12 जानेवारीला इस्रो करणार उपग्रहाचे प्रक्षेपण
ईओएस-एन1 उपग्रह करणार प्रक्षेपित
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
भारत अंतराळात आणखी एक मोठी झेप घेण्यास सज्ज आहे. पीएसएलव्ही रॉकेट 12 जानेवारी रोजी सकाळी 10.17 वाजता ईओएस-एन1 उपग्रहाला अंतराळात नेणार आहे. या मोहिमेत 18 अन्य छोटे पेलोडही सामील असतील, जे विविध देश आणि संस्थांसाठी आहेत.
हे प्रक्षेपण भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी एक मोठे पाऊल आहे. ईओएस-एन1 उपग्रह पृथ्वीचे अवलोकन करत हवामानाची माहिती, आपत्ती व्यवस्थापन आणि कृषी यासारख्या क्षेत्रांमध्ये मदत करणार आहे. ही मोहीम भारताच्या अंतराळ कूटनीतिला दर्शविणारी असेल.
पीएसएलव्ही म्हणजेच पोलर सॅटेलाइट लाँच व्हीकल भारताचा अत्यंत विश्वासार्ह प्रक्षेपक आहे. या प्रक्षेपकाने यापूर्वी अनेक उपग्रहांना यशस्वीपणे अंतराळाच्या कक्षेत पोहोचविले आहे. यावेळच्या मोहिमेत 18 सह-यात्री पेलोडही पाठविण्यात येत आहेत. हे पेलोड वेगवेगळे देश आणि संस्थांसाठी आहेत. 2026 या वर्षाकरिता इस्रोने मोठी योजना आखली आहे. इस्रो मार्च 2026 पर्यंत 7 मोहिमा पूर्ण करणार आहे. यात क्रू नसलेली रोबोटिक टेस्ट आणि ग्रहांचा शोध यासारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमा सामील आहेत. इस्रोसाठी हे किफायतशीर नवोन्मेषाचे एक आकर्षक उदाहरण असेल. भारत एक क्षेत्रीय खेळाडूपासून एक प्रमुख जागतिक अंतराळशक्ती होण्याच्या मार्गावर असल्याचे इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी म्हटले आहे.