इस्रोचा उपग्रह ‘स्पेसएक्स’कडून प्रक्षेपित
उपग्रहाचे वजन अधिक असल्याने स्पेसएक्सचे घेतले साहाय्य : इस्रोचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा अत्याधुनिक दूरसंचार उपग्रह ‘जीसॅट-एन 2’चे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. या उपग्रहाची निर्मिती इस्रो या भारतीय संस्थेने केली आहे. मात्र, इस्रो स्वत: उपग्रह प्रक्षेपणात निष्णात असूनही हा उपग्रह अंतरिक्षात सोडण्यासाठी अमेरिकेतील प्रख्यात उद्योगपती इलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ या कंपनीचे साहाय्य घेण्यात आहे. हा उपग्रह आकाराने मोठा आणि वजनदार असल्याने त्याच्या प्रक्षेपणासाठी स्पेसएक्सचे साहाय्य घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि अमेरिकेतील स्पेसएक्स या दोन संस्थांमध्ये झालेला हा प्रथमच सहकार्य व्यवहार होता. भविष्यकाळात या दोन संस्थांमध्ये आणखी अनेक विषयांमध्ये सहकार्य होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जीसॅट-एन 2 या उपग्रहाचे प्रक्षेपण स्पेसएक्सच्या ‘फाल्कन 9’ या शक्तीशाली अग्नीबाणाकडून मंगळवारी करण्यात आले. न्यू स्पेस इंडिया लिमिटेड या इस्रोच्या औद्योगिक शाखेचे अध्यक्ष राधाकृष्णन दुराईराज हे या प्रक्षेपणाच्यावेळी उपस्थित होते. हे प्रक्षेपण यशस्वी झाले असून जीसॅट एन-2 हा भारतीय उपग्रह अवकाशात योग्य त्या कक्षेत स्थानापन्न झाला आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.
डिजिटलायझेशन कार्यक्रमाला वेग मिळणार
या उपग्रहामुळे भारतातील दूरसंचार क्षेत्राला नवे बळ मिळणार आहे. केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी डिजिटलायझेशन योजना क्रियान्वित केली आहे. या योजनेसाठी हा उपग्रह महत्त्वाचा असून त्यामुळे डाटा ट्रान्स्फर अधिक वेगवान पद्धतीने होणार आहे, अशी माहिती इस्रोच्या संशोधकानी दिली आहे.
कसा आहे जीसॅट- एन 2...
ड जीसॅट-एन 2 हा उपग्रह इस्रोचे उपग्रह केंद्र आणि लिक्विड प्रोपल्शन सिस्टिम केंद्र यांच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारला आहे. हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि सर्वात वजनदार दूरसंचार उपग्रह आहे. त्याची डाटा क्षेपण क्षमता 48 जीबीपीएस इतकी असून तो जागतिक गुणवत्तेचा आहे.
ड या उपग्रहाचे कार्यायुष्य किमान 14 वर्षे इतके आहे. त्याचे वजन 4 हजार 700 किलोग्रॅम इतके आहे. त्यामध्ये 32 युजर बीम्स असून त्यांच्यापैकी 8 बीम्स ईशान्य भारतासाठी तर 24 बीम्स ऊर्वरित भारतावर केंद्रीत केलेली आहेत. या बीम्सना भारतातील विविध नियंत्रक केंद्रांकडून साहाय्य देण्यात येणार आहे.
ड हा उपग्रह केए बँड एचटीएस दूरसंचार पेलोड प्रकारचा असून त्याची क्षमता 48 जीबीपीएस डाटा क्षेपित करण्याची आहे. या उपग्रहामुळे भारतातील दूरसंचार सेवा अधिक वेगवान आणि अचूक होणार असून भारताच्या महत्त्वाकांक्षी डिजिटलायझेशन कार्यक्रमासाठी त्याचे मोठ्या प्रमाणात साहाय्य होणार आहे.