गाझा शहरातील इस्रायलच्या आक्रमणास प्रारंभ
3 लाख लोकांनी शहर सोडले : हवाई हल्ल्यात 41 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ गाझा
इस्रायलने गाझा शहरात ग्राउंड ऑपरेशन म्हणजेच जमिनीवरील हल्ले सुरु केले आहेत. इस्रायलच्या दोन अधिकाऱ्यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. गाझा शहराच्या बर्हिगत भागातून ही कारवाई सुरू झाली असून येथे रात्रभर इस्रायलचे हवाईहल्ले देखील जारी राहिले. या हल्ल्यांमध्ये 41 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर इस्रायलच्या सैन्यानुसार आतापर्यंत 3.2 लाख लोकांनी शहर सोडले आहे.
ओलिसांची मुक्तता आणि हमासच्या पराभवासाठी सैन्य साहसाने लढत आहे. गाझा पेटत असून सैन्य पूर्ण शक्तिनिशी दहशतवाद्यांच्या अ•dयांवर हल्ले करत आहे. मोहीम पूर्ण होत नाही तोवर आम्ही मागे हटणार नाही तसेच थांबणार देखील नाही असे इस्रायलचे संरक्षणमंत्री काट्ज यांनी म्हटले आहे.
गाझा शहरावर कब्जास मंजुरी
इस्रायलने मागील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये गाझा शहरावर कब्जा करण्याच्या योजनेला मंजुरी दिली होती. याच्या अंतर्गत सुमारे 60 हजार राखीव सैनिकांना सेवेत बोलाविण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. योजनेनुसार गाझा शहरावर कब्जा करण्याच्या अभियानासाठी एकूण 1.30 लाख सैनिक तैनात केले जाणार आहेत. सैनिकांना सेवेत दाखल होण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वी नोटीस देण्यात आली आहे. पहिल्या खेपमध्ये सुमारे 40-50 हजार सैनिक बोलाविण्यात आले आहेत. तर दुसरी खेप नोव्हेंबर-डिसेंबर तर तिसरी खेप फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये बोलाविण्यात येणार आहे.
मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात
या अभियानाला गिदोन’ चेरिएट्स-बी नाव देण्यात आले आहे. तसेच पूर्वीपासून सेवेत असलेल्या हजारो राखीव सैनिकांची सेवा देखील 30-40 दिवसांसाठी वाढविण्यात आली आहे. या अभियानात 5 आर्मी डिव्हिजन आणि 12 ब्रिगेड-लेव्हल टीम्स सामील झाल्या असून यात भूदल, रणगाडे, तोफखाना आणि इंजिनियरिंग आणि सपोर्ट युनिट्स सामील आहेत. याचबरोबर गाझा डिव्हिजनच्या नॉर्थ आणि साउथ ब्रिगेडही हिस्सा घेत आहेत.
गाझाच्या 75 टक्के भूभागावर नियंत्रण
हमासच्या नियंत्रणात असलेल्या भूभागांमध्ये शिरकाव करण्याचा इस्रायलचा हेतू आहे. याच भागात इस्रायली सैन्याने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कारवाई केली नव्हती. गाझापट्टीच्या सुमारे 75 टक्के हिस्स्यावर इस्रायलच्या सैन्याचे नियंत्रण आहे. गाझा शहराचा 25 टक्के हिस्सा मात्र इस्रायलच्या सैन्याच्या नियंत्रणात नाही. सध्या गाझामध्ये हमास या दहशतवादी संघटनेच्या तावडीत 50 ओलीस आहेत. यातील 20 ओलीस अद्याप जिवंत असल्याचा तर 28 ओलीस मारले गेल्याचा अनुमान आहे.