इस्रायलचा हिजबुलवर हल्लाबोल
गाझा पट्टीतील युद्धबंदीवरची शाई वाळते न वाळते तोच आता इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल या दहशतवादी संघटनेविरुद्ध नवी फळी उघडली आहे. आणि अशातच मागील शुक्रवारी इस्रायलने लेबनॉनच्या दक्षिण किनाऱ्यावरील हिजबुलच्या लष्करी तळावर जोरदार हल्ले केले. इस्रायलच्या मोसाव्या संघटनेकडून अशी माहिती मिळाली की लेबनॉनच्या लूतानी नदी परिसरात हिजबुल लढवय्ये पुन्हा एकत्र येत आहेत व तेथे ते लष्करी तळ उभे करत आहेत. त्यांचा हेतू इस्रायलवर पुन्हा हल्ले करणे हा आहे. हे लक्षात घेऊन इस्रायलने हिजबुलच्या पायाभूत सुविधावर जबरदस्त प्रहार केला आहे. विशेषत: या ठिकाणी शस्त्रास्त्रs निर्मिती तसेच युद्धतंत्राचा विकास आणि पुढील हल्ल्याची आखणी व प्रशिक्षण यावर भर दिला जात होता.
कोण आहे हिजबुल
1982 या वर्षी हिजबुल या संघटनेची स्थापना करण्यात आली. लेबनॉन हे तिचे केंद्र बनले. इस्रायलच्या धोक्यापासून लेबनॉनच्या सीमांचे रक्षण करणे हा या संघटनेचा आरंभी मुख्य हेतू होता. इराणमधील धार्मिक नेते आयातुल्ला खेमिनी यांच्यापासून प्रेरणा घेऊन हिजबुलने आपले कार्य आरंभ केले. 1985 साली या संघटनेने आपल्यासमोर तीन उद्देश ठेवले होते. पहिला उद्देश म्हणजे लेबनॉनच्या हिताचे रक्षण करणे, इस्रायलचा संपूर्ण विनाश घडविणे आणि लेबनॉनच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे, या उद्दिष्टावर भर देऊन हिजबुलने इस्रायल विरोधी कारवायात हमासला मदत केली. लेबनॉन हा शियाबहुल देश. एकेकाळी पर्यटन आणि प्रेक्षणीय स्थळासाठी प्रसिद्ध असलेला हा देश आता युद्ध आणि संघर्षामुळे तणावग्रस्त बनला आहे आणि तेथील पर्यटन उद्योग पूर्णपणे कोसळला आहे. आता एक वर्षांपूर्वी थांबलेला इस्रायल आणि हिजबुलमधील संघर्ष पुन्हा पेटला आहे. वर्षापूर्वी झालेल्या युद्धबंदीनंतर पुन्हा एकदा संघर्षाला तोंड फुटले आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये ही युद्धबंदी झाली होती. तब्बल वर्षानंतर आता उभय सीमांवर पुन्हा युद्धाचे ढग जमले आहेत. त्याचे कारण काय असा प्रश्न विचारला तर, असे दिसते की युद्धबंदीची घोषणा केलेल्या हिजबुलने आता लूतानी नदीच्या परिसरात पुन्हा फौज फाटा सामग्री यांचा विकास आरंभीला आहे ही गोष्ट गुप्तहेराने इस्रायलच्या लक्षात आणून दिली आणि आता इस्रायलने पुन: हिजबुलच्या तळावर हल्ले आरंभीले आहेत.
इस्रायल हल्ल्यांची तीव्रता
शुक्रवारी इस्रायलने लेबनॉनच्या सीमेवरील हिजबुलच्या प्रशिक्षण तळावर हल्ले केले. असे हल्ले करताना तेथील युद्धसामुग्री नष्ट करणे हा प्रधान हेतू होता. तसेच याप्रसंगी तेथे युद्धासाठी चालविल्या जाणाऱ्या प्रशिक्षण केंद्राचे कंबरडे मोडणे हाही एक प्रमुख हेतू होता. एकूण 14 पैकी पाच हवाई हल्ले प्रथम करण्यात आले त्यापैकी काही हल्ल्यांचे वर्णन ड्रोन हल्ले असेही करण्यात आले आहे. विकसित केलेल्या प्रति सूक्ष्म आणि नेमक्या प्रिसिजन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांचा उपयोग इस्रायलने मोठ्या आयोजकतेने केला असल्याचे दिसून आले.
