For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोवावेस येथील पेट्रोलपंप जागेचा तिढा कायम

12:30 PM Oct 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोवावेस येथील पेट्रोलपंप जागेचा तिढा कायम
Advertisement

मनपाच्या सर्वसाधारण सभेत विकासकामांवर चर्चा : लाखो रुपयांचा महसूल वाया जात असल्याची तक्रार

Advertisement

बेळगाव : गोवावेस येथील मनपाच्या जागेतील पेट्रोलपंपचा तिढा अद्याप कायम आहे. एकूण 1 कोटी 42 लाख रुपये भाडे थकले असून ते वसूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु भाडेकरू न्यायालयात गेल्याने ही प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. नवीन निविदा मागविण्यात आल्या खऱ्या. परंतु तो भाडेकरूही आता कंत्राट घेण्यास तयार नसल्याने महापालिकेला पुन्हा एकदा निविदा मागवाव्या लागणार आहेत. या सर्वांमध्ये लाखो रुपयांचा महसूल वाया जात असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. मंगळवारी बेळगाव महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेवेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. गोवावेस येथील पेट्रोलपंपचा तिढा मागील अनेक दिवसांपासून तसाच आहे. यासंदर्भात नगरसेवक नितीन जाधव यांनी प्रश्न विचारून बुडालेल्या महसुलाबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

नवीन निविदा काढल्यानंतर भाडेकरूने जागा मोकळी करून देण्याची मागणी केली होती. परंतु सध्या हा भाडेकरू जागा घेण्यास तयार नसल्याने त्याने दिलेली अनामत रक्कम गोठवावी का? यासंदर्भात चर्चा झाली. गोवावेस येथील पेट्रोलपंपची जागा शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने त्या जागेचा वापर इतर कामांसाठी केला जाऊ शकतो का? असा प्रश्न नगरसेवक रमेश सोंटक्की यांनी मांडला.   मंगळवार पेठ, टिळकवाडी येथे मास्टरप्लॅन करताना हरिश्चंद्र पै यांची जमीन गेल्याचा मुद्दा चर्चेला आला. महापौर चषकासाठी पाच लाख रुपयांचा निधी राखीव ठेवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सत्ताधारी गटासाठी चार कोटी तर विरोधी गटासाठी 6 कोटी रुपये निधी आला असून तो निधी प्रत्येक नगरसेवकांना दिला जाणार आहे. काही नगरसेवकांनी आपल्याला अधिक निधी मिळावा, अशी मागणी केली. यावेळी महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, मनपा आयुक्त शुभा बी., कौन्सिल सेक्रेटरी उदयकुमार तळवार यांसह अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

अशोकनगर येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा विकास करा

विधानपरिषद सदस्य साबन्ना तळवार यांनी मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी अशोकनगर येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सबाबत माहिती जाणून घेतली. अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधण्यात आले असले तरी अद्याप जीम व स्वीमिंग पूलसाठी कोणीही निविदा भरल्या नसल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे लवकर निविदा काढून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

...अन्यथा कंत्राटदाराला काळ्या यादीत घाला

विकासकामांना मंजुरी मिळूनदेखील कंत्राटदाराकडून विलंब होत असल्याची तक्रार नगरसेवक शिवाजी मंडोळकर व बसवराज मोदगेकर यांनी मांडली. 2023 मध्ये मंजुरी मिळूनदेखील कामाला सुरुवात करण्यात आली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी आमदार राजू सेठ यांनी मध्यस्थी करत संबंधित कंत्राटदारांना आणखी एक संधी द्या, त्यानंतरही काम सुरू न केल्यास अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत घालण्याची सूचना केली. याला आयुक्तांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

Advertisement
Tags :

.