44 वर्षांनी ब्यूफोर्टवर फडकला इस्रायलचा झेंडा
लेबनॉनमध्ये शिरले इस्रायलचे सैन्य : रणनीतिक स्वरुपात मोठे यश
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलच्या सैन्याने दक्षिण लेबनॉनमध्ये रणनीतिक स्वरुपात महत्त्वपूर्ण पर्वतावर कब्जा केला असून तेथेच ब्यूफोर्ट स्थित आहे. या किल्ल्यावर जवळपास 44 वर्षांनी इस्रायलचा झेंडा फडकला आहे. 26 वर्षांपेक्षा अधिक कालावधीत इस्रायलच्या सैन्याने लेबनॉनमध्ये सर्वाधिक अंतरापर्यंत शिरून केलेला हा कब्जा आहे. इस्रायलच्या सैन्याने रविवारी यासंबंधी माहिती दिली आहे.
इस्रायलच्या सैन्याने नबातियेह शहरानजीक स्थित ब्यूफोर्ट किल्ल्याच्या आसपासच्या गावांमध्ये अनेक दिवसांपर्यंत चाललेली भीषण लढाई आणि हवाई हल्ल्यानंतर हे यश मिळविले आहे. इस्रायलच्या सैनिकांनी या गावांच्या दुर्गम भागांमध्ये हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांशी संघर्ष केला आहे. मार्चच्याप्रारंभी इस्रायल-हिजबुल्लाह यांच्यात नवा संघर्ष सुरू झाल्यावर इस्रायलने मिळविलेले हे मोठे यश आहे. 1948 मध्ये इस्रायलच्या स्थापनेपासून युद्धाच्या स्थितीत राहिलेले इस्रायल आणि लेबनॉन हे दोन्ही देश वॉशिंग्टनमध्ये थेट चर्चा करत असताना हा घटनाक्रम घडला आहे. इस्रायलची ही कारवाई 17 एप्रिलपासुन लागू नाममात्र संघर्षविरामानंतर झाली आहे. पुढील टप्प्याची चर्चा 2-3 जून रोजी अमेरिकेत होणार असताना इस्रायलने हा कब्जा केला आहे.
इस्रायल सैन्याचे प्रवक्ते अवीचाय अद्राई यांनी एक्सवर एक छायाचित्र शेअर केले असून यात इस्रायलचे सैनिक किल्ल्याबाहेर दिसून येतात. इस्रायलचे संरक्षणमंत्री काट्ज यांनीही किल्ल्यावरील कब्जासंबंधी पोस्ट केली आहे.
यापूर्वी 1982 मध्ये इस्रायलच्या सैनिकांनी या किल्ल्यावर कब्जा केला होता आणि 2000 मध्ये लेबनॉनमधून वापसीपर्यंत यावर नियंत्रण राहिले होते. काही दिवसांपूर्वी ब्यूफोटे रिज आणि त्यापुढील सुलुकी खोऱ्यात अभियान सुरू केले होते, याचा उद्देश हिजबुल्लाहच्या संरचनेला नष्ट करणे आणि इस्रायली नागरिकांसाठीचे धोके दूर करणे होता, सैन्य प्रसंगी स्वत:च्या अभियानाचा विस्तार करण्यासाठी तयार असल्याचे इस्रायलच्या सैन्याने एका वक्तव्याद्वारे म्हटले होते.
अलिकडच्या दिवसांमध्ये इस्रायलने लेबनॉनमधील स्वत:च्या अभियानांची व्याप्ती वाढविली आहे. इस्रायलने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसमान काम करणाऱ्या लितानी नदीच्या पार सैनिक पाठविले असून दक्षिण लेबनॉनच्या मोठ्या हिस्स्यांमधून रहिवाशांना स्थलांतराची सूचना केली आहे.