मृत्यूसमयी माणसाचे मन ज्या गोष्टीभोवती स्थिर झालेले असते त्या गोष्टीत त्याचे रुपांतर होते
अध्याय आठवा
संत त्रिगुणाच्या पलीकडे गेलेले असल्याने त्यांचा जीव ब्रह्माशी एकरूप झालेला असतो. संतांचे शरीर हे चालते बोलते ब्रह्म असते असं म्हंटलं तरी चालेल. त्यांचे वरवर भासणारे शरीर जरी नाश पावले तरी त्या शरीराशिवाय असणारी आत्मवस्तु आणि सर्वत्र भरलेले ब्रह्म आहे तसेच राहते. ही गोष्ट संतांनी जाणलेली असल्याने मृत्यूसमयी संतमंडळी भगवंतांचीच आठवण काढतात आणि तशी ती निघावी म्हणून सतत नामात दंग असतात. देहाची फिकीर नसलेले नामदेव महाराज त्यांच्या अभंगांत देवाला विनंती करताना म्हणतात, देह जाऊदे नाहीतर राहूदे तुझ्याचरणी माझा भाव मात्र दृढ राहू दे. तुझी शप्पथ घेऊन सांगतो की, मी तुझे चरण कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. तुझे मंगल नाम माझ्या मुखात अखंड राहो आणि हृदयात तुझ्याबद्दल सतत प्रेम राहो हा माझा पण आहे आणि तो चालू ठेव. प्रार्थना करतानासुद्धा आपण कर्ते नाही ह्याची जाणीव असल्याने ते म्हणतात मी पण केलाय खरा पण त्याची पूर्तता मात्र केशवा तूच करायची आहेस.
माऊली संतांच्या ब्रह्माशी झालेल्या ऐक्याबद्दल व्यवहारातले उदाहरण देताना म्हणतात की, सोने आणि तांबे मिसळून जर एखादा दागिना केला तर त्या दागिन्यामध्ये सोने आणि तांबे वेगवेगळे दाखवता येत नाही त्याप्रमाणे संतांचा जीव ब्रह्माशी एकरूप झालेला असल्याने दोघांना वेगवेगळे करता येत नाही. माऊलींच्याकडे त्यांनी मांडलेला सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांतांची किंवा अलीकडील भाषेत सांगायचं झालं तर उदाहरणांची काही कमी नसते. संतांच्या जीव आणि ब्रह्म ह्यांच्या ऐक्याचा त्यांनी मांडलेल्या सिद्धांताला धरून आणखी उदाहरणे देताना ते म्हणतात, खोल पाण्यात मातीचे भांडे जर बुडाले तर, ते आतबाहेर पाण्यानेच भरलेले असते. नंतर दैववशात् पाण्यात असतांनाच जर ते फुटले तर त्या भांड्यात असलेले पाणी फुटत नाही अथवा सापाने कात टाकली किंवा एखाद्याने उकडते म्हणून वस्त्र टाकले तर त्याच्या अवयवांमधे काही मोडतोड होत नाही त्याप्रमाणे वरवर भासणारे शरीर जरी नाश पावले तरी त्या शरीराशिवाय असणारी आत्मवस्तु आणि सर्वत्र भरलेले ब्रह्म आहे तसेच राहते. ही गोष्ट संतांनी जाणलेली असल्याने मृत्यूसमयी सामान्य मनुष्याप्रमाणे आता आपल्याला ह्या देहाचा त्याग करावा लागणार ह्यावर विचार करत न बसता संतमंडळी देवाचीच आठवण काढतात. संतांप्रमाणे अंतकाळी देवाला आठवत असताना जे देहाचा त्याग करतात ते देवरूपच होतात. मरण येऊन ठेपले असता मनुष्याच्या मनाला ज्या वस्तूची आठवण होते, त्याच वस्तुत त्याचे रुपांतर होते हे सगळ्यांना माहित आहेच. पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, मृत्यूसमयी माणसाचे मन ज्या गोष्टीभोवती स्थिर झालेले असते त्याचे त्या गोष्टीत रुपांतर होते.
जो जो आठवुनी भाव शेवटी देह सोडितो। मिळे त्या त्या चि भावास सदा त्यांत चि रंगला ।। 6।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी असं सांगितलं की, संतांप्रमाणे अंतकाळी माझी आठवण करून जे देहत्याग करतात ते मद्रूप होतात.
क्रमश: