इराणच्या अणुकेंद्रांवर इस्रायलचा हल्ला
इराणच्या लष्करप्रमुखांसह अनेक शास्त्रज्ञ झाले ठार, इराणचा इस्रायलवर ड्रोन वर्षाव मात्र असफल
वृत्तसंस्था / जेरुसलेम, तेहरान
इस्रालयच्या युद्ध विमानांनी अचानकपणे इराणच्या अनेक अणुकेंद्रांवर आणि लष्करी तळांवर वायुहल्ला केला आहे. या हल्ल्यात इराणच्या सेनेचे प्रमुख हुसेन सलामी यांचा मृत्यू झाला आहे. तसेच इराणचे अनेक ज्येष्ठ आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि इराणच्या अणुकार्यक्रमाला पुढे नेणारे अनेक शास्त्रज्ञ या हल्ल्यात ठार झाले आहेत, अशी माहिती देण्यात आली. हे हल्ले शुक्रवारी करण्यात आले.
इराणच्या किमान 100 अणु आणि लष्करी तळांवर हे हल्ले करण्यात आले. या अभियानात 200 हून अधिक इस्रायली युद्ध विमानांनी भाग घेतला. इस्रायलची सर्व विमाने कार्यभाग उरकून परत आली आहेत, अशी माहिती देण्यात आली. या अकस्मात हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य-पूर्वेत पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात 80 हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याची माहिती इराणकडून जारी करण्यात आली आहे.
इराणचा प्रतिहल्ला असफल
इस्रालयच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने शुक्रवारीच दुपारी इस्रालयवर ड्रोन्सचा वर्षाव केला आहे. 100 हून अधिक ड्रोन्स इस्रायलच्या विविध भागांमध्ये डागण्याचा प्रयत्न इराणकडून करण्यात आला. तथापि, सर्व ड्रोन्स इस्रायलच्या वायुसंरक्षण यंत्रणेने निकामी केले असून एकही ड्रोन भूमीवर आदळले नाही. त्यांच्या आकाशातच नाश करण्यात आला, अशी माहिती इस्रायलने दिली आहे.
इस्रायलचे केठे हल्ले...
इराणची राजधानी तेहरान येथे बॉम्बस्फोटांचे अनेक आवाज होताना दिसून आले. तेहरानमध्ये किमात 12 स्थानांना इस्रायलच्या विमानांकडून लक्ष्य करण्यात आले. तेहरानच्या काही मानववस्तीच्या स्थानांनाही लक्ष्य करण्यात आले. इराणच्या नातांझ येथील अण्विक केंद्राच्या परिसरातही बाँब आणि क्षेपणास्त्रांचा वर्षाव करण्यात आला. हे केंद्र तेहरानपासून 225 किलोमीटरवर आहे. या हल्ल्यात इराणचे अनेक अणुशास्त्रज्ञ ठार झाले आहेत, अशी कबुली इराणकडून नंतर देण्यात आली.
किरणोत्सर्गात वाढ नाही
नातांझ येथील अणुतळावर झालेल्या हल्ल्यात इराणची मोठी हानी झाली आहे. तथापि, येथील अणुतळाचा मुख्य भाग आणि प्रक्रिया केंद्रावर हेतुपुरस्सर हल्ला करण्यात आला नाही. त्यामुळे घातक किरणोत्सर्गात वाढ झालेली दिसून आलेली नाही, असा दावा इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा प्राधिकरणाला (आयएईए) पाठविलेल्या माहितीत केला आहे. अणुतळांवर हल्ले करू नयेत. अशा हल्ल्यांचे गंभीर परिणाम उद्भवतात, असा इशारा प्रधिकारणाने इस्रायलला दिला आहे.
अचूक हल्ल्यांचा इस्रायलचा दावा
इस्रायलने त्याने निवडलेल्या लक्ष्यांवर अचूक हल्ला केला आहे. इराणला धडा शिकविणे हा या हल्ल्यांचा मुख्य हेतू होता. अणुतळ किंवा अणुभट्ट्या यांना हेतुपुरस्सर लक्ष्य करण्यात आलेले नाही. इराणला हा एक इशारा असून त्याने त्याचा अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रम बंद करावा, असे आवाहन इस्रायलने केले.
हल्ल्याचे कारण काय...
