आयटी-बीटी हब संशयितांच्या होते टार्गेटवर
एनआयएच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित दहशतवाद्यांची एनआयएकडून कसून चौकशी केली जात आहे. बेंगळूरला आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवून दिलेल्या आयटी-बीटी हबवर बॉम्बहल्ला करण्याचा कट संशयितांनी रचला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
1 मार्च रोजी बेंगळूरमधील रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. या प्रकरणी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी स्फोट घडविणारा मुसावीर हुसेन शाजीब आणि सूत्रधार अब्दुल मतीन ताहा या दोघांना 12 एप्रिल रोजी पश्चिम बंगालमध्ये अटक करण्यात आली होती. या दोघा संशयितांचे मुख्य लक्ष हिंदू होते. त्यासाठीच बेंगळूरमधील आयटी-बीटी (माहिती तंत्रज्ञान-जैविक तंत्रज्ञान) कंपन्यांमध्ये घातपात घडविण्याची योजना आखली होती. विशेष आर्थिक क्षेत्रात (एसईझेड) मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या असल्याने तेथे हजारो कर्मचारी काम करतात. या ठिकाणी स्फोट घडविल्यास जगभरात याविषयी चर्चा होईल, या विचाराने मुसावीर आणि सूत्रधार अब्दुल मतीन ताहा या दोघांनी व्हाईटफिल्ड परिसरात रेकी केली.
मात्र, या भागात सुरक्षाव्यवस्था मजबूत असल्याने तेथे बॉम्ब ठेवणे सोपे नसल्याची जाणीव संशयितांना झाली. कंपन्यांमधील सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर आणि सुरक्षा रक्षकांमुळे येथे स्फोट घडविण्डयाचा विचार संशयितांनी सोडून दिला. नंतर याच भागात स्फोट घडविण्याच्या उद्देशाने आयटी कंपन्यांमधील कर्मचारी नाश्ता, भोजनासाठी गर्दी करत असलेल्या रामेश्वरम कॅफेची निवड केली. स्फोटाचे नियोजन करण्यापूर्वी अनेकदा कॅफेची पाहणी केल्यानंतर संशयितांना कॅफेमध्ये प्रवेश करण्यात सीसीटीव्ही कॅमेरे वगळता कोणतीही अडचण नसल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी 1 मार्च रोजी रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट घडविला. याच कालावधीत अयोध्येत राममंदिर उद्घाटन सोहळा आणि देशभरात उत्साहाचे वातावरण असल्याने याच कालावधीत घातपात घडविण्याचा कट रचला.