ऊसतोड कामगार मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक ऊसतोड मजूर आपल्या कुटुंबासमवेत बेळगाव जिल्ह्यात दाखल झाले आहेत. परंतु, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी तंबू शाळा नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील ऊसपट्ट्यात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी तंबू शाळा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. बेळगाव जिल्ह्यात 27 साखर कारखाने असून 2 लाख 97 हजार हेक्टर जमिनीत उसाची लागवड करण्यात आली आहे. बहुतांशी साखर कारखान्यांमध्ये उसाचे गाळप सुरू झाले आहे. लातूर, सोलापूर, बीड व महाराष्ट्राच्या इतर भागातून ऊसतोड कामगारांच्या टोळ्या जिल्हाभरात दाखल झाल्या आहेत. त्यांच्यासमवेत त्यांचे कुटुंब असून मुलांचीही संख्या अधिक आहे. ही मुले ज्या ज्या ठिकाणी तंबू ठोकले जातात, त्या ठिकाणी गावांमध्ये जाऊन उदरनिर्वाह चालवतात.
तंबू शाळा सुरू करण्याची गरज
ऊसतोड कामगार महाराष्ट्रातून गळीत हंगामासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. विशेषत: चिकोडी, अथणी, रायबाग, कुडची, निपाणी, संकेश्वर, हुक्केरी, बेळगाव, खानापूर, सौंदत्ती, बैलहोंगल या परिसरात ऊसतोड कामगार दाखल झाले आहेत. हे कामगार मराठी असल्याने त्यांच्या मुलांसाठी मराठी तंबू शाळा सुरू करणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी ज्या ज्या ठिकाणी तंबू असतील त्या त्या ठिकाणी तंबू शाळा सुरू करण्यात येत होत्या. परंतु, यावर्षी शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
सोयीसुविधा कारखान्यांनी पुरवाव्यात
जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांबरोबर झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. ऊसतोड कामगारांना लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा साखर कारखान्यांनी पुरवाव्यात, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
- नितेश पाटील (जिल्हाधिकारी)
सरकारने तंबू शाळा उपलब्ध करून देणे गरजेचे
आम्ही मूळचे लातूरचे असून सध्या अलारवाडजवळ ऊसतोड करीत आहोत. माझा मुलगा कार्तिक हा मराठी माध्यमात पहिलीच्या वर्गात शिकत आहे. आमचे कुटुंबच बेळगावला आल्याने कार्तिकचे शिक्षण थांबले आहे. आता हंगाम संपेपर्यंत आम्ही जिल्ह्याच्या विविध भागात थांबणार असून सरकारने मराठी माध्यमाच्या तंबू शाळा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
- लक्ष्मण कांबळे (ऊसतोड कामगार, लातूर)
अतिथी शिक्षकांची नेमणूक करणार
ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी अतिथी शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी साखर कारखान्यांच्या सहकार्याने शाळा सुरू करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.
- रोहनकुमार हंचाटे (जिल्हा शिक्षणाधिकारी, चिकोडी)