेक इलेक्ट्रॉनिक्स पार्टस्, चीपमध्ये चांदी-सोन्याचा वापर केला जातो. याशिवाय आरोग्य क्षेत्रातही याचा वापर होतो. नवीकरणीय ऊर्जा  आणि वैद्यकीय क्षेत्रात देखील याची मागणी आहे. उत्कृष्ट विद्युतवाहक आणि ऑक्सीडेशनरोधक असल्याने सोन्या-चांदीचा वापर इलेक्ट्रॉनिक्समध्ये कनेक्टर्स, स्विचेस आणि वायरिंगसाठी केला जातो. (उदा. स्मार्टफोन्स, कॉम्प्युटर्स आणि सव्हर्समध्ये) एरोस्पेसमध्ये, ते अवकाशयाने आणि उपग्रहांवर इन्फ्रारेड प्रतिबिंब आणि तापमान नियंत्रणासाठी कोटिंग म्हणून वापरले जाते. वैद्यकीय उपयोगांमध्ये दातांच्या मिश्र्रधातू, पेसमेकर्स, स्टेंट्स आणि कर्करोग उपचारांसाठी नॅनोपार्टिकल्स समाविष्ट आहेत. चांदीचा उपयोग सौर पॅनेलमध्ये केला जातो. इलेक्ट्रकि वाहने, वायरिंग आणि  5जी नेटवर्क, मोबाईल्स आणि वेअरेबल्समध्ये वेगासाठी वापर, तर वैद्यकीय उपकरणांमध्ये जखमांवरील पट्ट्या आणि पॅथेटर्ससाठी जीवाणूविरोधी गुणधर्म असल्याने चांदीचा उपयोग होतो.

गुंतवणुकीचे वर्गीकरण

जागतिक पातळीवर सोने आणि चांदीच्या मागणीचे वितरण ईटीएफ, बाँड्स, दागिने आणि औद्योगिक वापर यांमध्ये विभागलेले आहे.

सोन्याच्या मागणीचे विभाजन...

दागिने  48 टक्के

गुंतवणूक (ईटीएफ, बार, कॉईन्स) 25 ते 30 टक्के,

मध्यवर्ती बँका 20 टक्के

तंत्रज्ञान/उद्योग 7 ते 10 टक्क्यांदरम्यान

चांदीच्या मागणीचे विभाजन

औद्योगिक 50 टक्क्यांपेक्षा जास्त

दागिने 20 ते 25 टक्के

गुंतवणूक 25 टक्के

सोन्याबाबतची रोचक तथ्ये

(सौजन्य : वर्ल्ड गोल्ड कौन्सील)

  1. जगातील सर्व सोने 5 मायक्रॉन जाडीच्या वायरमध्ये ओढले तर ते पृथ्वीला 11.2 दशलक्ष वेळा गुंडाळू शकते.
  2. सोन्याचा उकळी बिंदू : सोन्याचा उकळी बिंदू 2,808 अंश सेल्सिअस आहे.
  3. एक औस गाठ : पाच कॅरेट हिऱ्यापेक्षा एक औस सोन्याची गाठ शोधणे दुर्मीळ आहे.
  4. शरीराचे तापमान : मानवी शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअस आहे. सोन्याची उष्णतेची चालकता शरीराच्या तापमानापर्यंत त्वरित पोहोचते, म्हणून ते दागिन्यांसाठी मौल्यवान आहे.
  5. सोन्याचा वितळन बिंदू : सोन्याचा वितळन बिंदू 1,064 अंश सेल्सिअस आहे.
  6. आतापर्यंत 1,87,200 टन सोने खणले गेले आहे.
  7. 1885 मध्ये ऑस्ट्रेलियन खाणकऱ्याने जोहान्सबर्गजवळ सोन्याची खाण शोधली.
  8. आतापर्यंत खणलेले सर्व सोने 22 घनमीटर व्रेटमध्ये बसू शकते.
  9. खणल्या जाणाऱ्या सोन्यापैकी अर्धे सोने दागिन्यांसाठी वापरले जाते.
  10. मिश्र्रधतू सोने : सोन्याला रंग आणि ताकद देण्यासाठी इतर धातुंसोबत मिसळले जाते.
  11. सर्वात मोठे सोन्याचे नाणे : 2012 मध्ये पर्थ मिंटने 80 सेंमी व्यासाचे एक टन वजनाचे सर्वात मोठे सोन्याचे नाणे बनवले.
  12. एक औसची लांबी : एक औस सोने 50 मैल लांबीपर्यंत ताणले जाऊ शकते; वायर 5 मायक्रॉन ऊंद असेल.
  13. सर्वात मोठी सोन्याची गाठ : 1869 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मोलीगॉल येथे सापडलेली ‘वेल्कम स्ट्रेंजर’ ही 2,316 ट्रॉय औसची खाण होती.

14.अणू क्रमांक : सोन्याचा अणू क्रमांक 79 आहे, म्हणजे प्रत्येक अणूत 79 प्रोटॉन असतात.

15.लंडन बार : ‘लंडन गुड डिलिव्हरी बार’ हे 400 ट्रॉय औंस सोन्यापासून बनते.

  1. समुद्रातील सोने : जगातील समुद्रात देखील मोठ्या प्रमाणात सोने आहे 

सोन्याला झळाळी, चांदीला लकाकी

गगनाला भिडलेल्या दरांमुळे सर्वसामान्यांना ‘ताप’

सोने, चांदी ठरतेय गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय

गोल्ड इटीएफ, बाँड्स, बारमध्ये वाढली गुंतवणूक

चांदीच्या दरवाढीची कारणे

औद्योगिक मागणी : सोलर, इलेक्ट्रॉनिक्स आणि ईव्हीमधील वापरामुळे चांदी आता केवळ दागिनेच नव्हे तर एक आवश्यक कच्चा माल बनला आहे.

ट्रम्पची टॅरिफ भीती : अमेरिकन कंपन्या चांदीचा प्रचंड साठा जमा करत आहेत. जागतिक पुरवठा कमी झाल्यामुळे किमती वाढल्या.

उत्पादकांमधील स्पर्धा : उत्पादन थांबण्याच्या भीतीने प्रत्येकजण आगाऊ खरेदी करत असल्यामुळे येत्या काही महिन्यांतही वेग जास्त राहील.

चांदीमधील गुंतवणूक : गुंतवणूकदार सिल्वर ईटीएफद्वारे चांदीमध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे मागणी वाढत आहे.

                        संकलन -अर्चना माने-भारती, पुणे

Advertisement
Tags :

.