इस्रोने पुन्हा रचला एक विक्रम
युरोपियन स्पेस एजन्सीच्या ‘प्रोबा-3’ मिशनचे यशस्वी प्रक्षेपण : कोरोनोग्राफ, ऑकल्टर उपग्रह अवकाशात
मोहीम...
- ‘प्रोबा-3’द्वारे सूर्याचा अभ्यास केला जाणार
- अवकाशातील हवामानाची माहिती मिळणार
- कोरोना, सूर्याचे बाह्य वातावरण तपासणार
वृत्तसंस्था/श्रीहरिकोटा
युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबा-3 मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण करत इस्रोने इतिहास रचला आहे. गुरुवारी सायंकाळी पीएसएलव्ही रॉकेटद्वारे कोरोनोग्राफ आणि ऑकल्टर या दोन संयुक्त उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. इस्रोची ही 61 वी पीएसएलव्ही मोहीम ठरली आहे. यापूर्वी बुधवारी भारतीय अंतराळ संस्थेने काही तांत्रिक बिघाडामुळे प्रक्षेपण पुढे ढकलले होते.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ट्विटरवर उ•ाण यशस्वी झाल्यासंबंधीची माहिती दिली. पीएसएलव्ही-सी59 ने अवकाशाच्या दिशेने उ•ाण करून नवा इतिहास रचला आहे. गुरुवारी सायंकाळी 4:04 वाजता मोहीम प्रक्षेपित झाल्यानंतर कोरोनाग्राफ आणि ऑकल्टर उपग्रह 18 मिनिटांच्या प्रवासानंतर त्यांच्या नियुक्त कक्षेत पोहोचले. एकदा कक्षेत गेल्यावर, दोन उपग्रह 150 मीटर अंतरावर राहून एकात्मिक उपग्रह प्रणाली म्हणून कार्य करणार आहेत. हे मिशन ‘एनएसआयएल’च्या नेतृत्वाखालील आणि ‘इस्रो’च्या आघाडीच्या तंत्रज्ञानाद्वारे समर्थित, युरोपियन स्पेस एजन्सीचे अत्याधुनिक प्रोबा-3 उपग्रह अंतराळात ठेवण्याचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे आंतरराष्ट्रीय सहकार्याचे उत्कृष्ट उदाहरण असून ते भारताच्या वाढत्या अवकाश क्षमतेचे साक्षीदार ठरले आहे.
‘प्रोबो-3’च्या प्रक्षेपणासाठी इस्रोने पीएसएलव्ही-सी59 रॉकेटचा वापर केला. प्रोबा-3 हा जगातील पहिला प्रिसिजन फॉर्मेशन फ्लाइंग सॅटेलाईट आहे. प्रोबा-3 मिशन अंतर्गत कोरोनोग्राफ आणि ऑकल्टर उपग्रह अवकाशात पाठवण्यात आले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने गुरुवारी युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबा-3 मोहिमेचे प्रक्षेपण केले आहे. हे मिशन कोरोना, सूर्याच्या बाह्या वातावरणाचा अभ्यास करेल.
या मोहिमेतील दोन्ही उपग्रह एकमेकांपासून 150 मीटर अंतरावर राहून पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतील. पृथ्वीपासून त्यांचे कमाल अंतर 60,530 किमी आणि दुसरे किमान अंतर सुमारे 600 किमी असेल. या कक्षेत दोन्ही उपग्रह एकमेकांपासून 150 मीटर अंतर ठेवू शकतील आणि एका युनिटप्रमाणे काम करतील. ऑकल्टर उपग्रहामध्ये सूर्याच्या तेजस्वी डिस्कला ब्लॉक करण्यासाठी डिझाईन केलेली 1.4 मीटरची डिस्क आहे. यामुळे कृत्रिम सूर्यग्रहण होते. या सावलीत कोरोनोग्राफ उपग्रह आपल्या दुर्बिणीद्वारे सौर कोरोनाचे निरीक्षण करेल. सौर वादळ आणि कोरोनल मास इजेक्शनसह अवकाशातील हवामानाविषयीची आपली समज वाढवणे हे ‘प्रोबा-3’चे प्राथमिक ध्येय आहे. या मोहिमेत अंतराळ संस्थेला दोन उपग्रहांद्वारे त्याच्या प्रगत निर्मिती-उडान तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण करायचे आहे. सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा कोरोना जास्त गरम का आहे आणि सौर वारा कसा तीव्र होतो याचा अभ्यास ‘प्रोबा-3’च्या माध्यमातून शास्त्रज्ञ करणार आहेत.
‘प्रोबा-3 मिशन’ची व्याप्ती
- प्रोबा-3 मोहिमेची रचना सूर्याच्या कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आली आहे. कोरोना हे सूर्याचे बाह्य वातावरण असून ते सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा जास्त गरम आहे. हे अंतराळ हवामानाचे स्त्राsत असल्यामुळे तो शास्त्रज्ञांसाठी विशेष आवडीचा विषय बनतो.
- प्रोबा-3 मिशनमध्ये कोरोनाग्राफ (310 किलो) आणि ऑकल्टर (240 किलो) असे दोन उपग्रह आहेत. हे दोन्ही उपग्रह मिळून एक अनोखा प्रयोग करणार आहेत. ऑकल्टर उपग्रह सूर्याच्या डिस्कला कव्हर करेल, तर कोरोनाग्राफ उपग्रह सूर्याच्या कोरोनाचे स्पष्टपणे निरीक्षण करणार आहे.
- या तंत्रज्ञानामुळे सूर्याच्या कोरोनाचा अभ्यास करण्यात मदत होणार आहे. दोन्ही उपग्रह संयुक्तपणे एका निश्चित कक्षेत एकत्र ठेवलेले आहेत. या तंत्रज्ञानाचे यशस्वीरित्या प्रात्यक्षिक केल्यास भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी नवीन मार्ग खुले होतील.
पीएसएलव्ही-सी59 रॉकेटची किमया...
प्रोबो-3 प्रक्षेपणासाठी पीएसएलव्ही-सी59 रॉकेटचा वापर करण्यात आला. हे रॉकेट 44.5 मीटर उंच आहे. पीएसएलव्ही रॉकेटचे हे 61 वे उ•ाण आहे आणि पीएसएलव्ही-एक्सएल प्रकाराचे 26 वे मिशन होते. पीएलएलव्ही-एक्सएल प्रकार हे वजनदार उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.