‘डॉकिंग’ यशस्वी करत इस्रोचे ऐतिहासिक यश
स्पॅडेक्स मोहिमेंतर्गत अवकाशात उपग्रह जोडण्याची किमया करणारा भारत ठरला चौथा देश
वृत्तसंस्था/बेंगळूर
भारतीय अंतराळ संस्था ‘इस्रो’ने अवकाशात आणखी एक इतिहास रचला आहे. स्पॅडेक्स मोहिमेंतर्गत अंतराळयान डॉकिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या मोहिमेत मोठे यश मिळवताना इस्रोने दोन्ही उपग्रह अवकाशात जोडले आहेत. या ऐतिहासिक कामगिरीमुळे अमेरिका, रशिया आणि चीननंतर असा पराक्रम करणारा भारत चौथा देश ठरला आहे. 2025 मधील इस्रोचे हे पहिले मोठे यश आहे. या यशाबद्दल इस्रो प्रमुखांनी आनंद व्यक्त करत सर्व शास्त्रज्ञांच्या कामगिरीचे कौतुक करतानाच देशवासियांचे आभार मानले आहेत.
अंतराळात दोन उपग्रह यशस्वीरित्या ‘लॉक’ करणारा भारत हा चौथा देश बनला आहे. ‘भारताचा डॉकिंग प्रयोग 16 जानेवारी रोजी सकाळी पूर्ण झाला’ अशी घोषणा गुरुवारी इस्रोकडून करण्यात आली. यापूर्वी फक्त रशिया, अमेरिका आणि चीन हे देश डॉकिंग करण्यात यशस्वी झाले आहेत. भारताच्या स्पॅडेक्स मोहिमेच्या यशावरच आगामी चांद्रयान-4, गगनयान आणि भारतीय अंतराळ स्थानक यासारख्या मोहिमा अवलंबून आहेत. चांद्रयान-4 मोहिमेत चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जातील. तर गगनयान मोहिमेत मानवांना अंतराळात पाठवले जाणार आहे.
इस्रोने 30 डिसेंबर 2024 रोजी रात्री 10 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट मिशन लाँच केले होते. या अंतर्गत, पीएसएलव्ही-सी60 रॉकेटद्वारे पृथ्वीपासून 470 किमी वर दोन उपग्रह तैनात करण्यात आले. या मोहिमेत दोन्ही उपग्रह 7 जानेवारी रोजी जोडले जाणार होते, परंतु ते पुढे ढकलण्यात आले. तसेच 9 जानेवारी रोजीही तांत्रिक अडचणींमुळे डॉकिंग पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर पुन्हा 12 जानेवारी रोजी उपग्रहांना एकमेकांपासून 3 मीटर अंतरापर्यंत जवळ आणण्यात आले आणि नंतर सुरक्षित अंतरावर परत हलवण्यात आले. आता 16 जानेवारी 2025 रोजी ही मोहीम फत्ते करताना दोन्ही उपग्रह एकत्र जोडण्यात आले आहेत.
इस्रोचे ट्विट
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने ‘एक्स’ वर पोस्ट केले की ‘स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट’ (स्पॅडेक्स) अंतर्गत गुरुवारी उपग्रहांचे डॉकिंग यशस्वीरित्या पूर्ण झाले. “भारताने अंतराळ इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. सुप्रभात भारत, इस्रोच्या स्पॅडेक्स मोहिमेला ‘डॉकिंग’मध्ये ऐतिहासिक यश मिळाले आहे. या क्षणाचा साक्षीदार असल्याचा आम्हाला अभिमान आहे.” असे इस्रोने म्हटले आहे.
दोन उपग्रहांचे जोडकाम
पीएसएलव्ही-सी60 रॉकेटने दोन लहान उपग्रह - एसडीएक्स01 (चेझर) आणि एसडीएक्स02 (टार्गेट) - 24 पेलोडसह वाहून नेले होते. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या पहिल्या लाँचपॅडवरून त्यांचे उ•ाण झाले होते. उ•ाणानंतर सुमारे 15 मिनिटांनी प्रत्येकी 220 किलो वजनाचे दोन छोटे उपग्रह 475 किमी अंतराळात निर्धारित वर्तुळाकार कक्षेत सोडण्यात आले होते.
उद्देश काय?
स्पॅडेक्स मोहीम ही दोन लहान उपग्रहांचा वापर करून अवकाशात ‘डॉकिंग’ करण्यासाठी एक परवडणारी तंत्रज्ञान मोहीम आहे. कोणत्याही सामान्य मोहिमेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनेक उपग्रह प्रक्षेपणांची आवश्यकता असते तेव्हा अंतराळात ‘डॉकिंग’ तंत्रज्ञान आवश्यक असते. चंद्रावरील आगामी मोहिमेत या तंत्रज्ञानाची आवश्यकता भासणार आहे. चंद्रावरून पृष्ठभागाचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी हे तंत्रज्ञान आवश्यक आहे.