For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दलित मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

12:41 PM Jan 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
दलित मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
Advertisement

राज्यात दलित नेता मुख्यमंत्री न बनल्याने मंत्री मुनियप्पा यांची खंत : गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनीही केले होते भाष्य 

Advertisement

बेंगळूर : राज्य काँग्रेस सरकारमध्ये नेतृत्त्व बदलाचा मुद्दा तापलेला असतानाच दलित मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यात दलित नेता मुख्यमंत्री न बनल्याची मला खंत आहे. हायकमांडने मनात आणले तर सर्वकाही होईल, अशी नाराजी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी वक्कलिग समुदायातील प्रभावी नेते उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडून प्रयत्न सुरू असतानाच मुनियप्पा यांनी देखील दलित मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा उपस्थित केला आहे. यापूर्वी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी यावर भाष्य केले होते. बेंगळूरमध्ये गुरुवारी पत्रकारांशी बोलताना मुनियप्पा यांनी, दलित नेत्याला मुख्यमंत्री बनविण्याची अप्रत्यक्षपणे मागणी केली. हायकमांडने मनात आणले तर सर्वकाही होईल. हायकमांडला कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यावा, हे ठाऊक आहे.

आता निर्णय घेण्याच्या ठिकाणी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आहेत. त्यामुळे आम्ही आणखी काय बोलणार, असे ते म्हणाले. राज्यात 25 टक्के लोक अनुसूचित जातीतील आहेत. यातील 75 टक्के लोक काँग्रेसला मत देतात. ही बाब काँग्रेसश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिली आहे. दलित व्यक्ती मुख्यमंत्री न बनल्याबद्दल आम्हाला दु:ख आहे. मी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बाजूनेही नाही, अन् विरोधातही नाही. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या बाजूनेही नाही, विरोधातही नाही. डी. के. शिवकुमार यांनी चांगल्या रितीने काम केले आहे. सिद्धरामय्या यांनी देखील इतिहास निर्माण केला आहे, असे ते म्हणाले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी म्हैसूरमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना बोलावून चर्चा केली आहे. दिल्लीला जावे की नाही, हे या दोघांवर अवलंबून आहे. हायकमांड त्यांना बोलावून घेतील. त्यानंतर सर्वकाही गोंधळ दूर होईल, असेही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी म्हटले आहे.

Advertisement

भेटीविषयी जाहीरपणे भाष्य करणार नाही : डी. के. शिवकुमार

राहुल गांधी यांची भेट घेण्यात विशेष काही नाही. दिल्लीला गेल्यानंतर तेथील नेत्यांची भेट घेणे साहजिकच आहे. वरिष्ठ नेते राज्यात आल्यानंतर त्यांची भेट घ्यावीच लागते. म्हैसूरमधील भेटीत विशेष काही नाही. चर्चेच्या विषयावर जाहीरपणे भाष्य करणार नाही, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. गुरुवारी बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी ते बोलत होते. राहुल गांधींनी भेटीसाठी बोलावले का, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, शुक्रवारी सर्व नेते दिल्लीत राहतील. त्यांच्याशी माझी भेट होईल. राहुल गांधी आमचे नेते आहेत. पक्षाध्यक्षांची भेट घेणे, फोनवरून संभाषण करणे ही सहज चालणारी प्रक्रिया आहे. त्याविषयी उघडपणे बोलणार नाही, असेही ते म्हणाले.

मंत्री प्रियांक खर्गेंनी घेतली डी. के. शिवकुमारांची भेट

म्हैसूरमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांची भेटल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त झाले. आता ग्रामविकास मंत्री व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी गुरुवारी डी. के. शिवकुमार यांची भेट घेतल्याने कुतूहल निर्माण झाले आहे. सकाळी प्रियांक खर्गे शिवकुमार यांच्या भेटीसाठी त्यांच्या बेंगळुरातील निवासस्थानी आले. याप्रसंगी शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश हे देखील होते. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रियांक खर्गे यांनी शिवकुमार यांच्यासोबत राजकीय विषयावर चर्चा केलेली नाही. बीएमआरसीमधील नेमणुकीत 25 उमेदवारांवर अन्याय झाला होता. तो दूर करण्याची विनंती केली, असे स्पष्टीकरण दिले.

Advertisement
Tags :

.