इशारा अमेरिकेला
लेबनॉनच्या प्रवक्त्यांनी इस्रायलने हिजबुलवरील हल्ले थांबवावेत, अमेरिकेचा या हल्ल्याला पाठिंबा असेल तर आम्ही परकीय हस्तक्षेप सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया लेबनॉनचे नेते देत आहेत. याच कालखंडात अमेरिकेचे विशेष दूत यांनी इस्रायलला भेट दिली तेव्हा अमेरिकेचे इस्रायलला समर्थन आहे असा दावा हीच हिजबुल करत आहे.
इस्रायलच्या या कारवाईत हिजबुल या संघटनेचा एक आघाडीचा नेता मारला गेल्याचा दावा करण्यात येत आहे आणि हिजबुलच्या गोपनीय सूत्राने सुद्धा त्यास दुजोरा दिला आहे. यावरून इस्रायलची ही कामगिरी निश्चितच वादळी ठरली आहे आणि इस्रायलच्या लष्कर प्रमुखांनी म्हटल्याप्रमाणे त्यात त्यांना अपेक्षित यश आले आहे. हिजबुलचे 14 लढवय्ये या कारवाईत मारले गेले असा इस्रायलचा दावा आहे. नेमका आकडा किती आणि सत्य काय हे उपलब्ध नसले तरी इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुलचे बरेच नुकसान झाले असे म्हटले जात आहे.
लेबनॉन सरकारने हिजबुलचे अस्तित्व टप्प्याटप्प्याने कमी करावे अशी करारातील तरतूद होती. युद्धबंदी झाल्यानंतर अलीकडे पुन्हा हिजबुलचे अस्तित्व वाढत आहे आणि त्यांच्या कारवाया कुठल्याही प्रकारे थांबत नाही आहेत हे लक्षात आल्यानंतर इस्रायलने हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. खरे तर लेबनॉनमधील प्रजासत्ताकाची ही ठाम भूमिका असली पाहिजे की त्यांनी दहशतवादाला खत पाणी घालता कामा नये, आणि दिलेले वचन पूर्ण करून त्यांनी हिजबुलची संपूर्ण पाळे-मुळे खणून काढली पाहिजेत. नाहीतर हिजबुलसारख्या घातक मूलतत्त्ववादी संघटनेमुळे लेबनॉन बदनाम होत आहे आणि त्याला युद्ध व संघर्षाच्या खाईत लोटले जात आहे. जर लेबनॉनला शांतता, प्रगती आणि विकासाचा मार्ग अनुसरावयाचा असेल तर या देशाने आता हिजबुलसारख्या संघटनेला पाठिंबा देणे बंद केले पाहिजे. तसे झाले नाही तर मग इस्रायल हिजबुलचा नायनाट करण्यासाठी
लेबनॉनवर हल्ले करत राहील. त्यामुळे बैरुटने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत आणि शांततेचा मार्ग सुलभ करावा. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू हे मोठे चतुर आहेत. त्यांनी गाझामधील युद्धाची सीमा थांबविली आणि युद्धाची दुसरी सीमा त्यांनी आता लेबनॉनमध्ये उघडली आहे. तेव्हा हिजबुल आक्रमक पवित्रा घेतात की पुन्हा माघार घेऊन काही काळ विश्रांती घेण्याचा पवित्रा घेतात हे पाहावे लागेल. खरे तर संपूर्ण मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करावयाची असेल तर हमास, हिजबुल या सारख्या सर्व दहशतवादी संघटनांनी शस्त्रs खाली टाकली पाहिजेत आणि युद्धबंदीला प्रतिसाद दिला पाहिजे. नाहीतर अस्थिर मध्यपूर्वेत विकासाचे तीनतेरा होतील आणि सामान्य माणसाचे जीवन सतत होरपळत राहील. हे या दहशतवादी गटांना जेंव्हा कळेल तेव्हा तो सुदिन म्हटला पाहिजे.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर