इस्रायलची गुप्तचर माहिती अमेरिकेमधून लीक
इराणवरील हल्ल्यासंबंधी गुप्त कागदपत्रे टेलिग्रामवर झळकल्याने खळबळ : चौकशी सुरू
वृत्तसंस्था/ तेल अवीव, वॉशिंग्टन
इस्रायलची गुप्त कागदपत्रे अमेरिकेकडून लीक झाली आहेत. या कागदपत्रांमध्ये इराणवर हल्ला करण्यासंबंधी माहिती समाविष्ट होती. ‘मिडल ईस्ट स्पेक्टेटर’ नावाच्या चॅनलने शुक्रवार, 18 ऑक्टोबर रोजी काही दस्तावेज टेलिग्रामवर पोस्ट केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. या कागदपत्रांवर टॉप सीव्रेट आणि 15 आणि 16 ऑक्टोबरची तारीख लिहिली आहे. अशी कागदपत्रे लीक होणे ही अमेरिकेसाठी चिंतेची बाब आहे. याप्रकरणी आता अमेरिकेने चौकशी सुरू केली आहे. ही गुप्त माहिती पेंटागॉनच्या कोणत्या अधिकाऱ्यांकडे होती याची माहिती मिळविली जात आहे.
टेलिग्रामवर लीक झालेले दस्तऐवज फक्त अमेरिका आणि त्याच्या सहयोगी देश ऑस्ट्रेलिया, पॅनडा, न्यूझीलंड आणि ब्रिटनसाठी आहेत. हे सर्व देश ‘फाईव्ह आईज’ या गुप्तचर नेटवर्कचा भाग आहेत. इराणने 1 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर 180 क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता. तसेच आता प्रतिहल्ला करण्याची जोरदार तयारीही चालवली आहे.
इस्रायल इराणवर हल्ल्याच्या तयारीत
गुप्त कागदपत्रांनुसार इस्रायल इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. यातील एका कागदपत्रानुसार इस्रायलने हल्ल्यासाठी शस्त्रास्त्रांची वाहतूक सुरू केली आहे. हा दस्तऐवज नॅशनल जिओस्पेशियल इंटेलिजन्स एजन्सीने तयार केला आहे. दुसऱ्या दस्तऐवजात इस्रायली हवाई दलाच्या सरावांशी संबंधित माहिती आहे. त्यात हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांशी संबंधित माहिती आहे. एकंदर ही माहिती इराणवर हल्ला करण्याच्या तयारीचा एक भाग असल्याचे मानले जात आहे.