इस्रायलने अचानक असा हल्ला करण्याचे कारण काय, असाही प्रश्न विचारला जात आहे. इराण आता अणुबाँब बनविण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे, असा इशारा अणुतंत्रज्ञान प्रगतीवर लक्ष ठेवणाऱ्या जगातिक संस्थांनी दिला आहे. तसेच अमेरिका आणि इस्रायल यांच्या गुप्तचर संस्थांनीही ही शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला मागे ढकलण्यासाठी त्याच्या युरेनियम संपृक्तीकरण केंद्रांवर हल्ले करण्यात आले, अशी माहिती इस्रायलने दिली. दोन महिन्यांपूर्वी ट्रम्प यांनी इराणला अणुकरार करण्याचा प्रस्ताव दिला होता. तथापि, तो इराणने धुडकावला होता. इराणला अणुबाँब तयार करण्यापासून रोखणे हे अमेरिका आणि इस्रायल यांचे ध्येय आहे. ते साध्य करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. असे आणखी हल्ले होऊ शकतात, अशी स्पष्टोक्तीही इस्रायलकडून केली गेली.
ट्रम्प यांचा इराणला स्पष्ट इशारा
इराण स्वत:च्या अणुतळांचे संरक्षण करण्याच्या स्थितीत नाही, हे या हल्ल्यांवरुन सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता इराणने स्वत:ला अधिक संकटात न टाकता, अमेरिकेशी अणुकरार करावा, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यांनंतर केले. इराणने यापुढेही हट्टाग्रहीपणा कायम ठेवला, तर मात्र, पुढचा इस्रायलचा हल्ला त्याच्या अणुभट्ट्यांवरच होऊ शकतो. तसे झाल्यास उद्भवलेल्या परिस्थितीला इराण स्वत: जबाबदार असेल. आम्ही इराणला वारंवार संधी दिली आहे. परंतु तो देश अण्वस्त्रे तयार करण्याच्या आपल्या हट्टावर अडून बसला आहे. त्यामुळे आता त्याला अधिक संधी दिली जाणार नाही. त्याला अणुबाँब तयार करू दिला जाणार नाही. कारण अण्वस्त्रधारी इराण इस्रायल आणि मध्यपूर्वेसाठी अत्यंत धोकादायक ठरु शकतो. त्यामुळे इराणने आता आपला अणुकार्यक्रम गुंडाळावा आणि टेबलाभोवती बसून चर्चा करावी, असे प्रतिपादन ट्रम्प यांनी केले आहे.
महत्वाचे अधिकारी ठार
इराणच्या लष्करप्रमुखांसमवेत इतरही अनेक महत्वाचे अधिकारी इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. इस्लामी क्रांतिकारक सेनेचा कमांडर इन चीफ हुसेन सलामी, खतम अल् अनबिया संघटनेच्या मुख्यालयाचा प्रमुख मोहम्मद बाघेरी, इराणच्या वायुसेनेचा कमांडर इन चीफ अमीर अली हाजीझादेह आणि इतर अनेक प्रमुख अधिकारी ठार झाले आहेत. सहा महत्वाच्या अणुशास्त्रज्ञांनीही प्राण गमावले आहेत. त्यांच्यापैकी पाच जणांची नावेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
अमेरिका-इराण चर्चा लांबणीवर
या हल्ल्यांमुळे अमेरिकेशी चर्चेची सहावी फेरी इराणकडून लांबणीवर टाकण्यात आली आहे, अशी घोषणा त्या देशाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी केली. आम्हाला इस्रायल हल्ला करणार हे महितच होते. त्यामुळे या हल्ल्यात काहीही आश्चर्यकारक नाही. आम्ही आमचे ध्येय सोडणार नाही, अशीही दर्पोक्ती इराणने केली आहे.
इराणची धमकी, अमेरिकेचे कानावर हात
इस्रायलने केलेल्या हल्ल्याची फार मोठी किंमत अमेरिका आणि इस्रायललाही मोजावी लागेल, अशी धमकी इराणने या दोन्ही देशांना दिली आहे. मात्र, इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये आमचा काही हात नाही. आमचा याच्याशी काही संबंधही नाही, असे प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी केले. इस्रायलने हल्ले करण्याआधी आमची अनुमती घेतली नव्हती. इस्रायल आणि इराणच्या संघर्षात आमची काही भूमिका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.