इस्रोच्या ‘प्रोबा-3’चे प्रक्षेपण लांबणीवर
तांत्रिक अडचणीमुळे मोहीम एक दिवसाने पुढे ढकलली : सूर्याचा अभ्यास केला जाणार
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (इस्रो) ‘प्रोबा-3’ मोहिमेचे प्रक्षेपण एका दिवसाने पुढे ढकलले आहे. ही मोहीम बुधवारी सायंकाळी 4:08 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकलद्वारे (पीएसएलव्ही) प्रक्षेपित केली जाणार होती. मात्र, तांत्रिक समस्येमुळे हे मिशन आता गुरुवारी म्हणजेच 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4:16 वाजता प्रक्षेपित केले जाईल, असे इस्रोने सांगितले.
‘प्रोबा-3’ हे मिशन युरोपियन स्पेस एजन्सीचे (इएसए) आहे. कोरोनोग्राफ आणि ऑक्युल्टर या दोन उपग्रहांद्वारे सूर्याच्या बाह्या वातावरणाचा अभ्यास करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेतील दोन्ही उपग्रह एकमेकांपासून 150 मीटर अंतरावर राहून पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतील. पृथ्वीपासून त्यांचे कमाल अंतर 60,530 किमी आणि दुसरे किमान अंतर सुमारे 600 किमी असेल. या कक्षेत दोन्ही उपग्रह एकमेकांपासून 150 मीटर अंतर ठेवू शकतील आणि एका युनिटप्रमाणे काम करतील.
ऑक्युल्टर उपग्रहामध्ये सूर्याच्या तेजस्वी डिस्कला ब्लॉक करण्यासाठी डिझाईन केलेली 1.4 मीटरची डिस्क आहे. यामुळे कृत्रिम सूर्यग्रहण होते. या सावलीत कोरोनोग्राफ उपग्रह आपल्या दुर्बिणीद्वारे सौर कोरोनाचे निरीक्षण करेल. सौर वादळ आणि कोरोनल मास इजेक्शनसह अवकाशातील हवामानाविषयीची आपली समज वाढवणे हे ‘प्रोबा-3’चे प्राथमिक ध्येय आहे. या मोहिमेत अंतराळ संस्थेला दोन उपग्रहांद्वारे त्याच्या प्रगत निर्मिती-उडान तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण करायचे आहे. सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा कोरोना जास्त गरम का आहे आणि सौर वारा कसा तीव्र होतो याचा अभ्यास ‘प्रोबा-3’च्या माध्यमातून शास्त्रज्ञ करणार आहेत.