इस्रायली रणगाडे लेबनॉन सीमेजवळ
हिजबुल्लाहच्या आणखी काही कमांडर्सचा खात्मा केल्याचाही दावा
वृत्तसंस्था/ बेरूत
हिजबुल्लाह प्रमुख हसन नसराल्लाह याच्या खात्म्यानंतर इस्रायलने रविवारी लेबनॉनच्या सीमेवर रणगाडे तैनात केले. तसेच काही भागात हवाई हल्ले सुरूच असून आणखी काही वरिष्ठ कमांडर्सचा खात्मा केल्याचा दावाही इस्रायलच्या सैन्याकडून करण्यात आला. याचदरम्यान, नसराल्लाहवर झालेल्या हल्ल्याची माहिती होती, असे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. या कारवाईसाठी लढाऊ विमानांनी उ•ाण केल्यानंतर इस्रायलने यासंबंधी आम्हाला माहिती दिली होती. मात्र, मोहीम सुरू करण्यापूर्वीच अमेरिकेला संदेश पाठवल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
नसराल्लाह यांच्या मृत्यूनंतरही इस्रायलने लेबनॉनमध्ये हल्ले सुरूच ठेवले आहेत. या हल्ल्यांमध्ये 33 लोकांचा मृत्यू झाला, तर 195 जण जखमी झाले. इस्रायल संरक्षण दलांनी लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या लक्ष्यांना नष्ट करण्यासाठी छोट्या-मोठ्या कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. इस्रायलने हिजबुल्लाहच्या सेंट्रल कौन्सिलचा सदस्य नबिल कावेक या दहशतवाद्याला ठार केले आहे. लेबनॉनवर इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे दहा लाख लोक विस्थापित होऊ शकतात, असे बेरूतमध्ये झालेल्या आपत्कालीन मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तेथील उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले.
तत्पूर्वी, नसराल्लाहला मारण्यासाठी इस्रायलने 27 सप्टेंबर रोजी 8 लढाऊ विमाने पाठवली होती. त्यांच्या माध्यमातून हिजबुल्लाच्या मुख्यालयावर 2 हजार पौंड किमतीचे 15 बॉम्ब टाकण्यात आले. हे अमेरिकन बनावटीचे बीएलयू-109 बॉम्ब होते. त्यांना बंकर बस्टर बॉम्ब असे संबोधले जाते. हे बॉम्ब जमीन किंवा बंकर्समध्ये घुसून स्फोट घडवून आणण्यास सक्षम असल्याचे ‘आयडीएफ’ने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. या अहवालात ‘बॉर्डर ऑपरेशन्स’बद्दलही माहिती देण्यात आली आहे. सुमारे 60,000 विस्थापित इस्रायलींना घरी आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इस्रायलसाठी हिजबुल्लाहला नष्ट करणे पुरेसे नाही असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कमांडर नबिल कावेकचाही खात्मा
हसन नसराल्लाहच्या मृत्यूनंतर इस्रायलकडून हिजबुल्लाहवर सातत्याने हल्ले होत आहेत. आयडीएफने दहशतवादी नबिल कावेक, हिजबुल्लाहच्या प्रतिबंधात्मक सुरक्षा युनिटचा कमांडर आणि हिजबुल्लाहच्या सेंट्रल कौन्सिल सदस्याचा खात्मा केला. अमनच्या अचूक निर्देशानुसार हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला करून दहशतवादी नबिल कावेकला यमसदनी पाठविल्याचे आयडीएफने रविवारी जाहीर केले.
लेबनॉनमध्ये अराजकतेची भीती
लेबनीज लष्कराने नागरिकांना देशाची शांतता बिघडेल असे काहीही करू नये असे आवाहन केले आहे. संपूर्ण देशासाठी हा अत्यंत नाजूक काळ आहे. खरे तर नसरल्लाह याच्या मृत्यूनंतर लेबनॉनमध्ये त्यांचे समर्थक आणि राजकीय शत्रू यांच्यात संघर्ष होण्याची भीती आहे. त्यामुळे लेबनॉनमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.