दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलचा हल्ला
वृत्तसंस्था/ बेरूत
इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष अजूनही कायम आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये शनिवारी रात्री झालेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये चार जण ठार झाले आहेत. इस्रायली सैन्याने शनिवारी रात्री दक्षिण लेबनॉनमधील तीन ठिकाणी हिजबुल्लाहच्या रॉकेट लाँचरवर हल्ला करत वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये अनेक हिजबुल्लाह लढवय्यांना लक्ष्य केल्याचे इस्रायली सैन्याने रविवारी सांगितले. हिजबुल्लाहने इस्रायलवर रॉकेट डागल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील शस्त्रसंधी करारामुळे संघर्षाची तीव्रता कमी झाली आहे, परंतु दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील चकमकी सुरूच आहेत.
सध्या इस्रायलने स्वयंघोषित बफर झोनमध्ये सैन्य तैनात ठेवले आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले तीव्र करण्याचे आदेश दिल्यामुळे शस्त्रसंधी धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. इस्रायली सैन्याने लेबनॉनच्या रहिवाशांना हिजबुल्लाहसोबतच्या लढाईदरम्यान दक्षिण लेबनॉनमधील लिटानी नदीच्या प्रदेशाजवळ न जाण्याचा इशारा पुन्हा दिला आहे.