इस्रायलची गाझापट्टीत भेदक कारवाई
हमासचे अनेक दहशतवादी ठार, 500 स्थाने उद्ध्वस्त
वृत्तसंस्था / तेल अवीव
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या 26 व्या दिवशी इस्रायली सेनेने गाझापट्टीत जोरदार भूमी कारवाई केली आहे. हमासच्या दहशतवाद्यांशी दोन हात करताना इस्रायली सैनिकांनी अनेक दहशतवादी टिपल्याची माहिती देण्यात आली. भूसेना, नौसेना आणि वायुसेना अशा तिन्ही माध्यमांमधून ही कारवाई करण्यात आली. गेल्या 24 तासांमध्ये या कारवाईमुळे आणखी 200 हून अधिक पॅलेस्टाईनींचा मृत्यू झाल्याची माहिती पॅलेस्टाईनी व्यवस्थापकांनी दिली.
आतापर्यंत या युद्धात इस्रायलचे 1,400 हून अधिक नागरिक, तर पॅलेस्टाईनचे 8 हजारांहून अधिक नागरिक प्राणास मुकले आहेत. गाझापट्टीत इस्रायलच्या हल्ल्यामुळे हाहाकार माजला आहे. हमासच्या लपण्याच्या स्थानांवर इस्रायली सेनेने आपल्या भूमी कारवाईत अचूक हल्ले चढविले आहेत. हमासचे अनेक दहशतवादी रुग्णालयांमध्ये लपून बसले आहेत. या रुग्णालयांच्या परिसरात इस्रायली युद्ध विमानांनी अचूक बाँबवर्षाव करुन दहशतवाद्यांची कोंडी केली होती. प्रत्यक्ष रुग्णालयांवर बाँब न टाकता त्याच्या आजूबाजूच्या परिसरात हल्ले करुन दहशतवाद्यांना जायबंदी करण्याचे नवे तंत्र इस्रायली वायुदलाने आखले आहे.
भूमीवरील कारवाई गतिमान
सात दिवसांपूर्वीपासूनच इस्रायलने भूमीवरील कारवाई गाझापट्टीत गतिमान केली आहे. इस्रायलचे किमान 100 रणगाडे आता मुक्तपणे गाझापट्टीच्या उत्तर भागात संचार करत असून त्यांना फारसा विरोध ही होत नसल्याने हमासची शक्ती क्षीण झाल्याचा कयास बांधण्यात येत आहे. तथापि, भुयारांचा लाभ उठवून हमासचे दहशतवादी इस्रायलच्या सैनिकांवर गोळीबार करीत आहेत. मात्र, इस्रायलची जिवीत किंवा इतर हानी फारशी झालेली नाही. या देशाच्या रणगाड्यांच्या हल्ल्यात अनेक इमारतींमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना बाहेर यावे लागल्याचे इस्रायल सैन्याचे म्हणणे आहे. आतापर्यंत किमान 500 दहशतवाद्यांचा खत्मा करण्यात आला आहे.
लेबेनॉनवरही हल्ले
इस्रायली वायुदलाने लेबेनॉनवरही हल्ले चढविले आहेत. तेथील हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेची अनेक आस्थापने नष्ट करण्यात आली आहेत. या संघटनेचे 300 हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. बुधवारी या संघटनेच्या आणखी स्थानांवर हल्ले चढविण्यात आले. या हल्ल्यांमध्ये अनेक ठार झाल्याचे वृत्त आहे.
अमेरिकेची योजना सज्ज
हमासचा पाडाव झाल्यानंतर गाझापट्टीवर कोणाचे प्रशासन राहणार, या संबंधात अमेरिका आणि इस्रायल यांनी योजना सज्ज केल्याची माहिती आहे. भविष्यात केव्हाही गाझापट्टीवर हमासचा ताबा होऊ नये अशी ही योजना आहे. गाझापट्टीचे व्यवस्थापन इस्रायल स्वत:च्या हाती ठेवण्याची शक्यता आहे.
जर्मन महिलेचे निधन
7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर निर्घृण आणि अमानुष हल्ला केला होता. या हल्ल्यात शानी लोक नामक इस्रायली-जर्मन महिलेवर अनन्वित अत्याचार करण्यात आले होते. तिच्या विवस्त्र देहाची धिंड काढण्यात आली होती. ही महिला मृत झाल्याचे आता घोषित करण्यात आले आहे. तिची अत्यंत अमानवीय पद्धतीने हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह मिळाला नसला तरी तिच्या कवटीचा एक तुकडा हाती लागला आहे. डीएनए परिक्षणावरुन तो याच महिलेचा असल्याचे सिद्ध झाले आहे. तिच्या मातापित्यांनीही तिच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. हल्ला झाल्यापासून ती हमासच्या दहशतवाद्यांच्या ताब्यातच होती.
इराणचे मुस्लीम राष्ट्रांना आवाहन
इस्रायलवर पूर्ण बहिष्कार टाका असे आवाहन इराणचे मुस्लीम धर्मनेता अली खोमेनी यांनी केले आहे. इस्रायल निरपराध्यांच्या हत्या करीत आहे. त्याला धडा शिकवा. सर्व मुस्लीम राष्ट्रांनी इस्रायलला एकटे पाडले पाहिजे. त्याची नाकेबंदी केली पाहिजे. तरच तो वठणीवर येईल, अशी दर्पोक्ती त्यानी केली.
इतक्यात शस्त्रसंधी नकोच
हमासने केलेला शस्त्रसंधीचा प्रस्ताव इस्रायल आणि अमेरिकेने फेटाळला आहे. हमासचा नायनाट झाल्याखेरीज आणि सर्व ओलिसांची सुटका झाल्याखेरीज शस्त्रसंधी करण्यात अर्थ नाही. उद्दिष्ट्यो पूर्ण होण्याआधीच शस्त्रसंधी झाली तर इस्रायलने हमाससमोर शरणागती पत्करली असा अर्थ काढला जाईल. त्यामुळे जगभरातील दहशतवाद्यांचा जोर वाढेल आणि ती नवी डोकेदुखी होईल, यावर अमेरिका आणि इस्रायल आणि अमेरिका यांचे एकमत झाले आहे.
युद्ध आघाडीवर दिवसभरात...
ड इस्रायलच्या वायुदलाचे गाझापट्टीप्रमाणे हिजबुल्लावरही जोरदार हल्ले
ड हमासचे अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये ठार, हमास होत आहे दुर्बल
ड हमासचे अनेक दहशतवादी त्यांच्याच भुयारांमध्ये कोंडले गेल्याचे दृष्य